मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीत (मविआ) सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, मविआतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मविआच्या सद्यस्थितीवर जोरदार प्रहार केला असून, “मविआ नावाच्या फसवी एकजुटीचे आता राजकीय विसर्जन झाले आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.
या संदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे, ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की:
“महापालिका निवडणुकांचे अर्ज भरायला सुरुवातही झालेली नाही, तोवरच एक मोठा निकाल लागला आहे!
“पुढील २५ वर्षे मविआ झळकत राहील” अशा पोकळ घोषणा करणाऱ्या मविआचे आता राजकीय विसर्जन झाले आहे.
मविआतील तीन पक्षांची तोंडे आता तीन वेगवेगळ्या दिशांना फिरली आहेत. उबाठा आणि काँग्रेस वेगळे लढणार, शरद पवार गट राष्ट्रवादीसोबत जाणार… म्हणजेच मविआ नावाची फसवी एकजूट आता इतिहासजमा झाली आहे.
हे होणारच होते! कारण या आघाडीला ना विचारधारा होती, ना दिशा, ना भविष्यदृष्टी. फक्त “भाजपा विरोध” हा एकमेव धागा धरून एकत्र आलेले स्वार्थी पक्ष फार काळ टिकू शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सत्तेची लालसा असलेली युती जनतेच्या कसोटीवर कधीच उतरू शकत नाही… आणि मविआ त्याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.”
भाजप प्रवक्त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. केवळ सत्तेच्या मोहापोटी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेल्या या अनैसर्गिक आघाडीचा अंत जवळ आला असल्याचे भाजपने म्हटले आहे. मविआतील फूट आता अधिकृतपणे समोर आल्याने आगामी निवडणुकांमध्ये महायुतीची वाटचाल अधिक सुकर होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.