ताटात टाकलेले अन्न (Food) पहिले म्हणजे ते दृश्य कितीतरी वेळ मनात रुतून बसते, काही केल्या ते पुसले जात नाही. गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रसंग आले की मन अक्षरशः विदीर्ण झाले.
एका मोठ्या कॉन्फरन्स मधे भाग घेण्याचा योग आला. सर्व मंडळी अगदी उच्च शिक्षित होती, आपल्या क्षेत्रात उत्साहात काम करीत होती,आपले अनुभव मांडत होती, योग्य ते मुद्दे उपस्थित करीत होती. देशाच्या वेगवेगळ्या भागातून तसेच शेजारच्या देशातूनही आली होती.
दोन्ही वेळेला जेवणाची सुंदर व्यवस्था होती, स्थानिक, चविष्ट आणि आरोग्याचा विचार करून पदार्थांची निवड केली होती. त्या प्रांताचे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पक्वान्न निवडून आणले होते, एकापेक्षा एक सरस. फक्त एकच करायचे होते ,ते म्हणजे हवे ते आणि हवे तेव्हढेच वाढून घेणे. अणि मर्यादेत गोड खाणे. पुढच्या सत्रांना जागे राहण्यासाठी, लक्ष केंद्रित होण्यासाठी ते गरजेचे होतेच.
या वर्षी खूपच लग्नाची निमंत्रणे आली होती, सगळी जवळचीच. त्यामुळे खूपच लग्नी जेवणे झाली. महाराष्ट्रात लग्नात खूपच पदार्थ करण्याची पद्धत रूढ झाली आहे. प्रत्येकासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ सापडतात म्हणाना. कधी सगळ्या पदार्थांची चव घेताघेता पोटच भरते. अत्यंत निगुतीने व उत्तम चवीचे तसेच गुणवत्तेचे पदार्थ उपलब्ध असतात. बऱ्याच अंशी अनेक जण त्यांची किमान चव घेऊन पाहतात. पण जेंव्हा रिकामे ताट ठेवायची वेळ येते तेंव्हा तिथले दृश्य अस्वस्थ करते.
आता पंगती या दिसतच नाहीत, फक्त अगदी वधू हा वर यांच्या घरच्यांची एक पंगत असते शेवटी. बाकी तर बुफे आपण स्वीकारलाच आहे. प्रत्येकाला काय आणि किती घ्यायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. अनावश्यक आग्रह नसतो,आपले लक्ष नसताना कोणी वाढून जाण्याची भीती नसते. आपल्या आप्तांबरोबर गप्पा रंगवत जेवता येते.
मात्र जेंव्हा आपण ताट ठेवायला जातो ,तिथे अनेक ताटात कितीतरी अन्न टाकलेले दिसते. अगदी पक्वान्न सुद्धा याला अपवाद नसतात. बहुदा एका टबमधे अन्नसकट टाकलेली ताटे दिसतात. मनावर अगदी चरा उठतो.
एक कौटुंबिक कार्यक्रम तर पंच तारांकित होटेल मध्ये होता. अतिशय विचारपूर्वक पदार्थ निवडले होते. सुंदर मांडणी केली होती. प्रत्येक ठिकाणी माणसे वाढून घ्यायला मदत करीत होती, अर्थात बुफे व्यवस्था होती. चविष्ट जेवण होते. जेवल्यावर ताटे ठेवायला एक टेबल आणि तिथे एक तरुण चुणचुणीत मुलगी हसत मुखाने मदत करत होती. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स शिकणारी विद्यार्थिनी होती. हातात ग्लोव्हज घालून चमच्याने ताटात टाकलेले अन्न एका मोठ्या भांड्यात गोळा करीत होती. अगदी त्यामध्ये आइस्क्रीम सुद्धा होते. मन एकदम अस्वस्थ झाले,सगळी शहाणी शिकलेली माणसं आणि हे काय वागणे? हे सगळे महागामोलाचे अन्न कचऱ्यात जाताना आपल्याला का काही वाटत नाही? काउंटरवरच्या मुलीच्या मनात काय प्रतिमा निर्माण होत असेल? मन आणि तोंड क्षणात कडवट झाले. सुग्रास अन्नाचा आनंद क्षणात मावळला.
त्या कॉन्फरन्स मध्ये तर ताटात टाकलेले अन्न एक मध्यमवयीन व्यक्ती हाताने काढत होती. ते पाहून काही सुचेना, त्यांना म्हणाले दादा चमचा वापरा ना. त्यांचा चेहरा निर्विकार होता,काहीच भाव नव्हते त्यावर, प्रत्येक वेळी हे पाहताना माझे मन मात्र अपराध भावाने,खेदाने भरून यायचे. संयाजकांना काही सूचना देणे शक्य झाले नाही. दिवसभर ते दृश्य नजरे समोरून हलत नसे. प्रत्येक खाण्याच्या वेळी परत परत अस्वस्थता येई.
एका कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या मुलीने तिचा अनुभव सांगितला, जेवणाच्या हॉल मधे पाटी होती. अन्न ताटात उरले असेल तर स्वतः कचऱ्याच्या डब्यात टाकावे. या सूचनेचा मोठा उपयोग झाला असे दिसले. पण सगळे कसे बदलणार?
हॉटेलमधे पण अन्न टाकण्याचे दृश्य हमखास दिसतेच. आपण आपल्या आवडीनुसार पदार्थ मागवतो, पैसे मोजतो तरी टाकायची वेळ का यावी? कधी वाटते की पदार्थ थोडाच असावा का? भूक असेल तर परत विकत घेता येईल. नेमके उत्तर सापडत नाही.
माझ्या पिढीच्या लहानपणी अन्न पानात टाकण्याची परवानगी नव्हतीच. केलेला प्रत्येक पदार्थ चव घेऊन पहावा लागे. नंतर परत घेतला नाही तर हरकत नसे. सक्तीने हे अंगवळणी पाडावे लागे . ते एक जीवन मूल्य होते. आता परत त्याची आठवण करून द्यायची वेळ आली आहे का? अन्न म्हणजे ददेवाचे रूप मानणारे आपण, जेवायला घालणं हे पुण्य मानणारे आपण हे सारे कधी विसरलो? आपले सर्व सुखी, व सुविधांनी युक्त जीवन हे अन्नाच्या पायावर उभे नाही का? ते आपण विसरलो तर राहिले काय?
जुनी वाटली तरी पुन्हा ही जीवन मूल्य नव्याने मांडूया, आग्रह धरूया,व निर्धार करूया. अन्न वाया जात काम नये, मुखी पडूदे.