पहलगामची (Pahalgam) जघन्य घटना घडल्या नंतर सध्या आपण सर्व अतीशय क्षुब्ध आहोत. थोडा न्याय मिळाला, पण बरेच मुद्दे आहेत ते सुटायला काळ लागेल.
यातून काही गोष्टीही पुढे आल्या आहेत. त्यांचा सखोल विचार करता येईल असे वाटते. आपण आपले शालेय जीवन (School Life) आठवून पाहिले तर लक्षात येईल की देशाशी संबंधित अनेक मुद्दे तेंव्हा चर्चेला यायचेच नाहीत. कितीतरी दिवस नेमका पाकिस्तानच्या ताब्यात किती आपला भूभाग आहे याचा नकाशा पाहिला नव्हता. चीनने व्यापलेला भूभाग किती व कुठला हेही अचूक माहित नव्हते. आपला नकाशा नेहेमी आपण पाहतो पण त्यात ही तपशील नसतात. पुढे अनेक वर्षांनी व्यक्तिगत उत्सुकतेमुळे वाचन केले व त्यातून ही माहिती मिळाली. अनेकांचा असा अनुभव असेल.
या घटनांचे नेमके विश्लेषण देखील सहज उपलब्ध नाही. आपल्या इतिहासात तर फार माहिती दिलेली नसायची. अनेक घटनांवरची पुस्तके आता मिळतात, त्यातून वस्तुस्थिती कळते.
या युद्धाच्या निमित्ताने हे सारे असे विषय जे आपल्याशी निगडित आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला हवे. त्यांना या गोष्टी कळायला हव्या, तरच आजच्या घटनांचा संदर्भ व वस्तुस्थिती ते नीट पाहू शकतील.
प्रत्यक्ष ताबा रेषा म्हणजे काय, ती कशी आहे, तेथील परिस्थिती काय आहे हे त्यांना सांगायला पाहिजे. विविध सीमावर्ती भागातले जीवन कसे आहे, तेथील आव्हाने काय आहेत, सामाजिक प्रश्न काय आहेत, हे समजावून सांगायला हवे. त्या त्या भागातून चालणारे व्यापार या संबंधित माहिती सुद्धा हवी.
राजस्थान सीमा ही जम्मू आणि काश्मीर यापेक्षा वेगळी आहे. लद्दाखची परिस्थिती याहून वेगळी. गुजरात देखील वेगळा. बांगलादेश सभोवतीची परिस्थिती भिन्न आहे. पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा याला लागून आहेत. अरुणाचल प्रदेश चीन सीमेवर आहे, अर्थात चीनने व्यापलेला जम्मू काश्मीरचा भाग पण यात येतो. हे सारे समजावून सांगण्यासाठी अनेक डॉक्युमेंटरी व अन्य व्हिडिओ क्लिप देखील उपयोगी पडतात. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी, आव्हाने वेगळी.
राजस्थानातल्या लोंगोवाल सीमेवर ऐन उन्हाळ्यात येथील वाळूवर पापड देखील भाजता येतो हे दाखवायला हवे. थंडी तर अवघड असतेच, पण उन्हाळा भीषण असतो. मैलोनमैल हिरवे पान देखील दृष्टीस पडत नाही, भाजीपाला व धान्य पिकवणे तर दूरच. मनुष्य वस्तीही अगदी विरळ, जीवन असामान्य. अशा वातावरणात सैनिक मात्र आपली ड्यूटी करतच असतो, तो स्थानिक नसतो, तो हे सारे आत्मसात करतो.
पंजाब राज्यातील सीमाभागातली परिस्थिती अगदी विरळा. आपल्या काही नागरिकांची घरे भारतात नि शेतजमीन पाकिस्तानात, रोज सकाळी शेतावर, रात्री घरी. लाहोर शहर केवळ २३ किमी, रेल्वे स्टेशन वर उतरून बाहेर यायला पासपोर्ट लागतो. तपासणी होते. तिथला व्याप वेगळा. आटरी बॉर्डर वर रोज होणाऱ्या परेडच्या वेळी समोर पाकिस्तानी नागरिक असतात. दिवसा आवक जावक देखील चालते. हे विद्यार्थ्यांना दाखवलं पाहिजे, त्यांना माहित हवे.
काश्मीरला कितीतरी गावे अशी आहेत, नदी किंवा प्रवाहाच्या एका बाजूला आपण व समोर पाकिस्तानी नागरिक. एकमेकांना आपण पाहू शकतो, समोरासमोर राहतो, एकमेकांकडे पाहून हात हलवू शकतो. पण कधी दुसऱ्या दिशेने गोळ्या किंवा बॉम्ब वर्षाव होईल सांगता येत नाही. इतकी भीती असताना देखील स्थानिक नागरिक जीव मुठीत धरून तेथेच राहतात. आपले उत्पन्नाचे साधन, जमीन सोडून जाणार तरी कुठे?
बंगाल देशाच्या सीमेचे स्वरूप म्हणजे काही ठिकाणी नदी किंवा साधा प्रवाह, आल्याड भारत, पल्याड बांगलादेश. हीच आंतरराष्ट्रीय सीमा, दोन्हीकडे माणसांचे स्वरूप समान. फरक करणे महा कर्मकठीण. कुंपण सुद्धा घडले अवघड.
अरुणाचल प्रदेश इथल्या परिस्थितीची विशेष माहिती दिली पाहिजे. इथले जीवन, इथली आव्हाने, विपरीत निसर्ग, समुद्रसपाटी पासूनची उंची, भीषण थंडी, सतत समोर फक्त बर्फ. आवश्यक वस्तू मुश्किलीने उपलब्ध होते, अतिशय अवघड भूभाग, मानवी क्षमतेचीही क्षणोक्षणी कसोटी. सारखा चीनच्या गोळीबाराच्या टप्प्यात रस्ता. हेच सारे लद्दाख येथेही. मात्र थोडे अधिक आव्हानात्मक.
अरुणाचल प्रदेशातील भूभाग म्हणजे तेथे सुविधा निर्मिती करणाऱ्या यंत्रणांची तांत्रिक व शारीरिक अपार कसोटी. विकासाची कामे, प्रकल्प राबवायला होणारे प्रयत्न, त्याची आवश्यकता, हे सगळे मुलांना सांगायला आणि समजवायला नको का?
सैन्यात जाणे म्हणजे फक्त सीमा प्रहरीचे काम नव्हे. कितीतरी प्रकारची मदत लागते, त्यासाठी किती प्रकारचे विभाग काम करतात, तांत्रिक तसेच अनेक प्रकारची कामे होत असतात. या साठी काय शिक्षण घ्यावे, काय क्षमता असायला हव्यात, हे सारे मुलांना माहिती करून द्यायला हवे. या साऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एक विलक्षण अनुभव घेता येतो. ज्यांच्याकडे अशी क्षमता असेल ते निवडू शकतात ही क्षेत्रे. अनेकांना यात त्यांच्या आवडीचे काम दिसेल, तारुण्य सुलभ आव्हाने त्यांना आकर्षित करतील. यासाठी काय संधी उपलब्ध आहेत, याची माहितीही त्यांना असायला हवी.
आपल्या प्रशासनिक सेवांच्या गरजा, तेथील संधी, त्याची तयारी, आव्हाने देखील माहिती हवीत. या कामातून समाजाचे किती महत्वाचे काम करता येते, याची स्पष्ट कल्पना मुलांना असायला हवीच.
अर्थात स्वतंत्र क्षेत्र निवडून त्यासाठी व्यवसायाच्या संधी याही कळायला हव्यात. हे सारे शालेय जीवन पासूनच परिचय करून घ्यायला हवे.
या प्रकाराच्या क्षेत्रात काम करण्याने समाजासाठी काही भूमिका बजावता येते, याचाही विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला हवा. या सर्व महत्वाच्या कामांसाठी आपली क्षमतावान तरूण पुढे यायलाच हवे. प्रामाणिक, कष्टांची तमा न बाळगणारे, ताठ कण्याची आणि धैर्यशील तरुणाई यासाठी हवी. त्यांच्या मनात ते बीज वेळीच पेरले जायला हवे.
त्या त्या विविध कक्षांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना मोकळ्या चर्चेसाठी बोलवायला हवे. विद्यार्थ्यांना मोकळा संवाद साधायची, मनातले प्रश्न विचारायची पूर्ण संधी हवी. असे अनेक संवाद, चर्चा घडायला हव्या. हळूहळू अनेकांना आपली आवड कशात आहे, आपल्यामध्ये काय क्षमता आहे, त्याला साजेसे क्षेत्र व संधी कुठे आहे याचा अंदाज येऊ लागेल. मनाचा कौल समजेल. त्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. निर्णय समजून उमजून घेता येईल.
हे सारे शिक्षणाचा एक अविभाज्य घटक म्हणून पहायला हवे. शालेय शिक्षणात संवेदनशील व ऊर्जेने ओतप्रोत अशा मनांशी गाठ असते, त्यांना योग्य विचार करायला शिकवण्यात आपण कमी पडलो तर आपण समाजाचे नक्कीच नुकसान होण्यास कारणीभूत ठरू असे वाटते.
विद्या देशपांडे