मुंबई : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत (Fruit Crop Insurance Scheme) अर्ज करण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे आता शेतकरी ६ जुलै २०२५ पर्यंत फळपीक विम्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
मृग बहार २०२५ अंतर्गत द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू आणि मोसंबी या पिकांसाठी विमा अर्ज करण्याची मूळ अंतिम तारीख ३० जून २०२५ होती. मात्र, २७ जूनपासून वेबसाइटवर तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना अर्ज भरताना समस्या येत होत्या. यावर तात्काळ केंद्र सरकारशी संपर्क साधून कृषी विभागाने ही बाब निदर्शनास आणली.
यामुळे, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ३ ते ६ जुलै २०२५ असे चार दिवसांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी सर्व शेतकऱ्यांना www.pmfby.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन लवकरात लवकर आपला विमा अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.