Tuesday, March 24, 2026

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

Share

पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे) आणि राजगुरुनगर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा शालीमार पॅलेस, चांडोली, राजगुरुनगर येथे दुपारी ४:०० वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘स्वातंत्र्य संग्रामावर आधारित भव्य प्रदर्शन’. यामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटना, क्रांतिकारकांचे बलिदान आणि वंदे मातरम् गीताचा प्रेरणादायी प्रवास चित्रांच्या व माहितीच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे देशभक्तीपर वातावरण निर्मिती केली जाणार आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (भा.प्र.से.) आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून, राजगुरुनगर आणि परिसरातील विद्यार्थी, युवक आणि देशभक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महासस्कृती’ आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख