मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, या शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, विलीनीकरणाच्या प्रश्नावर त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
विलीनीकरणावर बोलणे टाळले
पत्रकारांनी जेव्हा सुनील तटकरे यांना विलीनीकरणाच्या १२ तारखेच्या मुहुर्ताबाबत विचारले, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. “मला या विषयावर आता काहीही बोलायचे नाही. आज दुपारी आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, त्यानंतरच यावर बोलता येईल,” असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.
“निर्णय मुख्यमंत्र्यांना कळवू”
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती नसल्याच्या प्रश्नावर तटकरे म्हणाले, “दुपारी विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडेल. या बैठकीत जो काही निर्णय होईल, तो पक्षाचे वरिष्ठ नेते या नात्याने आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवू.” या विधानामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
शरद पवारांच्या विधानाचे राजकीय पडसाद
शरद पवारांनी आज सकाळीच विलीनीकरणाच्या चर्चांना दुजोरा दिला होता, मात्र सुनेत्रा पवारांच्या घाईघाईने होणाऱ्या शपथविधीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तटकरे यांनी शरद पवारांच्या या नाराजीवर थेट भाष्य न करता ‘पक्ष म्हणून’ निर्णय घेण्यावर भर दिला आहे. यामुळे दोन्ही गट आता खरोखर एकत्र येणार की पुन्हा एकदा नव्या संघर्षाची ठिणगी पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.