Saturday, December 20, 2025

INDvSA : हार्दिक-तिलकचं वादळ अन् वरुणचा कहर; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ‘महाविजय’, मालिका ३-१ ने खिशात!

Share

INDvSA : दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची सुरुवात जरी कसोटी विजयाने केली असली, तरी टी-२० मालिकेत मात्र टीम इंडियाने त्यांना धूळ चारली आहे. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या ५ व्या आणि निर्णायक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने ५ सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने ५ बाद २३१ धावांचा डोंगर उभा केला. या डावाचा खरा हिरो ठरला तो हार्दिक पंड्या. हार्दिकने अवघ्या २५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे, ज्या अहमदाबादच्या प्रेक्षकांनी आयपीएलमध्ये हार्दिकला ट्रोल केले होते, त्याच प्रेक्षकांनी आज उभे राहून त्याच्या खेळीला दाद दिली.

हार्दिकला तिलक वर्माची मोलाची साथ लाभली. तिलकने ४२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ७३ धावा कुटल्या. या जोडीने चौथ्या विकेटसाठी अवघ्या ४४ चेंडूत १०५ धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. परंतु, कर्णधार सूर्यकुमार यादव (५) पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी असेल.

जखमी शुभमन गिलच्या जागी संधी मिळालेल्या संजू सॅमसनने (३७) आणि अभिषेक शर्माने (३४) भारताला पॉवरप्लेमध्ये तुफानी सुरुवात करून दिली. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भारताला २३१ पर्यंत पोहोचणे सोपे झाले.

२३२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक (६५) धोकादायक ठरत होता. दक्षिण आफ्रिका १ बाद ११८ या मजबूत स्थितीत असताना जसप्रीत बुमराहने त्याला बाद करून ‘ब्रेकथ्रू’ मिळवून दिला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने १३ व्या षटकात एडन मार्कराम आणि डोनाव्हन फरेरा यांना बाद करत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले. वरुणने ५३ धावांत ४ बळी घेतले.

कर्णधार सूर्यकुमार यादवने या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिले. “आम्ही ज्या पद्धतीने आक्रमक क्रिकेट खेळलो, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” अशी भावना त्याने व्यक्त केली. २०२५ या वर्षाचा टी-२० फॉरमॅटमधील शेवट टीम इंडियाने दिमाखात केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख