Wednesday, December 4, 2024

पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून मतदार जागृती

Share

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी शासकीय स्तरावरून जसे प्रयत्न सुरू आहेत, तसेच प्रयत्न विविध महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटनांकडूनही सुरू आहेत. पुण्यातील रेणुका स्वरूप कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभागी होत मतदार जागृती केली.

पुण्यातील रेणुका स्वरूप कनिष्ठ महाविद्यालय, निवडणूक आयोग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन तसेच स. प. महाविद्यालयाच्या चौकामध्ये मानवी साखळी, पथनाट्य अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये मतदार जागृती करण्यात आली. मतानादासंबंधी जागृती करणारी घोषवाक्य रंगवलेले फलकही विद्यार्थिनींनी हातात धरले होते. या निमित्ताने विद्यार्थिनींनी मतदानाचे महत्त्व सांगणारी अनेक चित्र तसेच पोस्टर्सही तयार केली आहेत.

१८ वर्षे पूर्ण झालेले नव मतदार किंवा नियमित मतदान करणारे तसेच विविध कारणांमुळे मतदान न करू शकणारे मतदार डोळ्यासमोर ठेवून हे अभियान राबविण्यात आले. रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अभियान उत्तम पद्धतीने झाले. या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती नाईक, पर्यवेक्षक श्री. जगताप, श्रीमती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभियानात २१५ कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक नायब तहसीलदार स्मिता कुलकर्णी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी आणि समन्वय अधिकारी शरद मेमाणे हेही उपस्थित होते.

अभियानात विविध उपक्रमांद्वारे रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे व या दिवशी सुटी घेऊन बाहेर फिरायला जाणे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे मतदान न करणे हे योग्य नाही, हा विचार नागरिकांसमोर मांडला. देशाच्या विकासासाठी मतदान करणे किती आवश्यक आहे, हेही यावेळी सांगण्यात आले. उद्याचा भारत आपणच घडविणार आहोत अशा पद्धतीने मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. प्रशालेतील सर्व पदाधिकारी, शिक्षकांनी व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मतदान प्रतिज्ञा घेऊन या अभियानाची सांगता केली.

अन्य लेख

संबंधित लेख