मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. एकीकडे आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतानाच, दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरणाबाबत अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची आणि आमचीही इच्छा होती, मात्र आता या चर्चेत खंड पडला आहे,” असे सूचक विधान पवारांनी केले आहे.
शपथविधीबाबत शरद पवार अनभिज्ञ?
आज सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, या निर्णयाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार माझ्याशी कोणतीही चर्चा न करता रात्री उशिरा मुंबईला गेले, असेही त्यांनी नमूद केले.”
विलीनीकरणाचा ‘तो’ प्लॅन आणि गौप्यस्फोट
शरद पवार यांनी पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींवरून पडदा उचलला. त्यांनी सांगितले की, “दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊन ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणुका लढवाव्यात, अशी अजितदादांची तीव्र इच्छा होती. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली होती. या विलीनीकरणाचा अधिकृत निर्णय १२ तारखेला जाहीर होणार होता. दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी चर्चा सुरू होती, पण दादांच्या जाण्याने आता या प्रक्रियेत खंड पडला आहे,” असे पवार भावूकपणे म्हणाले.
पार्थ पवार राज्यसभेवर?
राजकीय वर्तुळात दुसरी एक मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची. अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी भाजपदेखील पार्थ पवार यांच्या नावासाठी सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.
पवार कुटुंबात पुन्हा दुरावा?
अजितदादांच्या अंत्यविधीवेळी संपूर्ण पवार कुटुंब एकवटलेले दिसले होते. मात्र, आजच्या शपथविधीच्या निर्णयापासून शरद पवारांनी स्वतःला अलिप्त ठेवल्याने, राजकीय एकत्रीकरण लांबणीवर पडल्याचे चित्र दिसत आहे. शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कार्यकर्ते संभ्रमात आहेत.