वसुबारसेपासून आनंदमयी दिवाळीला प्रारंभ होतो. आदिवासी, जनजाती समाजात बारस म्हणजे वाघबारस किंवा गायदिवाळी. या वेगळ्या बारसची ओळख करून देणारा लेख.
बारस म्हणजे द्वादशी, दिवाळीत येणारी बारस म्हणजे वाघबारस किंवा गायदिवाळी. आमच्या आदिवासी – जनजाती समाजात हा दिवस आम्ही खूप उत्साहात साजरा करतो. मातीचे बैल, गायी, गोठा बनवण्याचे काम आठ दिवस आधीच सुरू होते. ते बैल, गायी, वासरे सुकवून ठेवली जातात. त्यांची सजावट बारशीला गोठ्यात करायची असते.
गावातील मुले घरोघरी जाऊन धान्य आणि जेवणाचे साहित्य गोळा करतात. बारशीच्या दिवशी ते वाघ, लांडगा असे सोंग तयार करतात आणि दंगा करतात. गावकरी त्यांना विचारतात “आमच्या गायी खाणार का?” ते “नाही, नाही” म्हणतात. धान्य जमल्यावर मुले स्वतःच स्वयंपाक करून मजेत जेवण करतात. ही झाली गुराखी मुलांची दिवाळी.
मातीपासून तयार केलेले गाय, बैल, वासरे मातीच्या गोठ्यात ठेवली जातात. त्यांना कुंकू, फुले वाहिली जातात. नैवेद्य म्हणून चारा दाखवला जातो, दिवा लागला जातो. आमच्या दैनंदिन जीवनात गायी, बैलांना फार महत्त्व आहे. आमची शेती बैलांवरच चालते. आम्ही जिथे नागली लावतो तिथली डोंगर उतारावरची नांगरणी फक्त बैलाचा नांगरच करू शकतो. आमचा प्रवास शेकडो वर्षांच्या काळापासून बैलगाडीवरच अवलंबून आहे. गाय आणि बैल आमच्यासाठी देवच आहेत.
जोपर्यंत शेतात पावसाळी पिके असतात तोपर्यंत गाय, बैल गोठ्यातच असतात. दसरा झाल्यावर पिके कापून, झोडून त्याच्या राशी केल्या म्हणजे नंतर गायी चरायला रानात जाऊ लागतात. गायी रानात जाऊ लागल्या म्हणजे त्यांना धोका सुरू होतो वाघांचा. वाघ जंगलात राहतो आणि आमचा राहण्याचा पाडा सुद्धा त्याच जंगलात असतो. त्यामुळे गाय जंगलात चरायला गेली की ती वाघांचे भक्ष्य बनू शकते. गुराखी मुलगा कितीही शूर असला तरी वाघ त्याच्यापेक्षा बलवान असतो. गायीचे रक्षण करणे त्याला पूर्ण शक्य नसते.
आम्ही यामुळेच वाघदेवाला शरण जातो. आमच्या जीवनाचा आधार असलेल्या गाय आणि बैलांच्या संरक्षणाची जबाबदारी वाघावरच टाकतो. यासाठी वाघाला वाघोबा, वाघदेव म्हणतो. वाघबारशीला आम्ही सगळे गावकरी मिरवणुकीने गावच्या वेशीवर जातो. तिथे वाघाच्या नावाने पुजलेला दगड असतो किंवा दगडावर कोरलेला वाघदेव असतो किंवा चौथऱ्यावर बांधलेले देवाचे उघडे मंदिर असते. वाघदेवाची पूजा करतो, त्याची गाणी म्हणतो. वाघदेवाला खूष करण्यासाठी शेळी किंवा कोंबडीचा बळी देतो. या पूजेमुळे वाघदेव खूष होईल आणि आपल्या गायींना त्रास देणार नाही अशा समाधानात घरी येतो.
गायीची भक्ती आणि तिच्यासाठी वाघदेवाची पूजा असे या वाघबारस व गायदिवाळीचे महत्त्व आहे. यामध्ये गायीची आणि वाघदेवाची गाणीसुद्धा असतात. गायीचे वर्णन तिचे अवयव पाहून सुचणाऱ्या उपमा आणि वाघदेवापासून वाटणारी भीती अशा विविध गाण्यांतून दिसते.
गायीचे गाणे
वन्यागायी तुझी शिंगां जसी महादेवाची गंगा
वन्यागायी तुझं कान, जसं नागेलीचे पान
वन्यागायी तुझं डोळं जसं लोणीयाचे गोळं
वन्यागायी तुझं नाक जसं पंढरीचा माप
वन्यागायी तुझं त्वांड जसं अमृताचे कुंड
वन्यागायी तुझी जीभ जशी चहुमुलकी चमकं ईज
वाघदेवाचे गाणे
व्हाघुबा देवा, व्हाघुबा देवा
घोर लावू नको रं जीवा
रानीवानी आमी भटकतो
कड्या कपारी वं ऱ्हातो
रूसू रागू नको आम्हावरी
आमची माया तुझ्यावरी
तुला व्हाघ बारसीला पुजता
पुरणाचा निवद दावतो
वाघ राजा तू घे गोड मानून
रानातून जा निघून
नको वाट बाबा धरू
नको गुरं ढोरं मारू
तुज्या नाय लागत नादाला
मिळू दे भाकर वाट्याला.
आदिवसांचा सन्मान
राज्यातील महायुती सरकारने आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी जी कामे केली आहेत त्यामध्ये आमच्या गाय, बैलांची काळजी घेण्याचे कामसुद्धा केले आहे. गायीच्या रक्षणाचा कायदा केला आहे आणि गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. या सरकारला आमची आदिवासींच्या मनातील भावना कळते हाच याचा अर्थ आहे. आजवर अनेक सरकारे आली आणि गेली, पण या सरकारने आम्हाला जो सन्मान दिला तसा आधी कोणीच दिला नव्हता.
जयराम चौधरी रगतविहीर
ता. सुरगाणा, जिल्हा नाशिक