Monday, October 13, 2025

हिंदू समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी : डॉ. मोहन भागवत

Share

संपूर्ण हिंदू समाजाचे सामर्थ्यसंपन्न, शीलसंपन्न आणि संघटित स्वरूप हीच देशाच्या एकता, एकात्मता, विकास आणि सुरक्षेची खरी हमी आहे, कारण हिंदू समाजच विभाजनवादी मानसिकतेपासून मुक्त असून, तो सर्वसमावेशक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उदात्त तत्त्वज्ञानाचा संरक्षक आणि पुरस्कार करणारा हिंदू समाजच आहे. त्यामुळेच संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याचे कार्य संघ करीत आहे. एकदा समाज संघटित झाला की तो आपली सारी कर्तव्ये स्वतःच्या सामर्थ्याने पूर्ण करू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन जी भागवत यांनी नागपुरात रेशीमबाग मैदानावर आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना केले. यंदाचे वर्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे, हे विशेष.

“भारताला वैभवशाली तसेच संपूर्ण विश्वासाठी अपेक्षित आणि उचित असे योगदान देणारा देश म्हणून घडवणे, हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे,” असेही मोहन जी यावेळी म्हणाले. या वेळी व्यासपीठावर माजी राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद, संघाचे विदर्भ प्रांत संघचालक मा. दीपक जी तामशेट्टीवार, सह संघचालक मा. श्रीधर जी गाडगे आणि नागपूर महानगर संघचालक मा. राजेश जी लोया उपस्थित होते.

स्वदेशी आणि स्वावलंबनाला पर्याय नाही

सरसंघचालक पुढे म्हणाले, “आपल्या स्वहिताला केंद्रस्थानी ठेवून अमेरिका आयात शुल्काचे जे धोरण राबवत आहे, ते लक्षात घेता आपल्यालाही काही बाबींचा पुनर्विचार करावा लागेल. जग हे परस्परावलंबनावर उभे आहे; पण ते परस्परावलंबन आपला नाईलाज ठरू नये. यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल. स्वदेशी आणि स्वावलंबनाला कुठलाही पर्याय नाही.”

जागतिक भौतिकतावादी आणि उपभोगप्रधान धोरणांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय असमतोलाबद्दलही सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केली. “याच धोरणांचा परिणाम म्हणून भारतातही मागील तीन-चार वर्षांत अनियमित आणि आकस्मिक पर्जन्यमान, भूस्खलन, पूर अशा नैसर्गिक आपत्ती झपाट्याने वाढल्या आहेत. संपूर्ण दक्षिण-पश्चिम आशियाचे जलस्रोत हिमालयावर अवलंबून असताना हिमालयात घडणाऱ्या या दुर्घटना भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियातील देशांसाठी धोक्याची घंटा आहेत,” असे ते म्हणाले.

उपद्रवी शक्तींविषयी इशारा

भारताच्या शेजारील देशांतील अराजक परिस्थितीचा उल्लेख करताना डॉ. भागवत म्हणाले, “मागील काही वर्षांत आमच्या शेजारील देशांत प्रचंड उलथापालथ झाली आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि अलीकडेच नेपाळ येथे जनक्षोभाचा हिंसक उद्रेक होऊन सत्तांतर घडले. आपल्या देशात तसेच जगभरात अशा प्रकारच्या उपद्रवांना प्रोत्साहन देणाऱ्या शक्ती सक्रिय आहेत, ही बाब आमच्यासाठी चिंताजनक आहे.”

ते म्हणाले, “शासन-प्रशासन आणि समाज यांच्यातील तुटलेले नाते, लोकाभिमुख आणि कार्यकुशल प्रशासकीय कामकाजाचा अभाव, ही असंतोषाची स्वाभाविक व क्षणिक कारणे असतात. मात्र, हिंसक उद्रेक समाजात अपेक्षित बदल घडवून आणू शकत नाही. लोकशाही मार्गानेच असे आमूलाग्र परिवर्तन घडविणे शक्य आहे. अन्यथा, अशा हिंसक प्रसंगांचा लाभ उचलून जगातील वर्चस्ववादी शक्ती आपला स्वार्थ सिद्ध करण्याच्या संधी शोधतात.”

सरसंघचालक म्हणाले, “आपले शेजारी देश सांस्कृतिक दृष्टीने तसेच जनतेच्या दैनंदिन संबंधांच्या बाबतीतही भारताशी निगडित आहेत. एकार्थाने ते आपल्याच कुटुंबाचा भाग आहेत. तेथेही शांतता, स्थैर्य, प्रगती आणि सुख-सुविधा उपलब्ध असणे, हे आमच्यासाठीही आवश्यक आहे.”

आशा आणि आव्हाने

सरसंघचालक म्हणाले, एका बाजूला सध्याचा काळ आमच्यातील विश्वास व आशा अधिक दृढ करणारा, तर दुसऱ्या बाजूला आपल्यापुढील जुन्या व नव्या आव्हानांना अधिक स्पष्टपणे समोर आणणारा आहे. तसेच तो आपल्यासाठी निश्चित केलेल्या कर्तव्यमार्गाचे मार्गदर्शन करणाराही आहे. गेल्या वर्षी प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभाने भाविकांच्या संख्येसह उत्कृष्ट व्यवस्थापनाचे अनेक विक्रम मोडून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला. याचा परिणाम म्हणून संपूर्ण भारतात श्रद्धा व एकतेची प्रचंड लाट अनुभवता आली. तथापि, २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी २६ भारतीय प्रवासी नागरिकांचा धर्म विचारून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण देशात नागरिकांमध्ये दुःख आणि संतापाची ज्वाला भडकली. भारत सरकारने नियोजन करून मे महिन्यातच या हत्याकांडाचे सडेतोड उत्तर दिले. या संपूर्ण काळात देशाच्या नेतृत्वाची दृढता, सेनादलांचा पराक्रम आणि युद्धकौशल्यासह समाजाची दृढता व एकतेचे सुखद चित्र आम्ही अनुभवले.

राष्ट्रीय सुरक्षेच्या आवश्यकतेवर भर देताना सरसंघचालक जी म्हणाले की, इतर देशांशी मित्रत्वाचे धोरण आणि भावना राखतानाही आपल्या सुरक्षेबाबत अधिक सजग राहणे आणि सामर्थ्य वाढवत राहणे गरजेचे आहे. धोरणात्मक घडामोडींमुळे जगातील अनेक देशांमध्ये आपले मित्र कोण आणि ते कुठपर्यंत आहेत, हेही स्पष्ट झाले.

शासन व प्रशासनाच्या ठोस कृतीमुळे देशातील अतिरेकी नक्षलवादी चळवळीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले आहे. संबंधित प्रदेशांमध्ये सुरु असलेले शोषण, अन्याय, विकासाचा अभाव आणि शासन-प्रशासनाची संवेदनहीनता ही नक्षलवादी चळवळीच्या वाढीची मूळ कारणे होती. या प्रभावित क्षेत्रांमध्ये न्याय, विकास, सद्भावना, संवेदनशीलता आणि सामंजस्य निर्माण करण्यासाठी शासन-प्रशासनाने व्यापक योजना आखणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली.

“संचारमाध्यमे व आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जगातील राष्ट्रांमध्ये निर्माण झालेल्या जवळीकीचे एक सुखद स्वरूप भासत असले, तरी विज्ञान–तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीचा वेग आणि त्या अनुषंगाने मानवाचा स्वतःला जुळवून घेण्याचा वेग यांत मोठी तफावत आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात अनेक अडचणी उभ्या राहिलेल्या दिसतात. सर्वत्र पेटलेली युद्धे, छोटे–मोठे संघर्ष, पर्यावरणीय ऱ्हासामुळे निर्माण झालेले नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप, समाज व कुटुंबव्यवस्थेला गेलेले तडे, नागरी जीवनातील वाढते अनाचार–अत्याचार अशा समस्या सर्वत्र डोकावतात. या संकटांवर मात करण्याचे प्रयत्न झाले, परंतु त्या समस्यांची वाढ थांबविण्यात किंवा त्यांचे संपूर्ण निराकरण करण्यात ते अपुरे ठरलेत. त्यामुळेच आज संपूर्ण जग या गुंतागुंतीच्या समस्यांचे समाधान भारतीय चिंतनातून उमटणाऱ्या दृष्टिकोनात शोधत आहे,” असे सरसंघचालक जी म्हणाले.

सामाजिक आणि सांस्कृतिक एकता

सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित करत डॉ. भागवत यांनी सांगितले की, कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी समाजाची एकता हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. भारत हा विविधतेने समृद्ध असा देश आहे – अनेक भाषा, अनेक पंथ, भौगोलिक विविधतेमुळे वेगवेगळे राहणीमान, आहार-पद्धती, जाती-उपजाती यांसारखी विविधता पूर्वापार आहे.

आपल्या विविधतेला आपण आपले वैशिष्ट्य मानतो आणि त्यावर अभिमान बाळगण्याची वृत्ती आपल्यात आहे. परंतु हे वैशिष्ट्य भेदाचे कारण बनू नये. सर्व वैशिष्ट्ये असूनही आपण एका मोठ्या समाजाचा अविभाज्य भाग आहोत. समाज, देश, संस्कृती व राष्ट्राच्या नात्याने आपण एक आहोत. ही मोठी ओळख आपल्यासाठी सर्वोपरी आहे, हे आम्ही सदैव लक्षात ठेवायला हवे. त्यादृष्टीने  समाजातील सर्व घटकांचे आपसातील व्यवहार सद्भावनापूर्ण आणि संयमी असणे आवश्यक आहे. प्रत्येकाची श्रद्धा, महापुरुष आणि प्रार्थनास्थळे वेगवेगळी असतात; मन, वचन व कर्माद्वारे त्यांचा अवमान होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

अराजकतेचे व्याकरण रोखण्याची गरज

सामाजिक सद्भाव निर्माण करण्यासाठी व्यापक समाज प्रबोधनाची गरज आहे, यावर सरसंघचालक डॉ. भागवत जी यांनी भर दिला. नियम व व्यवस्थेचे पालन आणि सद्भावपूर्वक आचरण अंगी बाळगणे आवश्यक आहे. छोटे-मोठे वाद किंवा केवळ मनातील शंकांमुळे कायदा हाती घेण्याची, गुंडगर्दी आणि हिंसा करण्याची प्रवृत्ती योग्य नाही. मनात प्रतिक्रिया साठवून ठेवणे किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करणे – अशा घटना मुद्दाम घडवून आणल्या जातात. त्यांच्या कचाट्यात अडकण्याचे परिणाम तात्कालिक आणि दीर्घकालीन या दोन्ही दृष्टींनी योग्य नाहीत. अशा प्रवृत्तींवर बंधन घालणे आवश्यक आहे. शासन-प्रशासनाने कोणताही पक्षपात न करता व कोणत्याही दबावाला बळी न पडता, नियमांनुसार आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मात्र, समाजातील सज्जन शक्ती व तरुण पिढीलाही सावध आणि संघटित राहावे लागेल; आवश्यकतेनुसार तेथे हस्तक्षेप करावा लागेल, असे मोहन जी म्हणाले.

पंचपरिवर्तनाचा आग्रह महत्त्वपूर्ण

आमच्या एकतेच्या आधाराचे वर्णन डॉ. आंबेडकर यांनी Inherent cultural unity (अन्तर्निहित सांस्कृतिक एकता) असे केले आहे. भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून चालत आलेली भारताची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे आणि ती सर्वसमावेशक आहे. व्यक्ती आणि समूह या दोन्ही पातळ्यांवर वैयक्तिक तसेच राष्ट्रीय चारित्र्य सुदृढ होणे आवश्यक आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.

डॉ. भागवत म्हणाले, राष्ट्राच्या स्वरूपाची स्पष्ट कल्पना आणि गौरव संघाच्या शाखेतच मिळतो. दैनंदिन शाखेतील नियमित कार्यक्रमांमुळे स्वयंसेवकांमध्ये व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व, नेतृत्व, निष्ठा व समजूतदारपणाचा विकास होतो. यामुळे शताब्दी वर्षात व्यक्तिनिर्माणाचे कार्य देशभरात सर्वव्यापी व्हावे आणि सामाजिक आचरणात सहज बदल घडवून आणणारा पंच-परिवर्तन कार्यक्रम – सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्व-बोध आणी स्वदेशी, नागरिक अनुशासन व संविधानाचे पालन – स्वयंसेवकांच्या आचरणातून समाजव्यापी व्हावा, असा संघाचा प्रयत्न राहील. संघाच्या स्वयंसेवकांव्यतिरिक्त समाजातील अनेक संघटना आणि व्यक्ती देखील असे कार्यक्रम राबवत आहेत. त्यांच्यासोबत संघाच्या स्वयंसेवकांचा सहयोग आणि समन्वयही साधला जात आहे.

डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर माझे प्रेरणास्त्रोत – रामनाथ कोविंद

समारंभाचे प्रमुख पाहुणे व भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की, विजयादशमी उत्सवाचा हा दिवस संघाचा शतकपूर्ती दिवस आहे. आज जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीचे जतन करणाऱ्या आधुनिक विश्वातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेचा शताब्दी समारंभ संपन्न होत आहे. ते म्हणाले की, नागपूरची ही पवित्र भूमी आधुनिक भारताच्या विलक्षण निर्मात्यांच्या पावन स्मृतींशी जोडलेली आहे. त्या राष्ट्रनिर्मात्यांमध्ये असे दोन डॉक्टर असेही आहेत, ज्यांचे माझ्या जीवनाच्या उभारणीत अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे. ते दोन्ही महापुरुष म्हणजे डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात अंतर्भूत असलेल्या सामाजिक न्यायाच्या व्यवस्थेच्या बळावरच माझ्यासारख्या आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमीच्या व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचता आले. डॉ. हेडगेवारांच्या गहन विचारांमुळे समाज आणि राष्ट्र समजून घेण्याचा माझा दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला. या दोन्ही विभूतींनी निरूपित केलेल्या राष्ट्रीय एकता आणि सामाजिक समरसतेच्या आदर्शांमुळे माझ्यात जनसेवेची भावना रूजली.

श्री रामनाथ कोविंद म्हणाले की, संघाची अखंड राष्ट्रसेवा, राष्ट्रभक्ती आणि समर्पणाचे हे उदात्त आदर्श आपल्या सर्वांसाठी अनुकरणीय आहेत. खऱ्या अर्थाने मनुष्य कसा बनावा, जीवन कसे जगावे, याचे मार्गदर्शन आपल्याला महापुरुषांकडून प्राप्त होते. आज भारतीयांसाठी वैयक्तिक व राष्ट्रीय चारित्र्याने समृद्ध जीवनमार्गाची गरज आहे. आपला सनातन, आध्यात्मिक आणि समग्र दृष्टिकोनच मानवतेच्या मन, बुद्धी आणि अध्यात्माचा विकास घडवतो.

श्री कोविंद म्हणाले की, केवळ भाषणांमुळे सामाजिक वर्तनामध्ये बदल येत घडून नाही; यासाठी व्यापक प्रबोधन आवश्यक आहे. विविधता असूनही आपण सर्व एका मोठ्या समाजाचा एक भाग आहोत. ही मोठी ओळख आपल्यासाठी सर्वोच्च आहे. विचार, शब्द आणि कृतीतून कोणत्याही समुदायाच्या श्रद्धा किंवा आस्थेचा अनादर होऊ नये. जे लोक विकास यात्रेत मागे राहिले आहेत, त्यांचा हात धरून त्यांना आपल्या सोबत घेऊन चालणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

दलाई लामांकडून संघ कार्याचा गौरव

संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने बौद्ध धर्मगरु दलाई लामा यांच्याकडून आलेला शुभेच्छासंदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. या संदेशात दलाई लामा म्हणतात, “मानवी दृष्टिनातून सार्वभौमिक मानवीय मूल्यांच्या संवर्धनात आपले योगदान द्यावे, हे मी माझे कर्तव्य मानतो. एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून मी सर्व मतांमध्ये ऐक्य आणि परस्पर सन्मानाच्या आदर्शांना बळकट करण्याचा प्रयत्न करतो. मी भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरांचा अभ्यासक असल्याने भारतीय ज्ञानपरंपरांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, माझे मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा या तिन्ही बाबतीत दीर्घकाळापासून प्रभावी काम करीत आलाय. यामुळे माझ्या मनात संघाप्रती स्वाभाविक सन्मान आणि प्रशंसेची भावना निर्माण झाली आहे. पुनर्जागरणाच्या या व्यापक चळवळीत संघाने एक अद्वितीय आणि महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. संघाची स्थापना निःस्वार्थ भावनेने झाली आहे. येथे कर्तव्यजाणीवेची निर्मळ आणि स्पष्ट भावना आहे. यात कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. संघाशी जुळलेला प्रत्येक स्वयंसेवक मनाचे आणि साधनांचे पावित्र्य या   मूल्यांवर आधारित जीवन जगायला शिकतो. संघाचा शताब्दी प्रवास हा स्वतःमध्येच समर्पण आणि सेवाभावाचे दुर्मिळ आणि अनुपम उदाहरण आहे. संघाने सतत लोकांना एकत्र आणण्याचे कार्य केले असून भारताला भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून सशक्त केले आहे.

भारताच्या दुर्गम आणि आव्हानात्मक क्षेत्रांमध्येही संघाने शैक्षणिक आणि सामाजिक विकासात योगदान दिले आहे. तसेच आपत्तीग्रस्त क्षेत्रांमध्ये आवश्यक असे सहकार्य दिले आहे,” या शब्दांत पू. दलाई लामा यांनी संघाच्या कार्याचा गौरव केला आहे.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. त्यात प्रामुख्याने लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता (सेवानिवृत्त), कोईम्बतूरच्या डेक्कन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. कार्तिक, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांच्यासह स्वामी शंकरानंद गिरी (संस्थापक, हिन्दू विद्या मिशन,अक्रा, घाना),

डॉ. झ्वेली मखिजे (पूर्व स्वास्थ्य मंत्री दक्षिण अफ़्रीका, पूर्व प्रमुख क्वाझुलू नताल), नोमोन्डे मैक्युनगो (वाणिज्य विकास विशेषज्ञ), भीष्मा रांसीब्राह्मणकुल (फ्रागुरू वामादेवामुनि) कुलीन ब्राह्मण, थाई राजकीय कुटुम्ब, प्रो. सोफाना श्रीचम्पा (असोसिएट प्रोफेसर, महिडोल विश्वविद्यालय, थायलंड), इदा. पंडिता अगुंग पुत्र नाता सिलिवांगी मानुअबा (श्री पुत्र इरनी जेन्टा मरूँगा) वरिष्ठ पुरोहित (पेदान्दा) बाली; सचिव, हिन्दू पुरोहित असोशिएसन, इंडोनेशिया, इदा. आयु पूर्णामा (बालीनेज़ हिन्दू पंडिता, देनापसर), नि मादे आयु अरिसनथी, विशेषज्ञ (निजी विभाग) बाली, अनुयायी इदा. पंडिता अगुंग पुत्र नाता, जिम गेराघति (विशिष्ट स्थंभ लेखक; वरिष्ठ राजनीतिक विश्लेषक, वाशिंगटन पोस्ट, राष्ट्रीय समीक्षक), मेगन मैकअर्डले (स्थंभ लेखक, वॉशिंग्टन पोस्ट, जेसन विलिक (स्तंभ लेखक, वॉशिंग्टन पोस्ट), निकोलस क्लेरीमौंन् (संपादक, लाइफ एंड आर्ट्स, वॉशिंग्टन एक्सामिनर मॅगझीन, पूर्व लेखक: दी एटलान्टिक, दी अमेरिकन इन्टरेस्ट), लेना बेल (प्रत्याशी प्रबंध संपादक, अभिमत- वॉल स्ट्रीट जर्नल), माइक वॉटसन (विशेषज्ञ हडसन, विदेश नीति), बिल ड्रेक्सेल (विशेषज्ञ हडसन, विदेश नीती) यांच्यासह नागपुरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेफ्टनंट जनरल कलिता यांनी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे नेतृत्व केले आहे. जून 1984 मध्ये त्यांनी कुमाऊ रेजिमेंटच्या माध्यमातून आपली सेवा सुरु केली. लष्कराच्या विविध मोहिमांचे त्यांनी नेतृत्व तथा मार्गदर्शन केले आहे. जागतिक स्तरावर त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे सिएरा लोन येथील निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

कोईम्बतूरच्या डेक्कन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. कार्तिक हे देशातील मोटारपंप निर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीचे व्यवसायिक आहेत. सध्या ते इंडियन पंप मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. भारतात निर्माण होणाऱ्या मोटारपंपांच्या निर्यातीत ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज हे बजाज समूहातील वित्तीय सेवा व्यवसायाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या नेतृत्वात बजाज फिनसर्व्ह ही देशातील अत्यंत सन्मानित कंपनी म्हणून पुढे आली आहे. कार्पोरेट क्षेत्रातील आपल्या भूमिकेसह त्यांनी भारतीय उद्योग परिसंघाचे अध्यक्ष म्हणून भारतीय उद्योग क्षेत्राचे दूरदर्शी नेतृत्व केले आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे सक्रिय योगदान आहे.

समारंभाच्या सुरुवातीला ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडले. उपस्थित स्वयंसेवकांनी प्रत्युत प्रचलनम, प्रदक्षिणा संचलन, नियुद्ध, घोष प्रात्यक्षिक, सांघिक गीत – ‘विश्व जननी की कोख सुमंगल, संस्कारों की भाव धरा…’, आणि सांघिक योगासने सादर केली. संघाचे नागपूर महानगर संघचालक श्री. राजेश जी लोया यांनी प्रास्ताविकात देश-विदेशातून खास समारंभासाठी आलेल्या विशेष पाहुण्यांचा परिचय करून दिला.

अन्य लेख

संबंधित लेख