अडीच वर्षांपूर्वी आयआयटी-मुंबई सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये, दर्शन सोलंकी या १८ वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता. ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नव्हती, तर या घटनेला तात्काळ एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय लढाईचे स्वरूप देण्यात आले. डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी याला ‘संस्थात्मक हत्या’ ठरवून, व्यवस्थेच्या जातीयवादी स्वरूपावर बोट ठेवत आंदोलनाचे रान उठवले. मात्र, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा या तथाकथित पुरोगामी आणि दलितवादी कार्यकर्त्यांचा आवाज पूर्णपणे शांत झाला. या प्रकरणातील गुंतागुंत आणि त्याभोवती फिरलेले राजकारण एका गंभीर वास्तवाकडे आपले लक्ष वेधते.
घटनेचे सत्य आणि त्यानंतरचे वळण
फेब्रुवारी २०२३ मध्ये, बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दर्शन सोलंकीने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेनंतर, आयआयटी-मुंबईने अंतर्गत चौकशी समिती नेमली, ज्यात अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) सेलच्या सदस्यांचाही समावेश होता. समितीने तब्बल ७९ लोकांचे जबाब नोंदवले, ज्यात दर्शनचे मित्र, प्राध्यापक आणि कुटुंबातील सदस्य होते.
याच दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीरता ओळखून एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. तपासादरम्यान दर्शनच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली, ज्यात त्याने स्पष्टपणे लिहिले होते, “Arman has killed me” (अरमानने मला मारले). हा अरमान इक्बाल खत्री, दर्शनचाच वर्गमित्र होता. पोलीस तपासात असेही समोर आले की, धार्मिक विषयांवरून झालेल्या वादानंतर अरमानने दर्शनला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या एका पुराव्याने प्रकरणाला पूर्णपणे नवी दिशा दिली.
सुरुवातीला जातीय भेदभावाचा आरोप करणाऱ्यांसाठी हा एक मोठा धक्का होता. आरोपी मुस्लिम असल्याचे स्पष्ट झाल्यावर, ज्यांनी व्यवस्थेला धारेवर धरले होते, ते अचानक शांत झाले. आरोपी अरमान खत्रीने त्याच्यावरील खटला रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, परंतु त्याची याचिका फेटाळण्यात आल्याने आता त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे.
निवडक संताप आणि ढोंगी राजकारण
दर्शनच्या मृत्यूनंतर ‘आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल’ (APPSC), ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SFI), आणि भीम आर्मीसारख्या अनेक संघटनांनी आयआयटी-मुंबईच्या आवारात जोरदार निदर्शने केली. “मनुवादी व्यवस्था दलितांना संपवत आहे,” “रोहित वेमुला, पायल तडवी आणि आता दर्शन…” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या संघटनांनी ही आत्महत्या नसून ‘संस्थात्मक हत्या’ असल्याचा प्रचार केला आणि संस्थेच्या संचालकांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मात्र, खरा प्रश्न हा आहे की, दर्शन जिवंत असताना यापैकी कोणीही त्याच्या मदतीला का धावून आले नाही? त्याने कधी संस्थेच्या SC/ST सेलकडे किंवा कोणत्याही विद्यार्थी संघटनेकडे जातीय भेदभावाची तक्रार केल्याचा एकही पुरावा नाही. मग त्याच्या मृत्यूनंतरच या तथाकथित ‘दलित समर्थकांना’ जाग का आली? याचे उत्तर त्यांच्या राजकीय अजेंड्यात दडले आहे. त्यांना ‘मनुवादी संस्थात्मक हिंसा’ या नावाखाली एक कथा रचायची होती, ज्यातून हिंदू समाजात फूट पाडता येईल.
पण जेव्हा एसआयटीच्या तपासात आरोपी अरमान खत्री हा मुस्लिम असल्याचे उघड झाले, तेव्हा या सर्व संघटनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी मौन धारण केले. एकही मोर्चा निघाला नाही, एकही निषेधपत्रक झळकले नाही. कारण त्यांच्या राजकीय चौकटीत मुस्लिम आरोपीवर टीका करणे म्हणजे ‘इस्लामोफोबिया’ ठरतो. हा दुटप्पीपणा त्यांच्या ढोंगीपणाचे आणि पक्षपातीपणाचे उत्तम उदाहरण आहे. दलित विद्यार्थ्याचा जीव महत्त्वाचा होता, की आरोपीच्या धर्मामुळे त्यांचा लढा दुबळा झाला?
‘जय भीम – जय मीम’च्या घोषणेमागील षडयंत्र
या प्रकरणातून ‘दलित-मुस्लिम ऐक्य’ या घोषणेमागील पोकळपणाही उघड झाला. ‘आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल’ सारख्या संघटनांची फेसबुक पाने दलित-मुस्लिम एकतेच्या विचारांनी रंगलेली दिसतात. पण जेव्हा संघर्ष ‘दलित विरुद्ध मुस्लिम’ असा असतो, तेव्हा ही एकता कुठे जाते? त्यांचा अजेंडा केवळ तेव्हाच पुढे येतो, जेव्हा लक्ष्य तथाकथित ‘उच्चवर्णीय हिंदू’ असतो.
माजी खासदार आणि विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनीही कोणताही पुरावा नसताना केवळ जातीय द्वेषाच्या कथानकाला खतपाणी घालणारे लेख लिहिले आणि पत्रकार परिषदा घेतल्या. आता सत्य समोर आल्यावर ते यावर काही बोलणार आहेत का? ज्या संघटनांनी दर्शनच्या कुटुंबाची दिशाभूल करून त्यांना व्यवस्थेविरुद्ध उभे केले, त्या फुटीरतावादी संघटनांचीही चौकशी व्हायला हवी.
तरुणाच्या मृत्यूचे भांडवल
दर्शन सोलंकीसारख्या होतकरू विद्यार्थ्याचा मृत्यू ही समाजासाठी एक मोठी हानी आहे. पण त्याहूनही अधिक वेदनादायी आणि संतापजनक आहे ते म्हणजे, त्याच्या मृत्यूचे राजकारण करणाऱ्यांची मानसिकता. या प्रकरणात, जातीय भेदभावाचा आरोप करून हिंदू समाजात फूट पाडण्याचा आणि अयोध्येतील राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर तयार होत असलेल्या सामाजिक ऐक्याला सुरुंग लावण्याचा डाव होता. आयआयटी-मुंबईला जेएनयूसारखे ‘ब्रेकिंग इंडिया’ विचारधारेचे केंद्र बनवण्याचा हा एक प्रयत्न होता, जो एसआयटीच्या तपासामुळे उधळला गेला.
आता न्यायालयीन खटला सुरू होत असताना, समाजाला हे समजून घेणे आवश्यक आहे की, कोणत्याही घटनेला जातीय किंवा धार्मिक रंग देण्याआधी सत्याची प्रतीक्षा करणे किती महत्त्वाचे आहे. दर्शन सोलंकीच्या आत्महत्येने केवळ एका तरुणाचा बळी घेतला नाही, तर त्याने पुरोगामी म्हणवणाऱ्या अनेक संघटनांचा खरा चेहराही समाजासमोर आणला आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या शक्तींना ओळखून त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे.