Wednesday, March 25, 2026

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

Share

भोर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीवर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र रायरेश्वर येथे आज, बुधवार २५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्य ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि स्वाभिमानाचा जागर करण्यासाठी हा विशेष सोहळा रंगणार आहे.

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या कार्यक्रमात शिवचरित्रावर आधारित विविध सादरीकरणे होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राची लोककला असलेल्या शाहिरी परंपरेतील दमदार गायन आणि वादन होणार आहे. पोवाड्यांच्या माध्यमातून शिवकालीन पराक्रम, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याची गाथा भाविकांसमोर मांडली जाणार आहे.

हा प्रेरणादायी सोहळा भोर तालुक्यातील रायरेश्वर मंदिर परिसरात सकाळी १०:०० वाजता सुरू होईल. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या ऐतिहासिक पठारावर शिवभक्तांच्या उपस्थितीत स्वराज्य स्थापनेच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.

“छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. पुणे जिल्ह्यातील आणि परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे,” असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामुळे भोर परिसरात शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, रायरेश्वर मंदिर परिसर भगव्या ध्वजांनी आणि शिवगर्जनांनी न्हाऊन निघाला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख