Thursday, September 4, 2025

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

Share

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमल्याने पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि तातडीची मदत या गरजा प्रकर्षाने पुढे येतात. अशा वेळी सामाजिक संवेदनशीलतेची परंपरा जोपासत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा विभाग म्हणजेच सेवा भारती मदतीसाठी पुढे सरसावला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) समोरील भागात सेवा भारती, कोकण प्रांत यांनी विशेष मदत कक्ष उभारला. या कक्षातून आंदोलकांना जीवनावश्यक मदत पुरवण्यात आली. पिण्याचे पाणी वाटप, आरोग्याच्या गरजाही ओळखून प्रथमोपचार सेवा सुरू करण्यात आल्या. ताप, सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य आजारांवर त्वरित औषधे पुरवण्यात आली.

आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळावेत यासाठी सेवा भारतीने आझाद मैदानच्या परिसरातील विविध रुग्णालयांची माहिती व त्यांचे संपर्क क्रमांक आंदोलकांना उपलब्ध करून दिले आहेत. एखाद्या आंदोलकाची प्रकृती गंभीर बिघडल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांकडून घेतली जात आहे. अशा प्रकारे सेवा भारतीचे स्वयंसेवक आंदोलकांसोबत सावलीसारखे उभे राहून त्यांच्या अडचणी हलक्या करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.

या सेवाकार्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वासाचे हास्य दिसत आहे. जेव्हा एखाद्या सामाजिक चळवळीत लाखो लोक सहभागी होतात, तेव्हा त्यांच्यासाठी अन्न, पाणी, आरोग्य यांसारख्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे ही मोठी जबाबदारी ठरते. सेवा भारतीने ही जबाबदारी उचलत आंदोलन अधिक सुकर आणि सुरक्षित बनवले आहे. खरं तर “सेवा परमो धर्मः” ही मूल्यं प्रत्यक्ष कृतीत उतरवून सेवा भारतीने समाजाला पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की संकटसमयी मदतीला धावून जाणे हाच खरा संघटनात्मक संस्कार आहे.

याच सेवाभावामुळे संघाच्या कार्यकर्त्यांवर समाजाचा अढळ विश्वास आहे. मदतीसाठी पुढे जाताना त्यांना कुठलाही दिखावा किंवा प्रसिद्धीची अपेक्षा नसते, तर “सेवा हीच साधना” या भावनेतून त्यांचे कार्य घडत असते. म्हणूनच भूकंप, पूर, दुष्काळ, महामारी किंवा कोणतीही आपत्ती असो  स्थानिक प्रशासनाला पूरक ठरत संघाचे कार्यकर्ते शेकडो गावांमध्ये मदतीचा हात देताना दिसतात. गरजूंपर्यंत औषधं, अन्नधान्य, पाणी, वस्त्रं आणि सुरक्षित निवारा पोहोचवणे असो वा लोकांच्या मनातील भीती कमी करणे असो, संघाचे स्वयंसेवक ते सर्व निस्वार्थ भावनेने करतात. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ एक वैचारिक संघटनाच नाही, तर देशाच्या संकटसमयी समाजाला आधार देणारा दृढ खांब ठरतो.

सेवा भारती या संघटनेची अजून काही कामे – 

भारतातील सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक स्वयंसेवी संस्थांपैकी एक  महत्त्वाची  संस्था राष्ट्र्रीय सेवा भारती  ही आहे. २००३ साली स्थापन झालेली ही संस्था, देशभरातील विविध स्वयंसेवी संघटनांना एकत्र आणून त्यांच्यात समन्वय साधते, प्रशिक्षण देते आणि त्यांना प्रभावी कार्यासाठी मार्गदर्शन करते. “जागरूकता, सहकार्य, प्रशिक्षण आणि अध्ययन” या चौकटीवर उभी असलेली ही संस्था समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील आहे.

आजच्या घडीला राष्ट्र्रीय सेवा भारतीच्या छत्राखाली ४५  प्रतिनिधी संस्था आणि १२,०००  हून अधिक सहयोगी संस्था कार्यरत आहेत. या माध्यमातून देशभरात तब्बल ३५,००० पेक्षा जास्त सेवा प्रकल्प चालवले जात आहेत. शिक्षण, आरोग्य, आत्मनिर्भरता आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत दरवर्षी हजारो कार्यक्रम राबवले जातात. शैक्षणिक क्षेत्रात सुमारे १२,००० तर आरोग्यविषयक क्षेत्रात ११,०००  हून अधिक प्रकल्प कार्यरत आहेत. या माध्यमातून गरीब, आदिवासी, वंचित आणि समाजाच्या उपेक्षित घटकांना थेट मदत मिळते.

संस्थेचे उपक्रम विविधतेने परिपूर्ण आहेत. भोपाळमधील “श्रीमती निर्मला सगदेव वनवासी छात्रावास” येथे चालवला जाणारा “Historically Yours” हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांना नवी दिशा देतो. हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य, सिक्किममधील पूरस्थितीत तातडीने उभे राहून केलेले सहाय्य, अशा अनेक प्रसंगांत राष्ट्र्रीय सेवा भारतीने संवेदनशीलता व तत्परता दाखवली आहे. तसेच “Support A Child” या अभियानातून गरीब मुलांना शिक्षण, मानसिक आधार आणि सामाजिक संरक्षण देण्याचे कार्यही सुरू आहे.

“स्वास्थ्यदायी समाजातूनच राष्ट्र बळकट होते” हा संस्थेचा मूलमंत्र आहे. त्यानुसार उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा या दोन्ही दिशांनी कार्य सुरू आहे. एकीकडे समाजातील उपेक्षित घटकांना आरोग्यसेवा पुरवली जाते तर दुसरीकडे स्वच्छता, आरोग्य-जागरूकता यांसारख्या उपक्रमांद्वारे दीर्घकालीन सुधारणा घडवून आणली जाते.

एकंदरित पाहता, राष्ट्र्रीय सेवा भारती ही केवळ एक स्वयंसेवी संस्था नाही तर सामाजिक परिवर्तनाचे एक राष्ट्रीय व्यासपीठ आहे. भविष्यातील भारताला आत्मनिर्भर, सुशिक्षित आणि आरोग्यसंपन्न करण्यासाठी राष्ट्र्रीय सेवा भारतीचे योगदान निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख