ता.अमळनेर, जि.जळगाव येथील प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रहितातून समाजहित’ या मुख्य विषयावर बोलताना संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान 11 वे वंशज ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांनी आवाहन केले की “विद्यार्थ्यांनो चांगल्या परंपरेचे वारसदार व्हा, राष्ट्र निर्मितीत योगदान द्या” या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण जैन हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक हरी वाणी हे या कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. जैन आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “साधू संत येती घरा.. तोची दिवाळी दसरा, आज आपलीसाठी हा खरंच दिवाळी सारखा क्षण आहे. समाजातील वाईट प्रवृत्ती बदलण्याचे कार्य फक्त संतच करू शकतात”. दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आपली सामाजिक जबाबदारी कळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे संदेश देताना ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे म्हणाले की. “भारतात वृद्धाश्रमांची संख्या खूप जास्त आहे, म्हणून प्रथम आपण आपल्या आई-वडलांची सेवा केली पाहिजे. आजचा युवक नव्या भारताचे उज्वल भवितव्य ठरवणार आहे. आपले आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद, खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद हे असायला पाहिजेत, त्यांचे विचार आणि कार्य आपण अभ्यासले पाहिजेत”. महराज पुढे म्हणाले की “आपण सगळ्यांनी राष्ट्र निर्मितीसाठी योगदान दिले पाहिजे. राष्ट्र, धर्म हा आपण टिकवलाच पाहिजे त्याच सोबत आपल्या संस्कृति आणि परंपरा आपणच राखल्या पाहिजेत.” हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. देवेंद्र तायडे, डॉ. धनंजय चौधरी, दिपक चौधरी, दिलीप शिरसाठ, पराग पाटील, पंकज भदाने, हर्षल देवरे, अतुल धनगर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ. धनंजय चौधरी यांनी पार पाडली.