Wednesday, November 12, 2025

गंगाखेड विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी तापडिया यांच्या नावाची घोषणा

Share

गंगाखेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर गंगाखेडच्या (Gangakhed) राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन स्थापन झालेल्या गंगाखेड विकास आघाडीने (Gangakhed Vikas Aghadi) नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी गोपाळदास तापडिया यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. राम-सीता सदन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन गंगाखेड विकास आघाडीची स्थापना करण्यात आली असल्याची भूमिका गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे (MLA 𝐑𝐚𝐭𝐧𝐚𝐤𝐚𝐫 𝐆𝐮𝐭𝐭𝐞) यांनी स्पष्ट केली.

‘विकास हाच आमचा एकमेव अजेंडा’

विकास आघाडीच्या वतीने नागरिकांप्रती विश्वास व्यक्त करताना सांगण्यात आले की, गंगाखेडकरांना दर्जेदार पायाभूत सुविधा आणि प्रलंबित समस्यांचा निपटारा हवा आहे. “विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे. त्यामुळे या निर्णायक लढाईत सर्व शहरवासीय विकासाला साथ आणि आपले मतदानरूपी आशीर्वाद देतील, असा विश्वास आहे.”

संत जनाईंच्या भूमीचा वारसा जपणार

संत जनाईंची भूमी म्हणून ओळख असलेल्या आपल्या जनाईनगरीची (गंगाखेड) या ऐतिहासिक भूमीचा आध्यात्मिक वारसा जोपासण्याची आणि शहराच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन प्रकल्प सुरू करण्याची भूमिका विकास आघाडीने घेतली आहे. या ‘विकासाभिमुख प्रयोगाचे’ गंगाखेडकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे, त्यामुळे सजग नागरिक मोठ्या विश्वासाने आपल्यासोबत आहेत, असेही आवर्जून यावेळी त्यांनी नमूद केले.

‘जनतेचा विश्वास हेच आमचे बळ’

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आमदार गुट्टे यांनी स्पष्ट केले की, गंगाखेडच्या नागरिकांचा वाढता विश्वास, पारदर्शक नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारसरणी हेच गंगाखेड विकास आघाडीचे सर्वात मोठे बळ आहे. “आगामी निवडणुकीत एकजुटीने आणि जनतेच्या विश्वासाने विजयी होऊन गंगाखेड शहराला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर घेऊन जाणे, हाच आमचा संकल्प आहे,” असेही यावेळी त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला मित्रमंडळाचे विधानसभा अध्यक्ष किशनरावजी भोसले, गोपाळदासजी तापडिया, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे, यांच्यासह मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख