Monday, March 23, 2026

आहे मनोहर तरी – विष्णू शेगडी

Share

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या काही भागांत थोडी गॅस टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने उपलब्ध गॅस साठ्यांच्या वितरणात व्यावसायिक गॅस पुरवठ्यापेक्षा घरगुती गॅस पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा अत्यंत स्तुत्य असा व्यावहारिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही रेस्टॉरंटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आपल्या मेन्यूतील काही पदार्थ कमी केले आहेत किंवा काही पदार्थ बंद केले आहेत.

या गॅस तुटवड्याच्या समस्येवर उपाय म्हणून सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ‘विष्णू शेगडी’ (किंवा विष्णू ऊर्जा’ शेगडी) हा पर्याय विकसित केला आहे.

विष्णू शेगडीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती बायोमास इंधनावर चालते. या शेगडीत उसाचे चिपाडे, नारळाच्या बुच्या, लाकडाचे छोटे तुकडे, शेतीतील काडीकचरा, लाकडी भुसा (Sawdust) तसेच इतर टाकाऊ पदार्थ (बायोमास) एकत्र करून तयार केलेल्या कांड्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. टाकाऊ वस्तूंमधून तयार होणाऱ्या इंधनावर चालणाऱ्या या शेगडीवर विविध खाद्यपदार्थ सहजपणे तयार करता येतात आणि या कांड्यांची किंमत देखील १२ रुपये प्रति किलो एवढी माफक आहे.

या शेगडीची रचना अशी आहे की, इंधन जळताना त्याला आवश्यक तेवढी हवा मिळते. त्यासाठी शेगडीत संगणकामध्ये वापरला जाणारा लहान पंखा बसवण्यात आला आहे. हा पंखा लहान रिचार्जेबल बॅटरीवर साधारण ७ तास चालतो. तसेच शेगडीतील ज्वाला नियंत्रित करण्यासाठी एक विशेष बटन देण्यात आले आहे. या बटनच्या साहाय्याने ज्वाला कमी जास्त करता येते. त्यामुळे ज्वलन अधिक प्रभावी होते आणि निर्माण होणारी उष्णता थेट भांड्याकडे पोहोचते. परिणामी उष्णतेचा अपव्यय कमी होतो आणि अन्न लवकर शिजते. शेगडीच्या वरच्या भागावर मोठी कढई, तवा किंवा भांडे ठेवण्याची सोय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजी, भात, खिचडी तसेच इतर पदार्थ सहज तयार करता येतात.

पारंपरिक चुलीत अनेकदा मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. मात्र विष्णू शेगडीच्या विशेष रचनेमुळे इंधन अधिक पूर्णपणे जळते आणि धूर तुलनेने कमी होतो. त्याचबरोबर अधिक तापमान निर्माण होत असल्यामुळे मोठ्या कढयांमध्ये स्वयंपाक करणे सोपे होते आणि वेळेची बचतही होते. ही विष्णू शेगडी पारंपारिक इंधनाच्या तुलनेत साधारण ४०% पर्यंत बचत करते.

ही शेगडी मुख्यत्वेकरून कमी खर्चात आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या इंधनावर चालण्यासाठी डिझाइन केलेली आहे. त्यामुळे एलपीजी गॅसवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते आणि स्वयंपाकाचा खर्चही घटतो. ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या या इंधनामुळे ही शेगडी अधिक उपयुक्त ठरू शकते. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट किंवा हॉटेल बंद करण्याऐवजी अशा पर्यायी साधनांचा वापर करणे अधिक उपयुक्त ठरू शकते. आणि त्यातल्या त्यात “चुलीवरचे जेवण” अशी जाहिरात करून व्यवसाय करणाऱ्या रेस्टॉरंट्सना ही शेगडी म्हणजे अक्षरशः “विष्णूजींचे वरदान”च आहे.

https://www.loksatta.com/nagpur/vishnu-manohar-nagpur-biomass-stove-alternative-to-lpg-gas-shortage-innovation-sap-05-5777796

विष्णू मनोहर हे महाराष्ट्रातील नागपूर येथे वास्तव्यास असलेले आणि संपूर्ण मध्य भारतात अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ आहेत. ते त्यांच्या पाककलेतील नवनिर्मिती आणि जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या ध्यासासाठी ओळखले जातात. ‘मास्टर रेसिपीज’ नावाचे त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनेलवर ते  हिंदी आणि मराठीमध्ये अनेक प्रकारच्या पाककृती दर्शकांबरोबर शेअर करतात. त्यांच्या “मनोहर ग्रुप्स”ची असून पुणे, नागपूर आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये त्यांची ‘विष्णूजी की रसोई’ नावाची प्रसिद्ध रेस्टॉरंट्स आहेत.

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक सोहळ्यात विष्णू मनोहर यांनी १.५ लाख रामभक्तांसाठी ७ टन “प्रसादाचा शिरा” बनवला होता. आपल्यासाठी त्यांची ही सेवावृत्ती व पाक कौशल्य परिचयासाठी पुरेशी आहे.

स्वयंपाकाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोगांसाठी देखील विष्णू मनोहर ओळखले जातात. देश-विदेशात त्यांनी हजारो लोकांसाठी स्वयंपाकाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये गॅसचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर, वाढता खर्च आणि उष्णतेचा अपव्यय या समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या. या पार्श्वभूमीवर कमी खर्चात आणि अधिक कार्यक्षमतेने स्वयंपाक करता येईल अशी शेगडी विकसित करण्याचा प्रयोग त्यांनी सुरू केला आणि त्यातून ‘विष्णू शेगडी’ ही संकल्पना आकाराला आली.

आखाती देशातील युद्धाच्या भडक्यामुळे निर्माण झालेल्या तात्पुरत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर विष्णू मनोहर यांनी विकसित केलेली विष्णू शेगडी ही देशाच्या विशेषतः ग्रामीण भागासाठी कायमस्वरूपी वरदानच ठरणार आहे.

https://www.jagran.com/maharashtra/mumbai-chef-vishnu-manohar-of-nagpur-will-make-ram-halwa-for-the-consecration-ceremony-seven-thousand-kilograms-of-halwa-will-made-23623548.html

 

योजकस्तत्र दुर्लभः

१० ऑगस्ट २०१८ रोजी जागतिक जैवइंधन दिनानिमित्त (World Biofuel Day) नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदूषण कमी करण्याच्या सरकारच्या योजनांसोबतच ३ रंजक गोष्टी खुबीदारपणे सांगितल्या होत्या.

पहिली होती, सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहाची टपरी चालवणाऱ्या एका दुकानदाराची. दुसरा किस्सा होता गुजरातमध्ये एका ठिकाणी बायोगॅसवर ट्युबवेल चालवण्याच्या कल्पकतेची. आणि तिसरी होती आफ्रिकेतील टाकाऊ प्लास्टिक वितळवून त्यात वाळू मिसळून तयार केलेल्या ब्लॉगच्या अभिनव प्रयोगाची.

त्यातील पहिल्या प्रयोगाचे वर्णन मोदीजींच्या शब्दात असे होते, “मी एकदा वर्तमानपत्रात वाचले की एका छोट्या गावात, कोणीतरी गटाराजवळ चहाचे दुकान लावून चहा विकायचा. जेव्हा चहा संबंधित एखादी बातमी येते, तेव्हा माझं लक्ष त्याच्याकडे पटकन जाते. (यावर कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वजण हसले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या)

तिथेच एक घाणेरडा नाला वाहत होता. त्या चहावाल्याला एक कल्पना सुचली. साहजिकच, त्या घाणेरड्या नाल्यातून वायू बाहेर पडत असणार. कारण तिथे दुर्गंधही येत होती. त्याने एक भांडे उलटे करून त्याला एक छिद्र पाडले. त्या छिद्रात एक पाईप घातला आणि गटारातून बाहेर पडणारा गॅस आपल्या चहाच्या टपरीपर्यंत नेला आणि त्या गॅसवर तो आपला चहा बनवू लागला. सिम्पल टेक्नॉलॉजी आहे”.

मन की बात असो किंवा असे विशेष कार्यक्रम असोत मोदीजी कायमच देशाच्या कानाकोपऱ्यातील कल्पक उद्योजकांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, महिला बचत गटाचे किंवा सामान्यातील सामान्य महिलांचे असोत त्यांनी केलेले अगदी छोट्यातल्या छोटे देखील अभिनव उपक्रम सांगून कौतुक करत असतात. जेणेकरून या सगळ्या उभरत्या कल्पक अभिजनांचा उत्साह वाढावा. त्यांच्या यशस्वी प्रयोगाला समाज मान्यता मिळावी आणि बाकीच्या सामान्य समाज घटकांना आपापल्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण व कल्पक प्रयोग करण्याची प्रेरणा मिळावी.

अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् ।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ॥

अर्थात् ज्याप्रमाणे मंत्र नसलेले अक्षर नसते, औषधी गुण नसलेली वनस्पती नसते, तसेच अयोग्य किंवा गुणहीन असा कोणीही माणूस नसतो. महत्त्वाचे हे आहे की, त्या व्यक्तीमधील गुणांना ओळखून तिला योग्य काम सोपवणारा ‘योजक’ किंवा ‘पारखी’ मिळणे कठीण असते. या संस्कृत श्लोकाप्रमाणे स्फटिकासारख्या निर्मळ हेतूने मोदीजींनी गटारातील गॅसवर चहा बनविणाऱ्या त्या अनामिक चहावाल्याचे कौतुक केले होते.

https://www.aajtak.in/india/story/pm-narendra-modi-world-biofuel-day-biocng-ethanol-nda-govt-560082-2018-08-10

सर्वे सुखिनः सन्तु…

गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहाची टपरी चालवणाऱ्या त्या अनामिक उद्योजकाचे कौतुक करताना मोदीजींचा हेतू हा होता की, नॅचरल गॅससारख्या पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांवर दीर्घकाळ अवलंबून राहणे हितावह नाही. शिवाय गटारातून निघणाऱ्या गॅसमुळे एखाद्या चहावाल्याचा इंधनाचा खर्च वाचून नफा वाढत असेल तर आपण वाचलेले हे यशस्वी उदाहरण देशभरातल्या चहावाल्यांना सांगणे निश्चितपणे कौतुकास्पद आहे.

पृथ्वीच्या पोटात दडलेला हा पारंपारिक ऊर्जेचा स्त्रोत एक दिवस संपणारच आहे शिवाय, जगातील सतत बदलणाऱ्या समीकरणांमुळे त्याचा पुरवठा सातत्याने होत राहील याची कोणतीही शाश्वती नाही. शिवाय या ऊर्जा स्त्रोतांच्या आयातीवर देशाचे बहुमूल्य चलन अतोनात खर्च होत असते. आज ना उद्या याला पर्याय शोधावाच लागणार आहे मग, त्याची सुरुवात आतापासून केली तर त्याचे मनापासून कौतुक करायला हवे. नेमके तेच मोदीजींनी केले.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

अर्थात सगळे सुखी होवोत, सगळे रोगमुक्त राहोत, सगळे चांगल्या, मंगल घटनांचे साक्षीदार बनोत, आणि कोणाच्या वाट्याला दुःख न यावे. मोदीजींची हीच मंगलमय कामना ते उदाहरण सांगण्याच्या मागे होती.

नागुणी गुणिनं वेत्ति…

पण कुठलीही औकात आणि वकूब नसलेल्या सडक्या मनोवृतीच्या तमाम विरोधकांनी आखाती देशात भडकलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तात्पुरत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पराकोटीच्या राजकीय द्वेषापायी मोदीजींच्या (काल्पनिक) “गटारातील गॅस”वरून सोशल मीडियावर यथेच्छ टिंगल केली. एकतर मोदीजींनी आपण वाचलेला किस्सा सांगितला होता. तो काही त्यांनी स्वतः केलेला प्रयोग नव्हता आणि दुसरे म्हणजे या नतद्रष्टांना आमचा एकच सवाल आहे “बायोगॅस” हा देखील तुमच्या दृष्टीने थट्टेचा विषय आहे का?

तर मग स्वयंपाकासाठी एलपीजीला उत्तम आणि स्वस्त पर्याय असलेला. मिथेन (CH4): ५५% ते ६५% (हा वायू प्रामुख्याने जळण्यास मदत करतो) आणि कार्बन डायऑक्साइड (CO2): ३५% ते ४५% मिश्रण असलेला नैसर्गिक असा “बायोगॅस”. जो सेंद्रिय पदार्थांच्या (उदा. शेण, अन्न कचरा, शेतीचा कचरा) ऑक्सिजनशिवाय होणाऱ्या विघटनातून तयार होणारा एक ज्वलनशील वायू आहे. ग्रामीण भागात यालाच सामान्यतः ‘गोबर गॅस’ असेही म्हणतात. भारतात आतापर्यंत अंदाजे ४३.१ लाख घरगुती स्वरूपाचे बायोगॅस/गोबर गॅस प्लांट उभारण्यात आले आहेत. विरोधकांच्या दृष्टीने हा देखील काल्पनिक आणि टिंगलीचा विषय आहे का?

https://share.google/aimode/EDZxbNgknMUiXuhhq

जर शेणापासून गोबर गॅस निर्माण होऊ शकतो तर गटारातील घाणीपासून गॅस तयार का होऊ शकत नाही? आज त्याची व्यावहारिकता सिद्ध झालेली नसली तरी भविष्यात ती होणारच नाही असे समजू नये. ज्या दिवशी त्याची व्यावहारिकता सिद्ध होईल त्या दिवशी आमच्या देशातील तमाम विरोधक तोंडघशी पडलेले असतील.

नागुणी गुणिनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी।
गुणी च गुणरागी च विरल: सरलो जन:॥

याचा अर्थ सांगायचा झाला तर गुणहीन माणूस गुणी माणसाला ओळखू शकत नाही तर एक गुणी माणूस इतर गुणी माणसांचा मत्सर करतो. जो स्वतः गुणीही आहे आणि इतरांच्या गुणांचा चाहता ही आहे असा सरळ माणूस विरळाच.

मोदीजींच्या “गटारातील गॅस” या उदाहरणाची टिंगल करणारे भिकारड्या मानसिकतेचे तमाम विरोधक वरील श्लोकातील नागुणी गुणिनं वेत्ति (गुणहीन माणूस गुणी माणसाला ओळखू शकत नाही) एवढ्याच गुणवत्तेत चपखल बसतात.

अशा कर्मदरिद्री “नागुणी” विरोधकांना सुजाण मतदारांनी सत्तेपासून कायम शंभर पावले दूर ठेवलेलेच बरे.

अन्य लेख

संबंधित लेख