शताब्दीनिमित्त विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आज प्रथमच स्मृतिचिन्ह नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशित झाले. नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांच्या उपस्थितीत हा अनोखा क्षण साकारला. १०० रुपयाच्या नाण्यावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह, भारतमातेची प्रतिमा, स्वयंसेवकांचे चित्रण व संघाचे बोधवाक्य ‘राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम’ कोरले गेले असून, या प्रकाशनातून संघाच्या शंभर वर्षांच्या सेवापरंपरेला राष्ट्रस्तरीय सन्मान मिळाला आहे.
सन १९६३ मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावरील भव्य परेडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सहभाग नोंदविला होता. देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रीय ऐक्याचा संगम दाखविणाऱ्या या ऐतिहासिक घटनेला संघाच्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जाते. या स्मरणीय क्षणाची नोंद पुढे टपाल विभागाने विशेष टपाल तिकिटाच्या स्वरूपात केली. या तिकिटावरून संघाचा प्रजासत्ताक परेडमधील सहभाग केवळ एका प्रसंगापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय स्मृतीचा एक अविभाज्य भाग बनला.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच संघाच्या स्थापनेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना होणे हा केवळ योगायोग नाही तर हा दिवस सत्य, धर्म आणि प्रकाशाचा विजय दर्शवतो. त्यामुळे संघाचा प्रवास हा परंपरेने समाजाला प्रेरणा देणारा आहे.
मोदींनी संघाच्या प्रवासाला त्याग, निःस्वार्थ सेवा आणि राष्ट्रचेतना यांचा प्रवास म्हटले. गेल्या शंभर वर्षांत संघाने समाजातील प्रत्येक घटकाला जोडून ठेवत राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य केले आहे. देशभरात कुठलीही आपत्ती आली, नैसर्गिक संकट आले किंवा सामाजिक समस्या उभी राहिली तेव्हा तेव्हा स्वयंसेवकांनी नेहमी सर्वात आधी पुढे येऊन सेवा दिली आहे हे उदाहरणांसह सांगितले आहे.
संघ प्रवासातील अडथळ्यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की संघावर अनेकदा आरोप झाले, बंदी घालण्यात आली, परंतु संघाने संयम आणि श्रद्धेच्या जोरावर आपला मार्ग कायम ठेवला. ते म्हणाले की, “संघाची पावले कितीही अडवली गेली तरी त्याने आपली राष्ट्रसेवेची दिशा कधीही सोडली नाही.”
मोदींनी संघाचा लोकशाहीवरील विश्वास या मुद्द्यावर भर दिला. प्रत्येक स्वयंसेवक संविधान व लोकशाही मूल्यांवर अढळ विश्वास ठेवतो. आणीबाणीच्या काळातही संघाच्या कार्यकर्त्यांनी हे मूल्य जगासमोर ठेवले आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष केला असे ते म्हणाले.
सामाजिक कार्यावर प्रकाश टाकताना मोदींनी सांगितले की संघाने आदिवासी समाज, वंचित घटक त्यांच्या स्थानिक संस्कृतींच्या संवर्धनासाठी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे समाजातील समतेची भावना बळकट झाली आहे.
आपल्या भाषणाच्या शेवटी मोदींनी संघाच्या पुढील शतकाबद्दल आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले की संघाचे शताब्दी वर्ष अनुभवणे हे आपल्या पिढीसाठी अभिमानाची बाब आहे. येत्या काळात संघाचे स्वयंसेवक देशाला दिशा देतील. समाजसेवा, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांना नवी ऊर्जा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचबरोबर मोदींनी सर्व उपस्थितांना राष्ट्रसेवेची शपथ घेण्याचे आवाहन केले.