Thursday, January 29, 2026

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक

Share

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री (२००६ ते २०११) कॉम्रेड व्ही. एस्. अच्युतानंदन यांना जाहीर झालेला पद्मविभूषण (मरणोत्तर) (मृत्यू: २१ जुलै २०२५)  एक प्रचंड चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय झाला आहे.

देशद्रोहाचा कायमचा शिक्का कपाळावर मारलेला गेलेल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या ज्या केरळमध्ये कम्युनिस्टांनी रा.स्व. संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांची हत्या केली. त्या केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जेष्ठ नेत्याला त्यातही माजी मुख्यमंत्र्याला भारतरत्नच्या खालोखाल मानला जाणारा “पद्मविभूषण” पुरस्कार. तो ही हिंदुत्व सांस्कृतिक राष्ट्रवाद मानणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून जाहीर व्हावा यामागचे रहस्य समजून घेतले पाहिजे.

जवळपास १०२ वर्षांचे दीर्घायु लाभलेले व्ही. एस्. अच्युतानंदन भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९६४ साली फूट पडल्यानंतर स्थापन झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे सचिव आणि पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य अशा पक्षांतर्गत महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्याचवेळी सुरुवातीला केरळ विधानसभेत आमदार नंतर विरोधी पक्षनेते आणि  वयाच्या ८२ व्या वर्षी केरळचे मुख्यमंत्रीपद तसेच केरळ प्रशासनिक सुधार आयोगाचे अध्यक्षपद अशी सरकारी जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली होती. थोडक्यात म्हणजे व्ही.एस अच्युतानंदन हे आंतरबाह्य कॉम्रेड होते. भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आधारस्तंभ होते.

“बुलडोझर बाबा अच्युतानंदन”…

२००६ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर २००७ साली कॉम्रेड व्ही एस अच्युतानंदन यांच्यात “बुलडोझर बाबा” संचारले. २००७ साली केरळ मधील प्रसिद्ध मुन्नार या थंड हवेच्या ठिकाणी (Hill Station) उभी असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी त्यांनी केरळच्या इतिहासातील अतिक्रमण विरोधी सर्वात आक्रमक अशी “ऑपरेशन मुन्नार” मोहीम राबवायला सुरुवात केली. १३ मे २००७ रोजी ही मोहीम सुरू झाली या मोहिमेची सुरुवात ‘समर कॅसल’ (Summer Castle) हे ५ मजली रिसॉर्ट पाडून झाली. तसेच ‘क्लाउड नाईन’ (Cloud Nine) आणि ‘मुन्नार वूड्स’ (Munnar Woods) यांसारखी बड्या धेंडांची पंचतारांकित रिसॉर्ट्सही कोणतीही दयामाया न दाखवता जमीनदोस्त करण्यात आली. १ महिन्याच्या आत सुमारे ९१ बेकायदेशीर बांधकामे (ज्यात प्रामुख्याने आलिशान रिसॉर्ट्सचा समावेश होता) पाडण्यात आली आणि अतिक्रमण करून हडप केलेली साधारणतः १६,००० एकर जमीन सरकारकडे परत जमा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी आय.ए.एस अधिकारी के. सुरेश कुमार, राजू नारायण स्वामी आणि आय.जी ऋषीराज सिंग या ३ विश्वासू अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यांना प्रसारमाध्यमांनी ‘ब्लॅक कॅट्स’ असे नाव दिले होते. हे ब्लॅक कॅट्स थेट मुख्यमंत्र्यांकडून निर्देश घेत व मुख्यमंत्र्यांना अहवाल देत.

जेव्हा या पथकाने मुन्नारमधील सी.पी.आय (CPI) पक्षाचे कार्यालय पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा सत्ताधारी एल.डी.एफ (LDF) आघाडीतच अंतर्गत विरोध सुरू झाला कारण, भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा सत्ताधारी एल.डी.एफ आघाडीचा एक घटक पक्ष होता. या राजकीय दबावामुळे ही मोहीम सुमारे १ महिन्यानंतर थांबवावी लागली.

मात्र या मोहिमेने मुख्यमंत्री अच्युतानंदन यांची प्रतिमा “डिमाॅलिशन मॅन” आजच्या भाषेत “बुलडोझर बाबा” म्हणून उभी राहिली.

