नागपूर : एसटी महामंडळाच्या बसने (MSRTC Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! येत्या नवीन वर्षात एसटीमधील बसची कमतरता लवकरच दूर होणार आहे. नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या ” लालपरी ” बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल होणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री भरतशेठ गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी दिली आहे. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली.
सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड कमतरता आहे. एसटीच्या ताफ्यामध्ये आता १४ हजार बसेस असून करोना महामारीपूर्वी म्हणजे सन २०१८ मध्ये एसटी कडे तब्बल १८ हजार बसेस होत्या. परंतु गेल्या ३-४ वर्षात करोना महामारी व इतर काही कारणामुळे एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच बसेसची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त बस फेऱ्या देणे शक्य होईना. या सगळ्याचा विचार करून एसटीने स्वमालकीच्या २२०० बसेस खरेदी करण्याचा व १३०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सुमारे साडेतीन हजार बसेस जानेवारी महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात समाविष्ट व्हायला सुरू होईल. त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस नादुरुस्त होणे, बसेसची दोन, दोन तास वाट पाहत बसणे अशा तक्रारीला कमी होतील. असे प्रतिपादन गोगावले यांनी यावेळी केली.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यातील सर्व बस स्थानकाचा टप्याटप्याने विकास करण्याची योजना महामंडळाने आखली असून, काही बस स्थानके ही शासनाच्या निधीतून तर काही बस स्थानके बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्त्वावर खाजगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहेत. मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकाऱ्यांने राज्यभरातील १८३ बस स्थानक परिसराचे कॉंक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली होती. त्याला आता गती प्राप्त झाली असून, नागपूर मधील गणेश पेठ बस स्थानकाचे काँक्रिटीकरण देखील याच टप्प्यात पूर्ण होत आहे. भविष्यात विदर्भातील एक देखणं बस स्थानक म्हणून गणेश पेठ बस स्थानकाचा नावलौकिक होईल असेही भरतशेठ गोगावले यांनी यावेळी सांगितले. यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माघय कुसेकर व सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.