Friday, January 2, 2026

मुंबईत ठाकरेंना मोठा सुरुंग! बड्या महिला नेत्याने सोडली साथ, थेट भाजपमध्ये प्रवेश

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय फटका बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सिनेट सदस्या शीतल देवरुखकर यांनी तिकीट न मिळाल्याने संताप व्यक्त करत शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शीतल देवरुखकर या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ५१ मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. त्यांनी या मतदारसंघात मोठी तयारीही केली होती. मात्र, पक्षाने ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्या नाराज होत्या.

उल्हासनगर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतपणे भाजपचा झेंडा हाती घेतला. “उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी फोन केले असता ते उचलले गेले नाहीत. पाठवलेल्या मेसेजेसला साधे उत्तरही देण्यात आले नाही,” असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी ठाकरे गटातील नेतृत्वावर केले. भाजपात प्रवेश करताच देवरुखकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका बड्या महिला नेत्याने साथ सोडल्यामुळे मुंबईत ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. देवरुखकर आता भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आपली ताकद पणाला लावणार आहेत. याप्रसंगी आमदार कुमार आयलानी आणि भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख