होणार होणार म्हणून गेली कित्येक दिवस बोंबाबोंब चालली होती… शेवटी एकदाचं गंगेत घोडं न्हालं… गेले कित्येक दिवसांचे अनैतिक संबंध आता जाहीरपणे नैतिकतेने बांधले गेले… झाली बाबा शेवटी एकदाची युती…
युती कसली… ७४ हजार कोटी वार्षिक उलाढाल असलेली मुंबई महानगरपालिका आपली वडिलोपार्जित संपत्ती असल्यासारखे गेली ४o वर्षे तोऱ्यात मिरवणारे ठाकरे बंधू… या निवडणुकीत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित महायुती आपल्याला दणकून धोबीपछाड देणार हे लक्षात आल्यामुळे… “तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू टक्केवारीच्या माळा” करत एकत्र आले आहेत…
मोठ्या राणा भीमदेवी थाटात दोघा भावांनी युतीची घोषणा तर केली पण जागावाटप गुलदस्त्यातच ठेवले… लवकरच कळेल जागावाटपात “गुल” कोण होतो आणि “दस्त” कोणाला लागतात ते…

पण यांना खरी भीती आहे ती एकदा का जागावाटप केले की उमेदवार जाहीर करावे लागणार… आणि आयत्यावेळी आपले उमेदवार अन्य पक्षात गेले तर?…
आपल्याच कार्यकर्त्यांविषयी उमेदवारांविषयी एवढा अविश्वास कशामुळे असावा?… जे स्वतः विकाऊ आहेत… टाकाऊ आहेत… ते टिकाऊ माल कसा बरं बनवू शकतील?…
कोणीही राजकीय पक्षांची मुलं पळवत नाही… तुमचीच मुलं पळपुटी असावीत… कारण तुम्ही त्यांच्यावर संस्कारच तसे केले आहेत…

महाराष्ट्रापेक्षा काहीच मोठं नाही… वादही मोठे नाहीत… असं सांगणाऱ्या राज ठाकरेंनी हे ज्ञानामृत गेली २० वर्ष कुठे लपवून ठेवलं होतं देव जाणे…
२० वर्षांपूर्वी विठ्ठलाच्या ज्या बडव्यांना शिव्या देत राज ठाकरे शिवसेने बाहेर पडले होते… त्याच बडव्यांच्या मांडीला मांडी लावून आज ते बसले होते…

आमचे विचार एकच आहेत म्हणून थापा मारणाऱ्या उद्धव ठाकरेंनी… विचार एक असले तरी पक्ष दोन का आहेत?… हे मात्र सांगितले नाही…
अरे विचार एक आहेत तर करा ना एकमेकांचे पक्ष विलीन… महाराष्ट्राला दिसू देत ना… विचारांसारखा या दोघांचा पक्ष देखील एक आहे… पण ते होणे नाही…
विचार एक आहेत सांगताना युतीची घोषणा मात्र सेना भावनात न करता वरळीच्या हॉटेल ब्ल्यू सी मध्ये केली… तिथेच मुंबईकरांना कळलं तुमचं मनोमिलन किती खोटं आहे ते…
आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे “माराच्या भयाक केलडा नाचता”… म्हणजे मदारी मारेल या भीतीने माकड नाचतं…
जसे २० वर्षांपूर्वी तुम्ही सत्तेसाठी वेगळे झाले होतात… तसे आज त्याच सत्तेच्या लालसेने… भाजपची महायुती निवडणुकीत बेदम मार मारेल म्हणून एक होऊन नाचत आहात…

“मनसे हा संपलेला पक्ष आहे” अशा शब्दात नाईट क्लब प्रेमी आदित्य ठाकरे मनसेची अब्रू काढत होते…
“उठ दुपारी घे सुपारी” म्हणून राज ठाकरेंना… वंदनीय बाळासाहेबांना “थेरडा” म्हणणाऱ्या उबाठाच्या फायर ब्रँड वाचाळ नेत्या सुषमा अंधारे हिणवत होत्या…
आज युतीसाठी उबाठाला त्याच संपलेल्या मनसेच्या आणि सुपारीबाज राज ठाकरेंचे पाय धरावे लागले… याला “लाचारी” म्हणतात…
आणि उबाठाने आपल्या अब्रूचे केलेले खोबरे… “सत्तानारायणा”चा प्रसाद समजून राज ठाकरेंनी एका आवंढ्यात गिळलले आणि ते युतीला तयार झाले… याला “मजबूरी” म्हणतात…
कोडग्या कोडग्या लाज नाही काल बोलले आज नाही… अशी ही लाचारी आणि मजबूरीची युती आहे…

तरी पण त्यातल्या त्यात राज ठाकरेंनी चतुराई करून युतीचे श्रेय लाटलेच…
“एका मुलाखतीत ‘कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे’ या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली”… असं राज ठाकरे म्हणाले…
जणू काही यांची युती झाली नसती तर महाराष्ट्र अरबी समुद्रात बुडाला असता किंवा मुंबईवर सूर्य उगवलाच नसता… २० वर्षे तुम्ही वेगळे होतात तरीही महाराष्ट्राला फरक पडला नाही आणि आता तुम्ही एकत्र आला आहात तरीही काहीही फरक पडणार नाही…
“उंबरातले किडे मकोडे उंबरी करिती लीला” एवढीच तुमच्या युतीची
मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या लेखी किंमत आहे…

या सुपारीबाज (असं मी नाही म्हणत सुषमा अंधारे म्हणतात)… राज ठाकरेंचे खासदार किती तर शून्य… आमदार किती तर शून्य… नगरसेवक किती तर शून्य… आणि यांचा कॉन्फिडन्स बघा… म्हणे मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार…
बहुदा रोज दुपारी उशिरापर्यंत झोपल्यामुळे हा कॉन्फिडन्स आपोआप येत असावा…
मुंबईचा महापौर मराठी होणार हे मोठ्या तावाने सांगता… एकदा त्याच तारस्वरात… मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार… हिम्मत असेल तर एकदा सांगून बघा… मग मुंबईकरांनी मुंबई तुम्हाला दिलीच समजा…
पण ती हिम्मत तुमच्यात नाही हे मुंबईकरांना हे पक्कं ठाऊक आहे… दाऊद इब्राहिम कासकर हा देखील मराठी भाषिकच आहे… उद्या तोही तुम्हाला चालू शकेल… अशी दाट शंका मुंबईकरांना आहे…
मातोश्रीच्या मालकाला बजेट मधलं काही कळत नाही, अशी एकदा त्याने स्वतःच कबुली दिली होती… पण टक्केवारी मात्र बरोबर कळते…
त्या घरमालकापेक्षा मातोश्रीचा हा घरगडी… चहापेक्षा किटली गरम असल्यासारखा… १००% च्या खाली बोलतच नाही…

गेल्यावेळी याच सुपारीबाज (असं मी नाही म्हणत सुषमा अंधारे म्हणतात) भावाचे ७तले ६ नगरसेवक फोडून तुम्ही ८४ वरून ९० वर पोहोचला होतात…
आणि आता युती करून फक्त १००?… बहुमताला ११४ नगरसेवक हवे असताना… थापा मारताना पण १००च?… सरड्याची धाव कुंपणापर्यंत… एक प्रकारे ही पराभवाची कबुलीच आहे…
आज युतीची घोषणा झाली पण जागावाटप गुलदस्त्यात ठेवले… ४ दिवसांपूर्वी ही गरम किटली सांगत होती… जागावाटप पूर्ण झालं आहे, फक्त युतीची केवळ
घोषणा बाकी आहे… मग कुठे आहे जागावाटप?…
उबाठा मनसे युतीची जत्रा आणि कारभारी सतरा… असला केविलवाणा प्रकार आहे…

एकंदरीत मुंबई महापालिकेच्या मतमोजणीच्या दिवशीचा…
१६ जानेवारी २०२६ चा… हा एक फोटो आम्हाला आत्ताच मिळाला आहे…
११ वर्षे यार्डात पडून असलेले हे गंजलेले रेल्वेचे इंजिन… वांद्र्याच्या कोळसा खाणीतील हलक्या प्रतीचा कोळसा भरून चालवायला घेतले… आणि धडाम करून कोसळून कायमचे निकामी झाले…

१६ जानेवारी २०२६ला… महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत विझलेल्या मशालीसारखा दिसणारा हा… वितळायला लागलेला आईस्क्रीमचा कोन पूर्णपणे वितळून मालकाच्या हातातून गळून पडेल… याची मुंबईकर काळजी घेणार आहेत…
कारण मुंबईकरांना मुंबई महापालिकेसाठी एक समर्थ पर्याय लाभला आहे… मुख्यमंत्री देवा भाऊंच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित महायुती… आपली माती आपली माणसं…

तुमच्या या मुंबईकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या किंवा तोडू पाहणाऱ्या डायलॉगचा… “लांडगा आला रे आला झाला” आहे… प्रत्येक निवडणुकीच्या आधी तुम्ही मुंबई गुजरातला जोडायला नेता… निवडणुकीचे निकाल लागले की मुंबई परत आपल्या जागेवर आणून सोडता… जणू काही मुंबईची काळजी फक्त तुम्हालाच आहे…
खूप केलीत मुंबईची काळजी… मुंबईकर कंटाळला आहे तुमच्या या डायलॉगबाजीला… गेली २ दशके मुंबई महापालिका तुमच्या हातात होती… तुमच्या या प्रदीर्घ सत्ताकाळात मुंबईचं सिंगापूर तर झालंच नाही… पण लंडनमध्ये मात्र एक मिनी कलानगर उभं राहिलं असं राजरोसपणे बोललं जातं…
मुंबईकर चांगलेच ओळखून आहे… सारे तुझे बहाणे…
उद्धव ठाकरे आता बस्स करा… आमचे देवा भाऊ आहेत… ते मुंबईकरांची खूप चांगली काळजी घेतील असा आम्हाला विश्वास आहे…

युतीची घोषणा करणाऱ्या पत्रकार परिषदेचा शेवट ठाकरे कुटुंबाच्या पारिवारिक सोहळ्याने झाला… सगळे ठाकरे कुटुंब फोटो सेशनसाठी स्टेजवर एकत्र आले… मधोमध आंब्याचा टाळ होताच…
यातून मुंबईकरांना एकच संदेश दिला गेला…
मुंबईकर मराठी माणसा जागा हो
ठाकरे कुटुंबांच्या कमाईचा धागा हो…
आणि मुंबईकर मराठी माणूस मनातल्या मनात म्हणतो आहे…
नको ही घराणेशाही, नको ही ब्याद
चांगलं आपलं कमळ, नक्की ठेवू याद…
-पराग नेरूळकर