खोट्याच्या गोंगाटात सत्याचा आवाज क्षीण होतो. वस्तुस्थितीला मागे टाकून दंतकथाच अधिक चवीने चर्चिल्या जातात. कधी कधी या दंतकथा देशाचे सार्वभौमत्व, देशाची प्रतिमा यांच्यावरही विपरीत परिणाम करतात. मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबतचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान ही देखील अशीच एक दंतकथा आहे.
कधी कधी वास्तवापेक्षा दंतकथा अधिक वेगाने पसरतात. त्या समाज मनावर खोलवर परिणाम करतात. वस्तुस्थितीला मागे टाकून काळाच्या पटलावर मोठ्या होतात. मग याच दंतकथांना खरे मानून लोक आपले मत, भूमिका ठरवतात. आधुनिक काळात अशा दंतकथांचा उपयोग राजकीय विमर्श ठरवण्यासाठी केला जातो. पण हे करत असताना याचे दूरगामी परिणाम काय होतील, यामुळे समाजावर, देशाच्या प्रतिमेवर आणि माणुसकीवर काय आघात होतील याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केले जाते. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या बाबतच्या विधानामुळे पुन्हा एकदा एक नवी दंतकथा समोर आली.
कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी अशीच एक दंतकथा समोर आणली. २६ डिसेंबर २००८ रोजी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवाद्यांच्या गोळीने झालेला नाही असा दावा करत वडेट्टीवार यांनी याबाबत संघावर काही आरोप केले. आणि अशा लोकांना पाठीशी घालण्याचे काम विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले, असाही आरोप केला. आपल्या विधानाला पुष्टी देताना त्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांच्या ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकाचा दाखला दिला आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ला होऊन आज तब्बल सोळा वर्षे उलटून गेली. मग वडेट्टीवार यांना ही दंतकथा आत्ताच का सुचली? गेल्या सोळा वर्षात पुस्तकातील आरोप सिद्ध करण्यासाठी पुस्तकाचे लेखक किंवा वडेट्टीवार यांनी काय केले? असे प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतात. वडेट्टीवार यांच्या विधानाचे परिणाम काय हे पाहण्याआधी या विषयातील वस्तुस्थिती काय आणि या वादग्रस्त विधानाचा उद्देश काय हे पाहणे अधिक योग्य ठरेल. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याचे सरकारी वकील उज्वल निकम हे होते. ते भारतीय जनता पक्षाकडून उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांना बदनाम करण्यासाठी हे विधान केले गेले. वास्तविक मुंबई दहशतवादी हल्ल्याचा तपास होऊन शिक्षा देखील देण्यात आली आहे. तरीदेखील संघ आणि उज्ज्वल निकम यांना बदनाम करण्यासाठी हे विधान केले गेले आहे. वडेट्टीवार यांचाच काँग्रेस पक्ष २००८ ते २०१४ या काळात राज्यात आणि केंद्रात सत्तेवर होता. या कालावधीत त्यांनी त्यांच्या दंतकथेप्रमाणे तपास का केला नाही? या प्रश्नातच त्यांच्या विधानातील फोलपणा स्पष्ट होतो.
पाकिस्तान मध्ये राहणारे आणि तेथेच दहशतवादाचे प्रशिक्षण घेतलेले अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईमध्ये आले. त्यांनी २६ डिसेंबर २००८ रोजी मुंबईमधील महत्त्वाच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून सुमारे अडीचशे पेक्षा जास्त लोकांचे बळी घेतले. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचाही समावेश आहे. वडेट्टीवार यांच्या आरोपांबाबत त्याला पुष्टी देणारे कोणतेही पुरावे वडेट्टीवार यांच्याकडे नाहीत. याउलट वडेट्टीवार यांचा विमर्श साफ चुकीचा असल्याचे अनेक पुरावे या खटल्याच्या सुनावणीमध्ये नोंदवले गेले आहेत. त्यातील पहिला पुरावा दहशतवादी अजमल कसाब व अबू इस्माईल यांच्या जबाबात आहे. त्यांनी दिलेल्या जबाबतील माहितीनुसार, कसाब याने त्या रात्री पोलिसांची गाडी येताना पाहिली. त्याने आपल्या बंदुकीतून त्या गाडीवर फायरिंग केले. यामध्ये गाडीतील पोलीस मृत्युमुखी पडले. त्यानंतर कसाबने गाडीचा दरवाजा उघडून त्यातील मृतदेह बाहेर टाकले. आणि गाडी घेऊन तो पुढे गेला. त्यानी केलेल्या हल्ल्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर हे मृत्युमुखी पडले. याच बाबतचे दुसरे प्रत्यक्षदर्शी कॉन्स्टेबल जाधव हे आहेत. ते देखील या गाडीमध्ये होते. कसाबने केलेल्या फायरिंग मध्ये ते जखमी झाले पण ते जिवंत होते. त्यांनी मृत्यूचे नाटक केले. कसाब जेव्हा गाडी घेऊन जात होता त्यावेळी ते त्याच गाडीमध्ये होते. त्यांनी देखील कसाबच्या फायरिंग मध्ये वरिष्ठ तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. ज्यावेळी कसाब पोलिसांच्या वाहनावर गोळ्या झाडत होता त्याच दरम्यान तेथून अन्य एक शासकीय वाहन गेले. त्यातील व्यक्तीने देखील या प्रकाराची पुष्टी केली आहे.
दहशतवादी आणि पोलीस यांचे न्यायालयातील जबाब. प्रत्यक्षदर्शींनी दिलेली साक्ष. तपास यंत्रणांच्या हाती लागलेले पुरावे. या सर्व गोष्टींची नोंद घेत न्यायालयाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली. त्यानंतरही वडेट्टीवर अशा प्रकारच्या दंतकथा समाजात एका निराधार पुस्तकाचा दाखला देऊन पसरवत आहेत. हे सगळे करण्यामागे त्यांचा एकमेव उद्देश उज्ज्वल निकम यांना बदनाम करून निवडणुकीत पराभूत करण्याचा आहे.
वडेट्टीवार यांच्या विधानाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान उपयोगी होऊ शकते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत त्याच्या तपासा बाबत विनाकारण संभ्रम निर्माण करण्यासाठी वडेट्टीवार यांचे विधान वापरले जाऊ शकते. वस्तुस्थिती नाकारून काळाच्या पटलावर वडेट्टीवार यांनी मांडलेली दंतकथा मोठी होईल की काय असा धोकाही यातून निर्माण होणार आहे. सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरू आहे. ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल. कोणाचातरी विजय होईल कोणीतरी पराजित होईल. त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होतील. प्रसार माध्यमातील बातम्यांचे विषय आणि प्राधान्यक्रमही बदलतील. राजकीय आरोप प्रत्यारोपांचा गाळ तळाशी जाऊन बसेल.
असे असले तरीही २००८-२०१४ काँग्रेसचे राज्य असताना काँग्रेसने या संशयाचा छडा का लावला नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर कोण देणार. आरोप खोटे असल्याने हातात काहीच लागू शकणार नाही याची काँग्रेसलाही खात्री होती काय?
प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)