Murlidhar Mohol : प्रभू श्रीरामांचा (ShriRam) फोटो वापरला म्हणून काँग्रेसने (Congress) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या मुद्यावरून पुण्यातील (Pune) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी काँग्रेसला धारेवर धरले आहे. ‘शेकडो वर्षे ज्यांनी प्रतीक्षा केली, अशा तमाम देशवासीयांच्या आनंदाचा विषय असणाऱ्या राम मंदिर आणि प्रभू रामाला काँग्रेसने कायम विरोध केला आहे. अयोध्येतील राम मंदिराचा निकाल निवडणुकीनंतर द्या, अशी भूमिका त्यांनी घेतली. ५०० वर्षांनंतर होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी नाकारले. प्रभू श्रीरामाबद्दल काँग्रेसच्या मनात किती द्वेष आहे हे सगळ्यांनी पाहिले आहे,’ असे टीकास्त्र मोहोळ यांनी काँग्रेसवर सोडले आहे.
‘आज पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून पुण्यामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो वापरला म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रभू राम आमचे आहेत, आम्ही रामाचे आहोत. अशा हजार तक्रारी करा, प्रभू रामाचा तुम्ही किती द्वेष करता, हे पुणेकर नक्की ओळखतात. त्यामुळे तुमचे खरे रूप पुन्हा एकदा समोर आले आहे,’ असेही ते म्हणाले.