मुंबई : राज्यात मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रणांगणात भाजपने मतदानापूर्वीच विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि महायुतीचे तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयामुळे भाजपचा राज्यात मोठा विक्रम प्रस्थापित झाला असून, महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच विजयाचा गुलाल उधळला आहे.
८ महापालिकांमध्ये ‘कमळ’ जोरात
सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत एकट्या भाजपचे ८ महापालिकांमध्ये ४४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक यश कल्याण-डोंबिवली महापालिकेत मिळाले आहे. त्याशिवाय पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल, भिवंडी, धुळे, जळगाव, अहिल्यानगर या महापालिकांमध्ये बिनविरोध नगरसेवक निवडून आले आहेत.
फडणवीस-चव्हाण रणनीतीचा करिष्मा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढती लोकप्रियता आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची अचूक निवडणूक रणनीती यामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाल्याचे बोलले जात आहे. “नगरपालिकांनंतर आता महापालिकांमध्येही भाजपच ‘नंबर वन’ ठरू लागला आहे,” अशा शब्दांत केशव उपाध्ये यांनी भाजपच्या वर्चस्वाची ग्वाही दिली.
महायुतीची आकडेवारी काय सांगते?
या निवडणुकीत भाजपपाठोपाठ महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) २२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादीचे २ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे महायुतीचा एकूण आकडा ६८ वर पोहोचला असून, विरोधकांची मात्र मोठी पीछेहाट झाली आहे.
विरोधकांचा सुपडा साफ?
मतदानापूर्वीच इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रामुख्याने कल्याण-डोंबिवली आणि पुणे पट्ट्यात भाजपने मारलेली ही बाजी आगामी निकाल कशा प्रकारचे असतील, याचे संकेत देणारी ठरली आहे.