
परवा सहज पुण्याच्या डी.ई.एसच्या आवारात मॅनेजमेंट कॉलेजच्या कॅन्टीनमधे चहा पिण्याचा योग आला. सकाळची वेळ, भरपूर गर्दी, छानशी हवा आणि गरम चहा. टेबलाच्या रंगांमध्ये एक गोड, निरागस पिल्लू बागडत होते. चेहेऱ्यावर प्रसन्नता आणि खट्याळ डोळे. जवळून पळताना माझ्या नवऱ्याने त्याला पकडल आणि त्याला नाव विचारले. तर मस्तीत म्हणाला आदी, ADI, spelling सकट नाव सांगितले. हे असे पहिल्यांदाच ऐकले. शाळेत जातोस? पुढच्या प्रश्नाला होकारार्थी मान डोलावली. मित्रांची नावं सांग म्हणलं तर पटापट नावे सांगितली. टीचर्सची सांगता येतील? हो दोन टीचर असतात वर्गात, पण मला या आवडतात असे म्हणून नाव सांगितले. त्या खूप गोड बोलतात, रागावतात पण गोड, हे गौड बंगाल काही कळले नाही. तो म्हणाला, “अगदी गोड रागावतात,”.
त्याच्या संसर्गजन्य प्रसन्नतेची लागण नाही म्हणले तरी झालीच एव्हाना. ती दिवसभर पुरली. दिवसभर तो गोड, थोडा गोबरा चेहेरा डोळ्यासमोरून हलला नाही.
दोन दिवसांनी कामासाठी जेजुरी ओलांडून थोडे पुढे जायचे होते. आम्ही दुपारीच निघालो. ऊन चांगलेच तापले होते. रस्ता छान झाल्याने थोडे हायसे वाटत होते. जेजुरी ओलांडल्यावर एके ठिकाणी पुलाचे काम चालू असल्याने आम्ही सर्विस रोडनी चाललो होतो. पूल निम्मा ओलांडल्यावर अचानक दोन मुले पाणी नेताना दिसली. एक मोठी कडी असलेली पारदर्शक बरणी, तिच्या कडीतून एक काठी घालून, ती दोन्ही बाजूनी उचलून चालली होती दोघं. काही पावलं भर भर चालायची, थोडा वेळ बरणी टेकवायची आणि परत चालायचं, परत थांबायचं, असं चाललं होतं..
गाडी थांबवून मी त्यांच्याशी बोलायला मागे आले. कुठून आणता प्यायचे पाणी? थोडे दूरवर हाताने खूण करून त्यांनी जागा दाखवली. घर थोडे लांब होते. संभाषण हिंदीत चाललं होतं. दररोज अम्मा आणते. पण आम्ही आणलं तर तिला मदत होते.
धाकटा मुलगा जेमतेम आदीच्या वयाचा, अनवाणी, रस्त्याच्या कडेला खडबड, डोक्यावर ऊन. त्याची बहीण थोडी मोठी, तिच्या पायात जुने सँडल. हे पाणी आणण्याचं काम त्यांच्या जीवापेक्षा जडच होतं. पण त्यांची जिद्द पाहून मी आवंढा गिळला. रोज आणत असावी दोघे पाणी. त्यांनी काठीचा केलेला वापर मला अचंबित करून गेला. नैसर्गिक बुद्धिमत्ता कशी वापरली जाते हे त्याचेच प्रतिक. मग त्यांना विचारून लगेच त्यांचा फोटो काढला.
तेवढ्यात माझा नवरा गाडी रिव्हर्स घेत जवळ पोहोचला. माझी पाठ असल्याने अर्थात मला कळले नाही. अचानक ती दोघं बरणी सोडून मागे पळाली. पुलाखालून रस्ता ओलांडून पलीकडे दिसेनाशी झाली. थोडा वेळ वाट पाहिली, पलीकडे जाऊन पाहिलं, पण ती गायबच. शेवटी पुढे निघालो, तर ५० फुटावर एक बाई थांबल्या होत्या, त्यांना विचारले फोटो दाखवून. तर त्या म्हणाल्या इथेच राहतात ती मुले, ती घाबरली, त्यांना वाटले तुम्ही त्यांना घेऊन जाणार. थोडे आश्चर्य वाटले ते ऐकून, पण कमालही वाटली त्यांच्या सजग असण्याची. हे बोलणं चालू असताना ती मुलं ही तिथे आली.
आमचं हे बोलणं चालू असताना अजून दोघे तिथे आले, ते पण याच दोन चंट मुलांना शोधत होते. ते या मुलांना म्हणाले, अरे तुम्ही अम्माला मदत करता हे पाहून तुम्हाला कलिंगडे द्यावीत म्हणून तुम्हाला शोधत होतो. सगळ्या मुलांनी आनंदाने ती कलिंगडे घेतली.
तेवढ्यात तिथे उभे असलेले गृहस्थ, तेही हिंदी भाषिक म्हणाले, दीदी ही मुले शाळेत जात नाहीत. घरातच असतात. एकाचे वडील चौदावी शिकलेले आहेत, पण मुले मात्र शिकत नाहीत, तेही आग्रह धरत नाहीत, कसे व्हायचे. मी रागावतो सुद्धा सगळ्यांना. दिवसभर धूळ मातीत खेळत असतात.
हे सगळं ऐकून माझ्या मनात प्रश्नांचे मोहोळ उठले. कसे भविष्य असेल या मुलांचे? मोठी झाल्यावर काय करतील? एक ना अनेक प्रश्न, उत्तर कशाचेच नाही. मुलांचे आई वडील रोजंदारीने कामावर जातात, कदाचित एका ठिकाणी राहू शकत नसतीलही.
सरकार सर्व मुले शिकवीत म्हणून मोफत आणि सक्तीचे शिक्षण योजना राबवते आहे निष्ठेने. पण अशी किती मुले शिक्षणाच्या परिघाबाहेर असतील? गणवेश, पुस्तके, शिवाय भोजनही पुरवले जाते शाळांमध्ये. तरीही या सगळ्या गोष्टी अपुऱ्या पडतात का? काय असावे कारण यामागे?
प्रश्न अजून प्रश्न. कसे आणायचे सगळ्यांना या शिक्षणाच्या वर्तुळात? नेमके उत्तर देणे किती अवघड.
ही मुले चक्क निरक्षर होती, माझा विश्वासच बसत नव्हता. पण चाणाक्ष होती, रोजच्या जीवनात अनेक धडे त्यांनी गिरवले होते, काही मूल्यही शिकली होती. परिस्थिती फार कठिण होती, पण शारीरिक कष्टाला मुले मागे नव्हती. स्वतःला वाचवायची कला येत होती. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवला नाही त्यांनी. आदीच्या वयाचा मुलगा, त्याला अनेक सुखसोयींनी युक्त व अनेक सुविधा असलेले जग असते हे माहितच नव्हते. विना शिक्षण त्यांचे भविष्य कसे असेल, त्यांच्या नैसर्गिक गुणाचे संवर्धन कसे होणार?
मध्यम वर्गातली कुटुंबे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेत पाठवणार, पुढेही उच्च शिक्षण कदाचित विनाअनुदानित संस्थांमधेच, नोकरीही चांगल्या ठिकाणी. मग हे जगाचे कटु सत्य कधी कळणार मुलांना?
पुढे नवी आव्हाने, आपण याच समाजाचे घटक आहोत हे कसे पोचवायचे आपल्या मुलांपर्यंत? शिवाय सर्व समावेशक दृष्टी देण्याचे आव्हान मोठे आहेच. हे जग डोळसपणे पहिले नाही तर दृष्टीच अपुरी.
त्याच वेळी माझ्या मनात आले, आपल्या आदी सारख्या मुलांना हे वास्तव कसे कळणार? या वेगळ्या जगाचे अस्तित्व कसे दाखवणार त्यांना? हे वंचितांचे जग, काहीसे क्रूर जग कसे दिसणार? असे जग जिथे प्रगतीची संधी कशी वापरायची हेच कळत नाही ते कसे दाखवावे?
माझ्या धाकट्या मुलीला फिजिओथेरपी कॉलेजमधे शिकताना तिला ससून व ताराचंद हॉस्पिटलमध्ये काम करताना हे जग माहीत झालं, त्यांचे प्रश्न कळले, दृष्टी विस्तारली. सगळ्या प्रकारच्या शिक्षणात ही संधी असत नाही. शालेय शिक्षणापासून ती कशी देता येईल याचा विचार व्हायला हवा नाही का?
आदी सारख्या मुलांना त्यांची नैसर्गिक कौशल्ये विकसित करायला, त्याला चकाकी द्यायला, ती दृढ करायला सर्व संधी मिळतील, पण या अशा मुलांचे काय?
पुन्हा पुन्हा श्री दीनदयालजी यांचे विचार आठवत राहतात. ते म्हणत असत की एक व्यक्ती जरी शिक्षणापासून वंचित राहते, तेंव्हा तिचा तोटा तर होतोच. शिवाय समाजाचेही मोठेच नुकसान होते. एक कुशल हात समजला मिळत नाही. शिक्षणावरचा खर्च ही गुंतवणूकच आहे, समाजाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी केलेली ही गुंतवणूक समाजाने करायलाच हवी.
- विद्या देशपांडे