बीड : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून, यामुळे ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.
वसतिगृह योजनेचा तपशील:
‘संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील ५ महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ (मुलगा व मुलगी) आणि बीड शहरात १ अशी एकूण ११ वसतिगृहे उभारली जाणार आहेत:
पाटोदा: २ वसतिगृहे
केज: २ वसतिगृहे
परळी: २ वसतिगृहे
गेवराई: २ वसतिगृहे
माजलगाव: २ वसतिगृहे
बीड: १ (मुलींचे शासकीय वसतिगृह)
अजितदादांच्या धोरणांचा वारसा पुढे नेणार
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, “अजितदादा जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हापासूनच त्यांनी या वसतिगृहांच्या जागेसाठी आणि दर्जासाठी पाठपुरावा केला होता. ‘सारथी’ संस्थेच्या वसतिगृहांच्या धर्तीवर ही बांधकामे अत्यंत दर्जेदार असावीत, अशा त्यांच्या सूचना होत्या. दादांच्या विकासाभिमुख धोरणांचा वारसा पुढे नेत हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत.”
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक
नुकतीच बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या:
१. काटेकोर खर्च: विकासकामांसाठीचा संपूर्ण निधी योग्य आणि पारदर्शक पद्धतीने खर्च व्हावा.
२. वेळेचे बंधन: ठरलेल्या वेळेत सर्व कामे पूर्ण व्हावीत, कोणतीही कामे अर्धवट राहू नयेत.
३. उत्कृष्ट दर्जा: बांधकामांचा दर्जा उत्कृष्ट असावा, यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.