भारताच्या कम्युनिस्टांनी “बुर्झ्वा” (Bourgeois) ठरवलेला कॉम्रेड…

भारतीय कम्युनिस्टांचे एक वैशिष्ट्य आहे. ते शिवीगाळसुद्धा भारतीय भाषेतून न करता परकीय भाषेतून करतात. रशियन भाषेत समर्पक शिव्या नसतील तर त्यांना फ्रेंच भाषेतल्या शिव्यादेखील चालतात. त्यांची लाडकी शिवी आहे “बुर्झ्वा” (Bourgeois). या फ्रेंच शब्दाचा अर्थ होतो “लब्धप्रतिष्ठित” थोडक्यात भांडवलदार.

सडेतोड आणि खमक्या कॉम्रेड व्ही. एस्. अच्युतानंदन यांना (पक्षात आतल्या आत) “बुर्झ्वा” ठरवून २००९ साली भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ने त्यांना पॉलिट ब्युरोमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र ते केरळमध्ये मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते म्हणून काम करत राहतील असा निर्णय घेण्यात आला.

पक्षाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले गेले की, संघटनात्मक मूल्ये आणि शिस्तीचे उल्लंघन झाल्याच्या घटना लक्षात घेऊन व्ही.एस.अच्युतानंदन यांना पॉलिटब्युरोमधून काढून टाकावे.  मात्र त्यांना केरळच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची काही हिम्मत झाली नाही.

“तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा… कॉम्रेड की अवलाद है कॉम्रेड ही बनेगा”…

बुर्झ्वा ठरवून शिस्तभंगाची कारवाई म्हणून आपल्याला पॉलिट ब्युरो मधून डच्चू दिल्याची सल बाळगणाऱ्या कॉम्रेड व्ही. एस.अच्युतानंदन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच २०१० मध्ये दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्यांनी आरोप केला होता की, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) सारख्या कट्टरपंथी संघटना पैसे आणि लग्नाच्या आमिषाने (‘Money and Marriages’) केरळचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या पत्रकार परिषदेने केरळमध्ये प्रचंड खळबळ माजली.

छद्मी सर्वधर्म समभावाच्या आणि मुस्लिम लांगुलचालनाच्या आहारी गेलेल्या संपूर्ण डाव्या आघाडीला कॉम्रेड व्ही. एस.अच्युतानंदन यांचा हा “जो है तो कहा” असा सत्य परंतु हिंदू संघटनांच्या पथ्यावर पडणारा स्पष्ट वक्तेपणा आवडणे अथवा पचनी पडणे शक्यच नव्हते. यामुळे डाव्या आघाडीला केरळमध्ये मिळणारी जी काही थोडी फार मुस्लिम मते होती तीही गमावण्याची नामुष्की ओढवणार होती. त्यांनी कट्टरवादाविरुद्ध घेतलेल्या या भूमिकेमुळे ते तत्कालीन ‘सेक्युलर’ राजकारणात टीकेचे धनीही ठरले होते. त्यांची एकच चूक झाली ती म्हणजे टीकेसाठी त्यांनी निवडलेला कट्टरतावाद हा “इस्लामी कट्टरतावाद” होता.

केरळच्या लव्ह जिहादच्या वास्तववादी “केरला स्टोरी”चे कॉम्रेड शिल्पकार…

केरळमध्ये अन्य धर्मीय तरुणींचे धर्मांतर करून त्यांना इस्लामी कट्टरवादाकडे वळवले जात असल्याचे  मुख्यमंत्री कॉम्रेड व्ही. एस.अच्युतानंदन यांनी अधिकृतरीत्या मान्य केले होते. त्यांचे हे विधान ‘द केरळ स्टोरी’ सारख्या चित्रपटांमध्येही संदर्भासाठी वापरण्यात आले आहे. केरळमधील “लव्ह जिहाद” पीडित अनेक कुटुंबांनी (उदा. हादिया प्रकरण, निमिषा संपत यांचे कुटुंब) मुख्यमंत्री अच्युतानंदन यांच्या या विधानांचा आधार घेत सरकारकडे दाद मागितली होती. त्यानंतर काही हिंदू संघटनांकडून या कुटुंबांना भेट देण्याचे किंवा त्यांना पाठिंबा देण्याचे काम सुरू करण्यात आले होते. केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनीच “लव्ह जिहाद” वर शिक्कामोर्तब केल्यामुळे डाव्या आघाडीची तसेच तमाम पुरोगामी लिबरल सेक्युलर मंडळींची प्रचंड वैचारिक कोंडी झाली आणि त्याची परिणती म्हणून कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन डाव्यांच्या आणि तमाम सेक्युलर गॅंगच्या मनातून उतरले.

मात्र कॉम्रेड व्ही.एस.अच्युतानंदन यांचा हाच “वस्तुस्थिती स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा” त्यांना पद्मविभूषण देण्यामागे कारणीभूत असावा.

नुसतं घासून नाहीतर ठासून… अगदी नाकावर टिच्चून…

मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व पक्षाच्या दृष्टीने वादग्रस्त ठरलेल्या त्यांच्या वक्तव्यांमुळे केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात कॉम्रेड व्ही. एस.अच्युतानंदन यांचे कॉम्रेड पिनराई विजयन यांच्या गटाशी असलेले मतभेद आणि त्यांच्या एकाधिकारशाहीवरून पक्षात त्यांना विरोध होता. वयोमानाचे (८७ वर्षे) कारण देऊन त्यांना तिकीट नाकारल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रचंड क्षोभ उसाळला. जनतेने आणि कार्यकर्त्यांनी कॉम्रेड व्ही. एस.अच्युतानंदन यांना तिकीट नाकारण्याला तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे कधी नव्हे ते पक्षाला बॅकफूटवर जावे लागले. एक प्रकारे शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर प्रचंड नामुष्की ओढवली होती. कॉम्रेड व्ही. एस.अच्युतानंदन यांना विधानसभेचे तिकीट मिळाले.

तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी २०११ च्या निवडणुकीत मलमपुझा (Malampuzha) मतदारसंघातून विजय मिळवला आणि वयाच्या ८७ व्या वर्षी कॉम्रेड व्ही. एस.अच्युतानंदन विरोधी पक्षनेते बनले. नुसतं घासून नाहीतर ठासून. अगदी पक्षांतर्गत विरोधकांच्या नाकावर टिच्चून.

मात्र या निवडणुकीतील डाव्या आघाडीच्या पराभवाचे खापर त्यांनी राज्य नेतृत्वाने चुकीचे उमेदवार निवडल्याने झाल्याचा आरोप करत पक्षांतर्गत विरोधकांच्या डोक्यावर फोडले. आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार बनू नये असे वाटणाऱ्यांनीच आपल्या सरकारचा पराभव घडवून आणल्याचा देखील त्यांनी दावा केला होता. एका अर्थी हा आरोप राज्यातील आपले पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आजचे केरळचे मुख्यमंत्री कॉम्रेड पिनराई विजयन यांच्यावर केला होता. मात्र आपल्या सर्व पक्षांतर्गत विरोधकांना नमवून कॉम्रेड व्ही. एस.अच्युतानंदन हे विरोधी पक्षनेते बनले… पूर्ण ५ वर्षे… अगदी २०१६ पर्यंत…

२०१९ साली त्यांना सौम्य ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली. ते घरीच विश्रांती घेत. २१ जुलै २०२५ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी तिरुअनंतपुरम येथे त्यांनी या जगाला लाल सलाम करत कायमचा निरोप घेतला.

पुण्य हवे नशिबाला… अन्यथा निघा वनवासाला…

कम्युनिस्ट पक्षाची एक विशेष कार्यशैली आहे. पक्षाशी कोणत्याही प्रकारची गद्दारी करणाऱ्या स्वपक्षीय कार्यकर्त्यांना व कॉम्रेडसना ते संपवून टाकतात. अगदी जीवानिशी देखील. मात्र ते शक्य नसेल तर त्यांना “बुर्झ्वा” ही ठराविक लाडकी शिवी देऊन मेलेल्या उंदरासारखे पक्षातून उचलून भिरकावून देतात आणि मग हे कॉम्रेड्सना अक्षरशः राजकीय वनवासात धाडून देत.

“संघटनात्मक मूल्ये आणि शिस्तीचे उल्लंघन” याच कारणासाठी साक्षात आपल्या पक्ष संस्थापकाला कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना १९८१ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाने उचलून पक्षाबाहेर फेकून दिले होते. No Mercy at any cost…

कॉम्रेड सोमनाथ चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नेते. यूपीए-१ (UPA-1) च्या काळात लोकसभेचे अध्यक्ष झाले होते. मात्र २००८ साली भारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्द्यावर डाव्या पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमनाथ चॅटर्जी यांना लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सरकारच्या विरोधात मतदान करण्यास सांगितले होते. कॉम्रेड सोमनाथ चॅटर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते एका विशिष्ट राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नसून तटस्थ घटनात्मक पदावर आहेत त्यामुळे राजीनामा देण्यास आणि पक्षाच्या आदेशानुसार मतदान करण्यास नकार दिला.

