Wednesday, December 17, 2025

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’

Share

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि उबाठा गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उबाठा गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेचा पाढा वाचत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांची तुलना केली आहे. “मुंबई कोणाची? घराणेशाहीची की विकासाची?” असा थेट सवाल त्यांनी मुंबईकरांना विचारला आहे.

वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या उबाठा गटाकडून मुंबईकरांना नेमकं काय मिळालं, असा सवाल उपस्थित करत भारतीय जनता पार्टीने जोरदार टीका केली आहे. भाजपा महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावरून उबाठा गटाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत.

उबाठा गटाच्या सत्तेत मुंबईला काय मिळालं?

केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, मुंबईत रस्त्यांचे जाळे उभे राहण्याऐवजी खड्ड्यांचे जाळे तयार झाले. शहरात योग्य नियोजनाचा अभाव असून, पावसाळ्यात मुंबई ठप्प होण्याचे चित्र वारंवार दिसते. स्वच्छतेच्या बाबतीत नालेसफाईत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असतानाही ठोस कारवाई झालेली नाही. कचरा उचलण्याच्या व्यवस्थेत दलाली वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.

“ना ठोस व्हिजन, ना धोरण, ना जबाबदारी—मुंबईला सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार चालवण्यात आलं आणि मुंबईकरांनी ते सहन केलं,” असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व म्हणजे निर्णय, दिशा आणि डिलिव्हरी!

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासाला ठोस दिशा मिळाल्याचे सांगत उपाध्ये यांनी विविध प्रकल्पांचा उल्लेख केला. मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईला वेग मिळाला, वातानुकूलित लोकलमुळे मुंबईकरांना सन्मान मिळाला, तर कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय झाला, असा दावा त्यांनी केला.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतून मराठी माणसाला हक्काचं घर मिळालं, डब्बेवाला भवनाच्या माध्यमातून कष्टकरी वर्गाचा सन्मान झाला, तसेच नव्या विमानतळांमुळे मुंबईच्या जागतिक विस्ताराला चालना मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘फरक स्पष्ट आहे!’
केशव उपाध्ये यांनी शेवटी मुंबईकरांना आवाहन करताना म्हटले की, “एकीकडे अपयशाची सवय आहे, तर दुसरीकडे कामगिरीची ओळख. ही निवडणूक म्हणजे भूतकाळ की भविष्य आणि घराणेशाही की विकास,” हा निर्णय मुंबईकरच घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख