‘इक ओंकार सतनाम’ असणाऱ्या निर्गुण परब्रह्माची एकनिष्ठ उपासना, विशुद्ध आचरण आणि श्रमप्रतिष्ठा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणारी भौतिक दृष्टी, सदाचाराचा जागर, तसेच नामदेवरायांसह अन्य प्रांतातील संत-भक्तांचे विचार संग्रहित करणारी समन्वयशील वृत्ती असलेल्या शीख परंपरेने नामदेवरायांचा आदर्श पुढे ठेवीत बहुजनांना एकत्रित केले. पुस्तकी पांडित्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाला आणि शस्त्रसज्जतेला महत्त्व दिले. त्यानिमित्ताने भक्ती आणि शक्तीचा खराखुरा संगम भक्ति आंदोलनाने अनुभवला.
आद्य गुरु श्री नानक देव ते दशम गुरू श्री गोविंद सिंह आणि अकरावे तसेच अंतिम गुरु ‘श्री गुरुग्रंथ साहिब’ पर्यंतचा प्रवास करताना शीख धर्माला अनेक खडतर प्रसंगांना, अमानुष क्रौर्याला सामोरे जावे लागले. गुरु नानक जयंती हा शीखांचा सर्वात मोठा सण आहे. प्रकाश पर्व, गुरु पर्व, गुरु परब अशा नावांनी ओळखली जाणारी गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. श्री गुरु नानक देव आणि भारताचा आत्मा असलेल्या प्रभू श्रीराम यांच्यात अगाध भक्तीचे एक अनोखे नाते होते.
श्रीरामाचे वंशज गुरू नानक देव
स्वत:ची ओळख करून देताना गुरू नानक देव म्हणतात – श्री राम आमचे पूर्वज आहेत, जे प्रत्येक युगात अवतार घेतात , त्यांच्या वंशात मी नानक कलिकाल अवतार घेतला आहे.
॥ सतगुरु नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चाणन होआ ।।
वर्ष १४६९, शरद ऋतूची सुरुवातीला, कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, कलिकालच्या या भागात, बाबा नानक पृथ्वीवर अवतरले. आपण त्यांना श्री गुरु नानक देवजी महाराज म्हणून ओळखतो. स्वतःची ओळख जगाला करून देताना गुरू नानक देव जी म्हणतात:
सूरज कुल ते रघु भया, रघवंस होआ राम ।
राम चन्द को दोई सुत, लवी कुसू तिह नाम ।
एह हमाते बड़े हैं, जुगह जुगह अवतार ।
इन्हीं के घर उपजू नानक कल अवतार ॥
गुरू नानक देवजींनी स्वतःची अशी ओळख इतरत्र कोठेही नाही, तर इस्लामचे केंद्र असलेल्या मदिना येथे जाऊनच दिली आहे. मार्गक्रमण ,भ्रमण करत असताना, गुरु नानक देव मक्केनंतर मदिना येथे पोहोचले, तेव्हा गुरू नानकांनी तिथल्या पीर बहाव दीनशी आपली उपरोक्त ओळख करून दिली.
सूर्य कुळात रघु नावाचा राजा होता, राम रघुच्या वंशात होता, रामचंद्रजींना कुश आणि लव असे दोन पुत्र होते. तो राम हा आपला पूर्वज आहे, जो प्रत्येक युगात अवतार घेत आहे, त्याच्या वंशात मी नानक कलिकाल अवतार घेतला आहे. पंजाबी विद्यापीठ, पटियालाचे डॉ. कुलवंत सिंग यांनी संपादित केलेल्या “मक्के मदिना की गोष्ठी” मध्ये पृष्ठ क्रमांक २५३ वर ही गोष्ट लिहिली आहे. या गोष्टीचा उल्लेख पवित्र “दशम ग्रंथाच्या” एका दोह्यातही आला आहे.
श्री गुरु नानक देवजींचे खरे अनुयायी हे जाणतात की गुरू नानक देवजी स्वतःला रघुकुलच्या श्री रामाचे वंशज म्हणवतात. एवढेच नाही तर श्री गुरु नानक देव जी त्यांच्या हयातीत, तीर्थयात्रेवर असताना, देखील त्यांच्या पूर्वजांचे स्थान पाहण्यासाठी अयोध्येला पोहोचले होते.
विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अधिवक्ता ( एडवोकेट ) आलोक कुमार म्हणतात, “श्री राम हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे, गुरु ग्रंथसाहिबमध्ये राम हा शब्द वारंवार येतो, आजकाल काही लोकांनी नवीन अर्थ लावला आहे, ते म्हणतात की हा राम अयोध्येचा नाही, हे स्पष्टीकरण चुकीचे तथा पूर्णपणे भ्रामक आहे.