झालं… “संघटनात्मक मूल्ये आणि शिस्तीचे उल्लंघन” असा आरोप ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून बडतर्फ केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर १० वेळा खासदार झालेला हा कॉम्रेड पक्षाने मेलेल्या उंदरासारखा उचलून बाहेर फेकून दिला.

कॉम्रेड सोमनाथ चॅटर्जी यांनी या हकालपट्टीबद्दल “हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा दिवस आहे” अशी भावना व्यक्त केली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते पक्षबाह्यच राहिले.

त्या मानाने कॉम्रेड व्ही. एस.अच्युतानंदन बरेच सुदैवी ठरले. तेच आरोप असून देखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे शक्य झाले नाही. यावरून त्यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील निर्विवाद महत्त्व अधोरेखित होते.

इकडे आड तिकडे विहीर… मध्ये सापडले कॉम्रेड वीर…

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य यांनी जानेवारी २०२२ मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता.

कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य यांनी एका निवेदनात स्पष्ट केले होते की, “मला या पुरस्काराबद्दल काहीही माहिती नाही आणि कोणीही याबद्दल माझ्याशी चर्चा केलेली नाही. जर मला हा पुरस्कार जाहीर झाला असेल, तर मी तो नाकारतो.

तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अर्थात CPI(M) चे असे धोरण आहे की त्यांचे नेते राज्य सरकारकडून दिले जाणारे असे नागरी सन्मान स्वीकारत नाहीत. पक्षाने स्पष्ट केले की त्यांचे कार्य लोकांसाठी आहे, पुरस्कारांसाठी नाही आणि यापूर्वीही कम्युनिस्ट नेते कॉम्रेड ई.एम.एस.नंबुद्रीपाद (१९९२ मध्ये पद्मविभूषण) आणि कॉम्रेड ज्योती बसू (२००८ मध्ये भारतरत्न) यांनी अशाच प्रकारे सरकारी पुरस्कार नाकारले होते”.

या वादावर केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले होते की, पुरस्काराची घोषणा करण्यापूर्वी भट्टाचार्य यांच्या कुटुंबाला फोनद्वारे कळवण्यात आले होते, परंतु त्यावेळी त्यांच्याकडून कोणताही विरोध दर्शवण्यात आला नव्हता त्यामुळे त्यांचा हा नकार राजकीय दृष्टिकोनातून दिला गेला असावा.”

आज कॉम्रेड व्ही.एस.अच्युतानंदन हयात नाहीत. त्यांच्या वतीने पुरस्कार घेणे अथवा नाकारणे त्यांचे कुटुंबीय करू शकतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या फंदात न पडलेले बरे. कारण कॉम्रेड व्ही.एस.अच्युतानंदन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी अवघड जागेचे दुखणे होते. असून अडचण नसून खोळंबा आणि “संघटनात्मक मूल्ये आणि शिस्तीचे उल्लंघन” केल्यामुळे ज्यांची पॉलिट ब्युरोमधून हकालपट्टी केलेली होती. त्या कॉम्रेड व्ही.एस.अच्युतानंदन यांच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना दिल्या गेलेल्या “पद्मविभूषण” पुरस्कारावर कोणतीही प्रतिक्रिया देणे हा कृतघ्नपणा ठरेल.

समजा तात्विक दंभतेचा आव आणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हा पुरस्कार न घेण्याचे ठरवले पण कॉम्रेड व्ही.एस.अच्युतानंदन यांच्या कुटुंबीयांनी मनाचा मोठेपणा दाखवून या देशाने केलेला सन्मान समजून तो स्वीकारण्याचे मान्य केले तर…? किंवा शक्यता कमी असली तरीही याच्या नेमके उलट झाले तर…? “मालकाचे हाल आणि कोल्हेकुत्रे लालेलाल” अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची केरळ मधली उरलीसुरली अब्रू मातीमोल होईल.

कॉम्रेड व्ही.एस.अच्युतानंदन यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करून यावर्षी होणाऱ्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने सत्ताधारी डाव्या आघाडीच्या अत्यंत अवघड परंतु योग्य जागी अचूक लाल पाचर मारली आहे.

– पराग नेरूरकर

अन्य लेख

संबंधित लेख