Sunday, August 31, 2025

कोल्हापूरची परंपरा सजीव देखाव्यांची

Share

कोल्हापूर शहराची ओळख सांगणाऱ्या गोष्टींमध्ये गणेशोत्सवातील सजीव देखावे या परंपरेचा समावेश आहे. येथील गणेश मंडळे पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील सजीव देखावे गणेशोत्सवात सादर करतात. त्यांचे सादरीकरण आणि त्याचा लोकांवर पडणारा प्रभाव विलक्षण आहे.

कोल्हापुरात गणेशोत्सवातील वातावरण चैतन्याने भरलेले असते. शहराच्या जुन्या पेठांमध्ये या कालावधीत उत्साहाला भरते येते. घरातील महिला मंडळी दुपारचे नैवेद्य, जेवण आटोपून चारच्या सुमाराला थोड्या विश्रांतीसाठी पाठ टेकतात तोवर पाच वाजता संध्याकाळच्या आरतीची तयारी सुरू होते. घरातील पुरुष मंडळी नोकरी, व्यवसाय आटोपून तिन्हीसांजेला घरी येतात. संध्याकाळची आरती झाली की, आठ वाजता जेवण आटोपून सर्वांची पावले सार्वजनिक गणेश मंडळांच्या मांडवांकडे वळतात. 


गर्दीचा उत्साह
मंडळांमधील तयारीची इथली लगबग तोवर युद्धपातळीवर पोहोचलेली असते. काही मंडळांची आरती सुरू असते तर काहींची झालेली असते. आरती झाली की मांडवाच्या व्यासपीठाला लावलेला पडदा खाली पडतो. पडद्यामागे कार्यकर्ते मंडळी देखाव्याचे नेपथ्य उभे करत असतात. नेपथ्यातील बहुतांश गोष्टी कार्यकर्त्यांच्या घरातूनच आणलेल्या असतात. ही तयारी सुरू असताना ध्वनीक्षेपकावर सजीव देखाव्याची माहिती सांगायला सुरुवात होते. तोवर समोर प्रेक्षकांची गर्दी बऱ्यापैकी जमलेली असते. शिट्ट्या, टाळ्या, घोषणा टिपेला पोहोचल्या की पडदा उघडतो. 


पडदा उघडला की, पाहता पाहता सजीव देखाव्याच्या नाट्याचा किंवा प्रसंगनाट्याला सुरुवात होते. हा प्रसंग सादरीकरणासाठी साधने अत्यंत मर्यादित असतात. मात्र कलाकारांच्या तोंडी असणारे संवाद प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे दृश्य पाहणाऱ्याच्या पापण्यांच्या कडा ओल्या करते. विनोदी नाटिकेतील संवाद प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. स्थानिक बोली भाषेत हे संवाद लिहिणे हे अत्यंत कौशल्याचे काम, पण नाट्यलेखकांनी ते मोठ्या तयारीने केल्याचे जाणवते. 

देखाव्यांद्वारे लोकप्रबोधन
प्रेक्षकांची संख्या लक्षात घेऊन नाटिकेची दोन-तीन किंवा त्यापेक्षाही अधिक आवर्तने होतात. मग मंडळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घराकडे परतू लागतात. हे सजीव देखावे पाहण्यासाठी आसपासच्या गावातील मंडळीही शहरामध्ये येतात. देखाव्यांची नाटिका लिहिणारे हौशी लेखक, नाटिका बसवणारे दिग्दर्शक आणि प्रत्यक्ष भूमिका करणारे कलाकार हे सगळे मंडळाच्याच परिसरातील  कार्यकर्ते असतात. त्यातील कोणीही व्यावसायिक नसतो. आपल्या मंडळाने काहीतरी वेगळे करावे आणि लोकांनी त्याचे कौतुक करावे या एकाच उद्देशाने हे सजीव देखावे सादर केले जातात. काही मंडळे सामाजिक विषयांवरील देखावे सादर करतात. मुलींचे शिक्षण, लग्नावर होणारा वारेमाप खर्च टाळा, पर्यावरण संवर्धन असे अनेक विषय घेऊन प्रबोधनात्मक देखावे देखील सादर होतात. सधन आणि समृद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी होऊ लागला होता. त्यावर्षी अनेक मंडळांनी लेक वाचवा ही संकल्पना घेऊन देखावे सादर केले. पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी देखाव्यातून जागर केला गेला. कोल्हापुरातील प्रबोधन चळवळ या मंडळांनी देखाव्यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीच्या हाती सोपवली आहे.


भारावणारे वातावरण
शहरातील शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात गोल्ड स्टार तरुण मंडळ आहे. दरवर्षी ते स्वातंत्र्यलढ्यातील एखादा प्रसंग घेऊन देखावा सादर करतात. तेथून पुढे गेल्यावर कपिलतीर्थ मंडई आहे. इथे मित्र प्रेम तरुण मंडळ आहे. दरवर्षी ते शिवचरित्रातील एखाद्या प्रसंगावर सजीव देखावा सादर करतात. देखाव्यासाठी त्यांनी स्वतंत्र स्टेज उभारलेले असते. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा घोड्यावरून स्टेजवर प्रवेश होतो. यावेळी प्रेक्षकांच्या टाळ्यांनी सारे वातावरण भारावून जाते. ही नाटिका पाण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी होते. मंगळवार पेठेतील दत्ताजीराव काशीद तरुण मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ यांचेही सजीव देखावे प्रसिद्ध आहेत. कसबा बावडा हा शहराचाच एक भाग असून येथेही गणेश मंडळे सजीव देखावे सादर करतात. देखावा स्पर्धेमध्ये या मंडळांना हमखास पारितोषिक मिळते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अनेक मंडळे सजीव देखावे सादर करतात. करवीर तालुक्यातील सांगरुळ गावात सहा ते सात सजीव देखावे असतात. शीये, वडणगे, निगवे या गावातही सजीव देखाव्यांना प्रेक्षकांची गर्दी असते. राधानगरी, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये सजीव देखाव्यांचे प्रमाण अधिक आहे.


देखाव्यांमधून काय साध्य होते…
हे देखावे केवळ मनोरंजन करत नाहीत. ते हौशी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. सामूहिक प्रयत्नातून एखादी गोष्ट यशस्वी करण्याचे तंत्र कार्यकर्त्यांना शिकवतात. पाहणाऱ्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करतात. पूर्वीपेक्षा देखाव्यांचे सादरीकरण अनेक अर्थाने बदलले आहे. आता संवादांची जागा ध्वनिमुद्रणाने घेतली आहे. प्रकाश व्यवस्थाही चांगली झाली आहे. विषयांचे वैविध्य देखाव्यांमध्ये आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बिघडत आहे. अशा काळात या सजीव देखाव्यांचे महत्त्व अधोरेखित होते. एका बाजूला भौतिक साधनांच्या उपलब्धतेमुळे गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे मनोरंजन खिशामध्ये आले आहे. अशा काळातही या मंडळांनी सजीव देखाव्यांची परंपरा आजही जिवंत ठेवली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख