मुंबई : राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिक आणि कृत्रिम फुलांवर बंदी (Ban on plastic and artificial flowers) घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विधानसभेच्या चालू अधिवेशनापूर्वी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
महेश शिंदे, कैलास पाटील, नारायण कुचे यांसह अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचनेतून प्लास्टिक फुलांच्या अतिवापरामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. यावर चर्चेदरम्यान गोगावले म्हणाले, “हे सरकार शेतकरी हिताचे आहे. फूल उत्पादकांना बाजारातील स्पर्धेसाठी आधुनिक तंत्रज्ञान, काढणीपश्चात प्रशिक्षण आणि हरितगृह तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर नियंत्रणासाठी पर्यावरण विभागासोबत अधिवेशनकाळातच बैठक घेऊन धोरण ठरवले जाईल.”
राज्यात सण, समारंभ, मंगल कार्यालये आणि मंदिरांमध्ये प्लास्टिक फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. यामुळे २०-२५ टक्के फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, फूलशेती संकटात सापडल्यास मध उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. सर्वपक्षीय सदस्यांनी प्लास्टिक फुलांवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.