मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘उबाठा’ (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेतृत्वावर हिंदुत्व विरोधी भूमिका घेतल्याचा थेट आरोप करत जोरदार प्रहार केला आहे. प्राचीन हिंदू परंपरा ‘कार्तिगै दीपम’ (Karthigai Deepam) चालू देण्याच्या बाजूने निकाल देणारे मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन यांच्याविरुद्ध आणलेल्या हक्कभंग नोटिसीवर (Impeachment Notice) उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सही केल्यामुळे हा वाद उफाळून आला आहे. अमित साटम यांनी ट्विट करत दावा केला आहे की, मतपेटीच्या राजकारणाकरिता उबाठा गट हिंदुत्व विरोधी भूमिका घेत असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली?
अमित साटम यांनी ट्विटद्वारे उबाठा गटावर तीव्र टीका केली आहे.
साटम म्हणाले की, ‘उबाठा’ गट केवळ मतांच्या लांगुलचलनाकरिता कशाप्रकारे हिंदुत्व विरोधी भूमिका घेत आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. ‘कार्तिगै दीपम’च्या बाजूने निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींच्या इम्पीचमेंट नोटिसीवर उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी सही केली आहे, जो पूर्णपणे हिंदुत्व विरोधी आहे.
“हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील उबाठा गट करत आहे,” असे साटम यांनी म्हटले आहे.
अमित साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटावर गंभीर आरोप केले आहेत. “येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा रंग बदलण्याचा त्यांचा (उबाठा गटाचा) प्रयत्न आहे,” असे त्यांनी म्हटले.
अशा सर्व शक्तींना मुंबईकर येणाऱ्या काळामध्ये घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही साटम यांनी दिला आहे.
भाजपने थेट ‘हिंदुत्व’ आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यावरून ‘उबाठा’ गटाला घेरायला सुरुवात केल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.