बारामती : महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यासाठी राज्यासह देशातील दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी बारामतीत पोहोचले आहेत.
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तीव्र दुःख व्यक्त केले होते. आज स्वतः अमित शाह यांनी बारामतीत येऊन अजितदादांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासूनच या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. “अजितदादा केवळ आमचे सहकारी नव्हते, तर ते कुटुंबातील सदस्याप्रमाणे होते,” अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तर देवेंद्र फडणवीस यांनी “एक दमदार मित्र आणि कार्यक्षम प्रशासक हरपला” अशा शब्दांत आपल्या भावना पुन्हा एकदा मांडल्या.
बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात शासकीय इतमामात अजितदादांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केवळ नेतेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत दाखल झाले आहेत. “अजितदादा अमर रहे”, “परत या परत या अजितदादा परत या”च्या घोषणांनी संपूर्ण बारामती परिसर दुमदुमून गेला आहे.