Saturday, January 3, 2026

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, “हा तर…!

Share

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीने विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. ३५ मधून भाजपचे उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे स्वागत करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, “हा विजय म्हणजे पुण्यातील विकास आणि सुशासनाला मिळालेली ठोस पावती आहे,” अशा शब्दांत आनंद व्यक्त केला.

भाजप कार्यालयात जल्लोष
बिनविरोध निवडीनंतर पुणे शहर भाजप कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भिमरावअण्णा तापकीर, दीपक नागपूरे, विकासनाना दांगट, रवी साळेगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

११ वर्षांतील विकासकामांची पावती
मुरलीधर मोहोळ यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. ते म्हणाले:

“पुण्यनगरीत दोन नगरसेवक बिनविरोध विजयी होणं, हे गेल्या ११ वर्षांत पुण्यात झालेल्या व्यापक विकासकामांचं प्रतीक आहे. मेट्रो, उड्डाणपुलांचं जाळं, प्रशस्त रस्ते आणि पारदर्शक प्रशासन यावर पुणेकरांनी शिक्कामोर्तब केलं आहे. हा केवळ विजय नाही, तर पुणेकरांनी भाजपवर दाखवलेला स्पष्ट विश्वास आहे.”

पुणेकरांचा कौल स्पष्ट!
प्रभाग ३५ मधील या विजयाने आगामी महापालिका निकालांचे संकेत दिले आहेत. “पुणेकरांचा कौल नेमका कोणाकडे आहे, याचं प्रातिनिधीक उत्तर आज मिळालं आहे,” असे सांगत मोहोळ यांनी आगामी निवडणुकीतही भाजपच पुण्याचा गड राखणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

राज्यात एका बाजूला महायुतीने विकासाचा अजेंडा मांडला असताना, दुसऱ्या बाजूला अनेक जागांवर विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय तज्ज्ञांच्या मते हा विरोधकांचा पराभव स्वीकारण्याचा प्रकार आहे. पुण्यातील या दोन जागांच्या विजयाने महापालिकेतील सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीकडेच राहतील, असे संकेत मिळत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख