Tuesday, November 11, 2025

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट

Share

सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. एका कारमधून झालेल्या या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि तीन जवळच्या वाहनांमध्ये पसरली आणि जागीच जळून खाक झाली.

सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर लगेचच फायर ब्रिगेड या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलं. दिल्ली आणि शेजारील उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लाल किल्ल्याचा परिसर म्हणजे नेहमीच गजबजलेला असतो विशेषत: सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. एलएनजेपी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या माहितीनुसार आतापर्यंत २० जखमींना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापैकी ९ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. २४ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण क्षेत्राचा ताबा घेतला असून कठोर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

घटनास्थळी एनएसजीचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून फॉरेन्सिक तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

दहशतवादी स्फोटाची शक्यता

स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यापैकी चार जण आयसिसशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटक जप्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लाल किल्ला परिसरातील स्फोटाची धक्कादायक घटना दहशतवादी कारवाईकडे निर्देश करत असल्याचा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत असून तपास आणखी गतीने सुरू आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली. “या षडयंत्रामागे जे कोणी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच. एजन्सी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सहभागी सर्वांना धडा शिकवतील,” असा इशारा त्यांनी दिला.

पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर असून, तेथील कार्यक्रमादरम्यान त्यांनी या प्रकरणाबाबत भाष्य केले.

-अथर्व देशपांडे

अन्य लेख

संबंधित लेख