पुणे, दिनांक २६ ः निवडणूकांमध्ये देशाचे भविष्य पालटून टाकण्याची ताकद आहे. त्यामुळे लोकशाहीच्या उत्सवात विकासाचा प्रसाद प्राप्त करण्यासाठी १०० टक्के मतदानाचा नैवेद्य दाखवायला हवा, असे आवाहन ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित ‘उत्सव लोकशाहीचा- प्रत्येक मत महत्त्वाचे’ या विषयावर डॉ. निरगुडकर बोलत होते. यावेळी महाविद्यालय प्राचार्य डॉ.विजय तडके, संस्थेचे कार्यवाह आनंद काटीकर, शहाजी खरात, प्रीती आफळे उपस्थित होते.
डॉ. निरगुडकर पुढे म्हणाले,”उत्सव साजरे करणे हा भारतीयांचा डीएनए आहे. लोकशाहीच्या उत्सवात आपले भविष्य बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छांबरोबरच १०० टक्के मतदानाचा प्रयत्न करायला हवा. तसेच घरावर इथून शंभर टक्के मतदान झाल्याचे बोर्डही लावावे.” प्रत्येकाने १०० टक्के मतदानाची जबाबदारी घ्यावी, असेही निरगुडकर म्हणाले.
प्राचार्य डॉ. तडके म्हणाले,”प्रत्येकाने निवडणुकीत आपला मतदान हक्क बजावायला हवा. यासाठी नेहमी आग्रह केला जातो पण आपण काहीसे त्याकडे दुर्लक्ष करतो. मतदान हक्क आपल्याला लोकशाहीत मिळाला असून त्याचा वापर आपण जबाबदार नागरिक म्हणून केला पाहिजे.” विद्यार्थिनी सारथी वेदपाठक हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
- पक्ष नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा…
एखाद्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही तर अनेकजण टीका करत असतात. पण पक्ष हा नेत्यांमुळे नाही तर कार्यकर्त्यांमुळे असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदारांमधील उदासीनता कमी करून पक्षाचे मतदान वाढविण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. संघटित लोकांमध्ये खोटी कथ्य पसरवणे हा युद्धशस्त्राचा जुना खेळ आहे. त्यामुळे आपण सजग राहत देशाच्या हितासाठी जातपात विरहीत मतदान करावे असे मत डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केले.
- मतदान घटल्याने भाजपला फटका…
२०१४ मध्ये देशातील एकंदरीत मतदान वाढले होते. त्यापैकी ३१ टक्के मते भारतीय जनता पक्षाला मिळाले. २०१९ मध्ये त्यात सात टक्के वाढ होत हा आकडा ३८ टक्क्यांवर पोचला होता. पर्यायाने भाजपचे खासदारही २८२ वरून ३०५ झाले. यंदा २०२४ मध्ये एकंदरीत मतदानाचा टक्का घसरला. भाजपच्या मतदारांची टक्केवारी १.३ ने घटल्यामुळे तब्बल ६६ जागांचा फटका पक्षाला बसला. त्यामुळे मतदानाची आकडेवारी ही केवळ आकडे नसतात तर ते एक आर्थिक, राजकीय समाजजीवन असते, असे मत डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केले.