मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुका उंबरठयावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र दौरा केला होता. तेव्हा त्यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. असे असताना आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीत काहीही करुन महायुतीचं सरकार यावं, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्र दौरे करत आहेत. त्यातच दोन दिवस अमित शाह हे मुंबईत आहेत. यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या मेळाव्याला नारायण राणेंनीही हजेरी लावली होती.