Sunday, July 14, 2024

वट पौर्णिमा: पती पत्नीतील प्रेमाच्या नात्याचा सण; वट सावित्रीची कथा आणि व्रत

Share

वट सावित्री व्रत, ज्याला वट पौर्णिमा असेही म्हणतात, हा हिंदू विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा एक सण आहे. ज्येष्ठ (मे-जून) महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येणारे हे पवित्र व्रत पती-पत्नीमधील चिरस्थायी प्रेम आणि वचनबद्धतेचे उदाहरण आहे.

सावित्री आणि सत्यवान यांची कथा:
राजा अश्वपती हे परोपकारी शासक होते, परंतु ते निपुत्रिक असल्याने ते दुःखी होते. म्हणून त्यांनी सूर्यदेवाची उपासना सुरु केली. एके दिवशी सूर्यदेव राजावर प्रसन्न झाले. सूर्यदेवाला राजाच्या पुत्रप्राप्तीची इच्छा चांगलीच ठाऊक होती, परंतु सूर्यदेव त्यांना कन्येचे वरदान देतात. काही महिन्यांनी राजाच्या घरी मुलगी जन्माला येते. सूर्याचे एक नाव सवित्र असल्याने त्यावरून मुलीचे नाव सावित्री ठेवले जाते.

जेंव्हा सावित्री लग्नाची होते तेंव्हा राजा अश्वपती तिला तिच्यासाठी अनुकूल असा एक चांगला वर शोधायला सांगतात. सावित्री योग्य वराचा शोध घेऊन राजाकडे जाते. सत्यवान नावाचा तरुण तिला आवडतो. त्यावेळी तिथे नारद मुनीही आले होते. सत्यवान हा जास्तीत जास्त एक वर्ष जगेल असे भाकीत त्यांनी केले, सत्यवान मरेल पण सत्यवान सारखा दुसरा चांगला किंवा योग्य वर नव्हता. त्यामुळे सावित्री हे माहित असूनही सत्यवानासोबत विवाह करते. सत्यवानाचे राज्य शत्रूंनी बळकावले असल्याने ते जंगलात आनंदात राहतात. पण सावित्री तिच्या पतीच्या मृत्यूला उरलेले दिवस मोजत असते.

मृत्यूला फक्त तीन दिवस उरले असताना सावित्री उपवास सुरु करते. ती काहीही खात पीत नाही पण सतत देवतांची पूजा करते. मृत्यूच्या दिवशी सावित्रीसोबत, सत्यवान लाकूड आणि फुले गोळा करण्याच्या त्याच्या दैनंदिन कामाला जंगलात जातो. संपूर्ण वेळ सावित्री त्याच्यासोबत असते. अचानक त्याला अशक्तपणा जाणवतो. सावित्री त्याच्या मांडीवर डोके ठेवून त्याला जमिनीवर झोपवते. सावित्रीच्या लक्षात येते की यमराज तिच्या नवऱ्याचे प्राण घेण्यासाठी आले आहेत.

यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन चालू लागतात. सावित्रीही यमराजाच्या मागे मागे चालू लागते. यमराजाने तिला तसे न करण्याची ताकीद देतात. मात्र त्यांच्या मागे चालत राहते ती यमराजाला म्हणते की जेव्हा लोक सात पावले एकत्र चालतात तेव्हा त्यांना मित्र मानले जाते. त्यामुळे तुम्ही आता माझे मित्र आहात. ती यमराजांसोबत धर्माविषयी चर्चा करते. तिच्या बोलण्याच्या पद्धतीने प्रभावित होऊन यमराज तिला तिच्या पतीचे आयुष्य परत करण्याशिवाय वरदान देऊ करतात.

त्यानंतर ती यमराजांना तिला पुत्र व्हावा म्हणून वरदान मागते. यमराज तथास्तु म्हणतात. आता सावित्री त्यांना सांगते की तिला जर पुत्र व्हावा असेल तर सत्यवानाला जिवंत करावे लागेल. शेवटी यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.

वट सावित्री व्रताचा विधी:
वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया लवकर उठून स्नान करून नवी साडी परिधान करतात. त्यानंतर ते पवित्र आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाला भेट देतात. वटवृक्षाची यथासांग पूजा करून झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालतात. यावेळी त्यांच्या हातात सुती धागा असतो जो वटवृक्षाच्या बुंध्याला फेरे मारताना गुंडाळला जातो. हा पवित्र धागा पती-पत्नीमधील बंधनाचे प्रतीक मनाला जातो. यावेळी वडाच्या पानामध्ये आंबा, फणस, जांभूळ, करवंद, केळी इत्यादी फळे ठेऊन ते वाण म्हणून अन्य स्त्रियांना दिले जाते. या वनामध्ये एका धाग्यात पाच काळे मणी ओवून ते सौभाग्याचे प्रतीक म्हणून अन्य स्त्रियांना दिले जाते. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेचे वाचन केले जाते. ही कथा प्रेम आणि भक्तीच्या शक्तीची आठवण करून देते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद मागितल्यानंतर उपवास सोडला जातो.

अन्य लेख

संबंधित लेख