दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या (Mumbai Tarun Bharat) वरिष्ठ प्रतिनिधी योगिता साळवी (Yogita Salvi) यांचा महिला दिनानिमित्त झालेला सन्मान म्हणजे आणि समाजाभिमुख आणि जाज्वल्य पत्रकारितेचा गौरव होय. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये सामाजिक न्याय या विभागाचे काम साळवी यांच्याकडे आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.’तर्फे सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दादर शाखेचे संतोष गोडसे यांच्या हस्ते साळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्यात अग्रेसर
योगिता साळवी या मुंबईच्या असून एम. ए. (समाजशास्त्र) आणि एम. ए. (मास मिडिया) असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. मुंबईतील ‘स्वयम् महिला मंडळा’च्या त्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाची आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती तसेच भारत सरकारचे फिल्म सेन्सॉर बोर्ड याच्याही त्या सदस्य आहेत. व्यसनांच्या विरोधातील चळवळीत पथनाट्याच्या माध्यमातून त्या गेली अठरा वर्षे सक्रिय आहेत. महिला सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही त्या गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहेत. आरोग्य आणि पर्यावरण या विषयावर मुंबईतील वस्त्यांमध्ये जनजागृतीसाठी त्या शिबिरे आयोजित करतात. स्वयम् महिला मंडळ आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २०१५ पासून मुंबईत तीन वस्त्यांमध्ये अभ्यास केंद्रे तसेच सद्वर्तन शिक्षण वर्गांची योजना त्यांनी केली आहे. समाजातील जागरूकतेसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – एक राष्ट्रनायक’ या विषयावर व्याख्याने देण्याचा उपक्रम त्या गेली सात वर्षे करत आहेत. धार्मिक, प्रादेशिक आणि जातीभेद दूर करण्यासाठी तसेच सामाजिक एकात्मतेसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही त्या सातत्याने करतात.
व्याख्यानांचा उपक्रम
आपल्या संविधानाचे महत्त्व नागरिकांना समजावे यासाठी ‘संविधानाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्याने देण्याचा उपक्रमही साळवी गेल्या सात वर्षांपासून करत आहेत. ‘लव्ह जिहाद’ या विषयावरील संशोधन हे त्यांचे महत्त्वाचे कार्य ठरले असून या विषयावर जनमानसातील जागृतीसाठी साळवी यांनी २७६ व्याख्याने दिली आहेत. या विषयावरील जनजागृतीसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या आहेत. हिंदू सण, पारंपरिक कारागिरी, नक्षलवाद, पश्चिम बंगालमधील सामाजिक आणि राजकीय अराजकता यासह अन्यही विषयांवर साळवी यांनी संशोधनही केले आहे.
सामाजिक अन्याय, महिलांवरील अन्याय आदी अनेक विषयांना विरोध करण्यासाठी झालेल्या उपक्रमांमध्येही साळवी यांची भूमिका नेहमीच सक्रिय राहिली आहे. लव्ह जिहादच्या संदर्भाने झालेला आक्रोश मोर्चा (२०२२), हिंदू जनआक्रोश मोर्चा (२०२३), आक्रोश मोर्चा आणि जनसभा तसेच महाराष्ट्र शासनाचा २०२४ मधील बौद्ध फेस्टिव्हल अशा विविध उपक्रमांच्या आयोजनामध्ये साळवी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
योगिता साळवी यांच्या या सामाजिक तसेच पत्रकारितेतील कार्याची दखल अनेक संस्था तसेच शासनाने घेतली असून अनेक पुरस्कारांनीही त्यांचा सन्मान झाला आहे. ‘महापौर पुरस्कार’, पत्रकारितेतील योगदानासाठी ‘लोकगौरव पुरस्कार’, विश्व संवाद केंद्राचा ‘देवर्षी नारद पुरस्कार’, पहिला ‘मूकनायक पुरस्कार’, सावित्रीबाई फुले मंडळाचा ‘सावित्रीबाई फुले जनजागृती पुरस्कार’ यासह विविध पुरस्कारांनी साळवी यांना गौरविण्यात आले आहे.
समाजाभिमुख पत्रकारिता कशी करता येते, याचे उदाहरणच साळवी यांनी त्यांच्या कृतिशीलतेतून घालून दिले असून सामाजिक कार्यात असलेली त्यांची सक्रियताही अभिनंदनीय अशीच आहे.