श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. श्री गणेशोत्सव हे पुण्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती देशातच नव्हे, तर देशाबाहेरही पोहोचली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे अनेक पैलू आहेत. गणेश मंडळांचे सामाजिक कार्य हा त्यातील एक लक्षणीय पैलू. त्याची ओळख या लेखातून होईल.
पारतंत्र्यात खितपत पडलेल्या समाजाला जागे करण्यासाठी आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवून त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देवघरातील गणपती रस्त्यावर आणला आणि पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय नेते होते आणि त्यांच्या शब्दांना कृतीची जोड होती. गणेशोत्सव सार्वजनिक करताना त्यावेळी असलेला स्वातंत्र्यप्राप्तीचा उद्देश त्यातून सफल तर झालाच. पण, स्वराज्य मिळाल्यावर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौजही निर्माण झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे मोठेच योगदान आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही.
पुण्यात ज्याची सुरुवात होते ते जगभरात लोकप्रिय होते याचे सार्वजनिक गणेशोत्सव हे मूर्तिमंत उदाहरण आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्यानंतर प्रारंभीच्या वर्षी पुण्यात तीन ठिकाणी आणि मुंबईत दोन ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले होते. पुढे टिळकांच्या प्रेरणेतून नागपूर, वर्धा, अमरावती येथेही गणेशोत्सव सुरू झाला.
लोकप्रिय झालेले मेळे
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील मंडळांच्या गणपतींच्या समोर दिवसाच्या वेळी भजनाचे कार्यक्रम आणि रात्री कीर्तने आयोजित होत असत. शाहिरांचे पोवाडे, समई नृत्य, जादूचे प्रयोग असे कार्यक्रम या उत्सवात होत असत. देशभक्तीपर गीते म्हणणारे मेळे पुण्यात संध्याकाळच्या वेळेत होत असत. ही गीते इतकी लोकप्रिय होती की त्याची पुस्तकेही प्रकाशित करण्यात आली होती. पानशेत पुरानंतर पुण्याचा विस्तार झाला आणि शहरातील जुन्या वाड्यांच्या जागी निर्माण झालेल्या गृहनिर्माण सोसायटींमध्येही उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला. यानिमित्ताने विविध क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले.
श्री कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी या पुण्याच्या ग्रामदेवतांच्या मंडळांना विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान लोकामान्य टिळकांनी दिले. तीच परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. गणेश मंडळांच्या सामाजिक कार्याची परंपरा हेही पुण्याच्या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. शेकडो मंडळे अनेकविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतात आणि मंडळात राबणारे हजारो कायर्कर्ते हे पुण्याचे आणि त्या त्या भागाचे सदिच्छादूतच आहेत. परिसरातील नागरिकांच्या अडचणींना धावून जात मदत करणारे सेवाभावी कार्यकर्ते हे उत्सवाचे वैभव आहेत. गणेशोत्सव ही राजकीय नेतृत्व घडविणारी कार्यशाळा आहे. या उत्सवातून शहराला नगरसेवक, आमदार आणि खासदारही लाभले.
सामाजिक कार्याची परंपरा
वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवून गणेश मंडळांचे कार्यकर्ते वर्षभर कार्यरत असतात. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी शिबिर, मधुमेही रुग्णांसाठी शिबिर यासह वारकऱ्यांना अन्नदान आणि वारीत आवश्यक वस्तूंच्या संचाचे वाटप असे विविध उपक्रम सातत्याने राबवून मानवतेचे दर्शन ते घडवितात. कार्यकर्ते तर या समाजसेवेच्या कार्यात झोकून देत काम करतच असतात पण, त्याच्या जोडीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील त्यांच्या कार्यात सहभागी होत आपला खारीचा वाटा उचलतात. अनेक गणेश मंडळांनी परिसरातील नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची रक्तगट सूची केली आहे ज्यायोगे गरजू रुग्णाला आयत्या वेळी रक्त देणे सोयीचे होते. पूर, आग, भूकंप यांसारख्या संकटांमध्ये गणेशोत्सवातील कार्यकर्ते मदतीसाठी आधी धावून जातात हा अनुभव आहे. करोना संकटामध्ये गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.
राजकीय जीवनातील असो किंवा नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी असलेले पद असो त्यापेक्षाही गणेश मंडळाचा कार्यकर्ता हे पद मिरवायला कार्यकर्त्यांना अधिक आवडते. विधायकतेच्या मार्गाचा अवलंब करीत विविध गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाला केवळ मानवतेचे, सेवेचे रूप दिले असे नाही तर, देव केवळ मंदिरापुरता मर्यादित न ठेवत सामाजिक कार्याद्वारे मानवतेचे महामंदिर साकारण्याकडे या उत्सवाची वाटचाल सुरू झाली आहे.
उत्सवाचे वेध
एरवी वर्षभर विविध उपक्रमांद्वारे गणेश मंडळांचे कार्यकर्ते कार्यरत असले तरी स्वातंत्र्यदिन म्हणजेच १५ ऑगस्टपासून त्यांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. दहीहंडी उत्सव ही तर गणेशोत्सवाची रंगीत तालीम मानली जाते. मंडप उभारणी, यंदा देखावा कोणता साकारायचा येथपासून ते गणरायाची प्रतिष्ठापना आणि उत्सवातील दहा दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन अशा सर्व गोष्टींमध्ये त्यांचा केवळ पुढाकार किंवा सहभागच असतो असे नाही तर, प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे कशी होईल हा त्यांचा कटाक्ष असतो. प्रतिष्ठापना करण्यापूर्वी आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणती बँडपथके, ढोल-ताशा पथके असतील याचेही नियोजन केले जाते. त्यासाठी अनेक कार्यकर्ते आपल्या रजा गणेशोत्सवासाठी साठवून ठेवतात. गणेशोत्सवातून ऊर्जा घेत पुन्हा नव्याने आपल्या कामाचा श्रीगणेशा करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, याचे दाखले कोणत्याही गणेश मंडळामध्ये गेल्यानंतर मिळतात.
कालानुरूप उत्सवामध्ये बदल घडत आहेत. पूर्वी कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांकडून वर्गणी काढून गणेशोत्सव साजरा होत असे. पण, या उत्सवाचे सामर्थ्य ध्यानात घेऊन यामध्ये विविध कंपन्या आणि त्यांची उत्पादने प्रायोजक स्वरूपात पुढे आल्यानंतर त्यांच्याकडून येणाऱ्या देणगीच्या माध्यमातून काही अंशी उत्सव धुमधडाक्यात साजरा होण्यास सुरुवात झाली. कार्यकर्त्यांची पुढची पिढी उत्सवामध्ये कार्यकर्त्यांच्या रूपात आल्याने उत्सवाला नव्या विचारांचे धुमारे फुटले. मात्र, प्रायोजकतेमुळे कार्यकर्त्यांमधील ऊर्जेला काही अंशी मगरळ आली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याकडे डोळेझाक करून चालणार नाही. असे असले तरी गणराय कार्यकर्त्यांना बुद्धी देतात आणि त्यांच्याकडून सेवा करून घेतात. गणेशोत्सवाची ही विधायक शक्ती कार्यकर्त्यांसाठी निश्चितच भूषणावह ठरली आहे.
गणेशोत्सव सर्वांच्या सहभागाचा
उत्सव म्हटल्यानंतर त्यामध्ये सर्वांचा सहभाग आलाच. त्यात काही पारंपरिक विचारांनी चालणारे तर, काही आधुनिक विचारांची कास धरणारे असता. या उत्सवामधून राज्यभरात बाजारपेठेमध्ये हजारो कोटींची उलाढाल होत असते. देखावे साकारणारे कलाकार, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांचे मनोरंजन करणारे कलाकार यांना संधी मिळते. ढोल-ताशा पथकांधील तरुणाईची ऊर्जा ही तर उत्सवाला वेगळेच परिमाण देणारी ठरली आहे. गणरायाला तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांच्या मागणीमुळे मंडपाशेजारी असलेल्या तोरण विक्री दालनांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. अगदी रस्त्याच्या कडेला बसणारे फेरीवाले गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. उत्सव आणि उत्साहाला विधायकतेचे वळण देत मानवतेचे महामंदिर साकारणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांचा घेतलेला वसा हा गणेशोत्सवाचा वारसा ठरला आहे. हीच या उत्सवाची फलश्रुती ठरली आहे.
– जयश्री कुलकर्णी
(लेखिका सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत.)