मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबईतील राजभवन येथे अधिकृतपणे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे राजीनामा (Resignation) सुपूर्द केला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शिंदे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ आज, 26 नोव्हेंबरला संपत असल्याने शिंदेंनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, नवीन मुख्यमंत्री निवड होईपर्यंत शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळणार आहेत.
विधानसभेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपलेला असल्याने मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे तांत्रिक प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, ज्यामुळेच विधानसभा बरखास्त होते. यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 11 वाजता आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील, अशी माहिती मिळाली होती. सकाळी साडे दहापासूनच घडामोडींना वेग आला. सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार ‘देवगिरी’ बंगल्यावरून निघून राजभवनात दाखल झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘सागर’ बंगल्यावरून राजभवनात पोहोचले. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राजभवनात दाखल झाले. तिघांनीही राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा सादर केला. यामुळे पुढील सरकार स्थापनेसाठीचा मार्ग मोकळा झाला असून ही तांत्रिक बाब असली तरीही सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.