Thursday, September 19, 2024

2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहन विक्री वार्षिक 1 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा: नितीन गडकरी

Share

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून 2030 पर्यंत वार्षिक एक कोटी विक्रीचा आकडा गाठण्याची अपेक्षा आहे असं मत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील वाढीमुळे पाच कोटी रोजगार निर्माण होतील असंही ते म्हणाले. आज नवी दिल्ली येथे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या 64 व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना गडकरी यांनी सांगितले की देशात जवळपास 30 लाख इलेक्ट्रिक वाहने  नोंदणीकृत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात चारचाकी वाहनांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 45 टक्के आणि दुचाकींच्या विक्रीत 56 टक्के वाढ झाली असल्याचं सांगताना या कालावधीत 400 स्टार्टअप्सनी इलेक्ट्रिक दुचाकीचे उत्पादन सुरू केले असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

ऑटोमोबाईल उद्योगाला नवीन स्क्रॅपिंग धोरणांतर्गत जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्याची सूचना गडकरी यांनी यावेळी केली. देशात तीन कोटी वाहने आहेत आणि पुरेशी स्क्रॅपिंग केंद्रे नाहीत असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले, भारतीय ऑटोमोबाईल उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के योगदानासह सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. देश जागतिक ऑटोमोबाईल हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असे सांगताना सरकारने ऑटोमोबाईल उद्योगांना मदत करण्यासाठी उत्पादन लिंक्ड प्रोत्साहने सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली. सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल म्हणाले की, उद्योग स्थिरतेच्या दिशेने चालला आहे ज्यामध्ये पर्यायी इंधन, वाहनांचे विद्युतीकरण आणि इतरांबरोबरच री-सर्कुलरिटी यांचा समावेश आहे.

अन्य लेख

संबंधित लेख