Monday, March 31, 2025

सुकनाथ बाबांची ‘रोडगा-दाल बट्टी’ व समरसतेची होळी

Share

सातपुड्याच्या पायथ्याशी अनोखी परंपरा

मार्च महिन्यातील रणरणत्या उन्हात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्डी गावात साजरी होणारी होळी श्रद्धा, समरसता आणि हिंदू एकतेचे प्रतीक आहे. येथे पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालत जाऊन भाजलेली ‘बट्टी’ काढणारे तरुण श्रद्धेची ताकद दाखवतात, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जातीयता बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून एकत्र येतात आणि समरसतेची होळी साजरी करतात.

हिंदू धर्मावर शतकानुशतके आक्रमणे झाली—कधी मंदिरांवर, कधी अस्मितेवर. तरीही हा धर्म आपल्या भूमीशी घट्ट नाळ जोडून टिकून आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे हिंदू धर्मातील समरसता. इंग्रजांनी “फोडा आणि राज्य करा” नीती अवलंबून समाजात फूट पाडली. मात्र, हिंदू एकतेला बळकट करणारे अनेक सण आणि परंपरा आजही कायम आहेत. वर्डी गावातील ही होळी त्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे.

भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाचे उदाहरण – होळी

भारतात प्रत्येक सण विविध भागांत वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा होतो. होळी त्यापैकी एक प्रमुख सण आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावात संत सुकनाथ बाबांचे मंदिर आहे. १९३५ पासून येथे होळी साजरी केली जाते. या दिवशी गावकरी मोठ्या प्रमाणात रोडगे (बट्टी) तयार करतात आणि एका खड्ड्यात टाकून त्यावर शेणाच्या गोवऱ्यांची भट्टी तयार करतात. दुसऱ्या दिवशी गरम भट्टीतून भाजलेले रोडगे काढून सुकनाथ बाबांना नैवेद्य अर्पण केला जातो.

सुकनाथ बाबा कोण होते?

१८व्या शतकात नर्मदा परिक्रमा करताना सज्जननाथ महाराजांना नर्मदा नदीत एक बालक तरंगताना दिसला. त्यांनी त्याला दत्तक घेतले आणि तोच पुढे ‘सुकनाथ बाबा’ म्हणून ओळखला जाऊ लागला. बालपणीच त्यांच्या अद्भुत लीलांनी लोक अचंबित झाले. ते गोरगरीबांची मदत करत, शिक्षण देत आणि हिंदू धर्माची शिकवण देत. इंग्रजांविरुद्ध लढ्यात त्यांनी हिंदू एकतेवर भर दिला. त्यांनी गुरुकुल स्थापन केले, मात्र ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यावर बंदी घातली. अखेरीस नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार २० मार्च १९३५ रोजी त्यांनी संजीवनी समाधी घेतली.

परंपरेची सुरुवात आणि उद्देश

सुकनाथ बाबांच्या समाधीनंतर त्यांच्या शिष्य रेवानंद स्वामी यांनी ही परंपरा सुरू केली. इंग्रजांनी हिंदूंमध्ये जातीयतेच्या आधारे फूट पाडली, त्यामुळे हिंदू समाजाला एकजूट करण्यासाठी ‘डाळ बट्टी’ परंपरेची सुरुवात झाली. कधीकाळी फक्त ७ किलो गव्हाच्या पिठाने सुरू झालेली परंपरा आज १९० क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. लाखो लोक या उत्सवात सहभागी होतात, यावरून हिंदू समाजाच्या ऐक्याची साक्ष पटते.

होळी आणि समरसतेची साक्ष

या परंपरेनुसार होळीच्या दिवशी रोडगे, डाळ आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. तयारीसाठी गावकरी एक महिना आधीपासून कार्यरत असतात. मंदिरामागे मोठा खड्डा करून त्यात भट्टी तयार केली जाते. शेणाच्या गोवऱ्या सातपुडा पर्वतरांगांमधून आणल्या जातात. पर्यावरणपूरक दृष्टीकोन ठेवत फक्त गळून पडलेली लाकडेच वापरण्यात येतात.

होळीच्या ३-४ दिवस आधी पीठ दळले जाते. संपूर्ण गाव एकत्र येऊन महिलांसह पुरुषही रोडगे बनवतात. गावातील भिल, गुर्जर-पाटील, मराठा, अनुसूचित जाती, कोळी आणि अन्य समाजातील लोक सर्व भेदभाव विसरून हा सण साजरा करतात.

स्त्री-पुरुष समानता आणि हिंदू धर्म

हिंदू धर्मावर अनेकदा स्त्री-पुरुष भेदभावाचे आरोप होतात. मात्र, येथे पुरुष स्वतः पीठ मळतात आणि स्त्री-पुरुष एकत्र मिळून रोडगे बनवतात. याला ‘पीठाने आणि राखेने खेळलेली होळी’ असे म्हणता येईल.

अन्नदान आणि स्वयंपूर्णता

या वर्षी १९० क्विंटल गव्हाच्या पिठाचे रोडगे तयार करण्यात आले. एका क्विंटलमध्ये ४००-५५० लोक जेवू शकतात, म्हणजेच लाखो लोकांनी याचा लाभ घेतला. लहान मुले भट्टीत रोडगे टाकण्याची जबाबदारी घेतात, ही प्रक्रिया रात्री ८ ते पहाटे ४ वाजेपर्यंत चालते.

दुसऱ्या दिवशी ११० क्विंटल वांग्याचा भाजी आणि डाळ शिजवली जाते. विशेष म्हणजे, या उत्सवासाठी कोणतीही सरकारी मदत घेतली जात नाही. गावकरीच निधी आणि साहित्य गोळा करतात. हे श्रद्धा, एकजूट आणि स्वयंपूर्णतेचे प्रतीक आहे.

होळीच्या दिवशीचे कार्यक्रम

धुलीवंदनाच्या दिवशी पहाटे ६ वाजता बाबांची आरती होते. ८ वाजता बाबांच्या वस्त्रांची गावात मिरवणूक काढली जाते. १२ वाजता महाआरतीनंतर नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटला जातो. सुमारे दीड लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून भाविक या उत्सवात सहभागी होतात.

संध्याकाळी ७ वाजता आरतीनंतर पालखी मिरवणूक काढली जाते. भजनांच्या गजरात भाविक भक्त आनंदाने नाचतात. गावातील तरुण विदेशी गाण्यांवर नव्हे, तर बाबांच्या स्वरचित भजनांवर नाचतात. २० हजार लोकसंख्येच्या गावात एवढा मोठा उत्सव कुठलाही वाद न होता पार पडतो, ही बाब उल्लेखनीय आहे. हा सोहळा हिंदू ऐक्याचे प्रतीक आहे.

हिंदू धर्म आणि सर्वसमावेशकता

हिंदू धर्माचा मूलभूत गाभा सर्वसमावेशक आहे, आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला जागा नाही. कुंभमेळा असो किंवा इतर परंपरा—या सर्व माध्यमांतून हिंदू समाज अधिक दृढ होतो आणि एकतेचे अद्वितीय दर्शन घडते. वर्डी गावातील ही समरसतेची होळी संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे.

अन्य लेख

संबंधित लेख