पुणे : केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी यावर्षी १९ लाख ६६ हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. पुण्यात आज किसान सन्मान दिवस 2024 च्या निमित्ताने केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रमुख उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.
आपल्या भाषणात चौहान यांनी महाराष्ट्राशी असलेल्या निकट संबंधाचा उल्लेख करत म्हणाले, “मी महाराष्ट्राचा जावई आहे. देवेंद्र फडणवीस माझे छोटे भाऊ असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतासाठी देवाचं वरदान आहेत. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे.”
ते पुढे म्हणाले: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आमच्या प्रयत्नांचे मुख्य ध्येय आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना २३ हजार कोटींचे बजेट होते, ते आता १.२७ लाख कोटींपर्यंत वाढवले आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गरीबांना स्वतःचं पक्कं घर मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. यापूर्वी ६ लाख ३७ हजार लोकांना घर मिळाले होते, तर यावर्षी १३.२९ लाख नवीन घरे महाराष्ट्रातील गरिबांना वितरीत केली जाणार आहेत.
यंदा महाराष्ट्राला मिळणारी १९.६६ लाख घरे ही देशातील कोणत्याही राज्यासाठी मंजूर केलेल्या घरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. पुढील एका वर्षात ही घरे वितरित केली जातील. ज्यांच्याकडे दोन चाकी गाडी आहे, त्यांनाही योजनेतून घराचा लाभ मिळणार आहे, असं ते म्हणाले.
ही घोषणा महाराष्ट्रातील अनेकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण या योजनेचा फायदा घेऊन ते आपल्या स्वप्नातील घराची मालकी घेऊ शकतील. या निर्णयाने राज्यातील घरांच्या कमतरतेच्या प्रश्नाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आजच्या घोषणेनंतर, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून या घरांच्या निर्मितीसाठीची प्रक्रिया सुरू होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यावर्षी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी साडेसहा लाख घरे मंजूर केली होती. मात्र, आता हे लक्ष्य वाढवून अतिरिक्त 13 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्रातील गरिबांसाठी, कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी, तसेच बेघरांसाठी एकूण 20 लाख घरे उपलब्ध करून देण्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही एक ऐतिहासिक भेट आहे, कारण यापूर्वी कोणत्याही राज्याला इतक्या मोठ्या प्रमाणात घरे मंजूर करण्यात आलेली नाहीत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या 20 लाख घरांमुळे अनेक गरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आवास प्लस योजनेंतर्गत महाराष्ट्रात सुमारे 26 लाख लोकांचे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मंजूर झालेल्या घरांमुळे अनेक लाभार्थ्यांना निवासाची संधी मिळणार आहे. शिवाय, या योजनेतून निकष शिथील करण्यात आले आहेत, ज्यामुळे यापूर्वी वंचित राहिलेल्या, खऱ्या गरजू आणि बेघर लोकांनाही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
पुढील पाच वर्षांत सर्व बेघरांना घरे देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले.