Monday, November 17, 2025

पत्रकारितेला रसातळाला नेणारी.. “BBC”

Share

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन‌’ अर्थात ‌‘बीबीसी‌’ ही माध्यम कंपनी, पुन्हा एकदा जगभरातील चर्चेचे केंद्र झाली आहे. एकेकाळी लोक जिला विश्वासार्ह समजत त्या माध्यम संस्थेच्या पत्रकारितेवर पुन्हा एकदा संशयाचे मळभ आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२१ मध्ये केलेल्या भाषणातील काही भाग चुकीच्या पद्धतीने संपादित केल्याचा आरोप ‌‘बीबीसी‌’वर झाला. ‌‘द टेलिग्राफ‌’ या इंग्लंडमधील वृत्तपत्रात याबाबत बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

‘बीबीसी’च्या विश्वासार्हतेवर गेल्या काही वर्षात अनेकदा प्रश्न उपस्थित झाले असले तरी या प्रकरणाचे गांभीर्य वेगळेच आहे. त्यामुळे ‌‘बीबीसी‌’चे महासंचालक टिम डेवी आणि वृत्तविभाग प्रमुख डेबोरा टर्नेस यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, या राजीनाम्यांमुळे पत्रकारितेचे झालेले नुकसान भरून येणार आहे का हा खरा कळीचा प्रश्न आहे.

बीबीसीच्या एका माहितीपटासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण संपादित करण्यात आले. ज्या पद्धतीने भाषण संपादित करण्यात आले, त्यामुळे ते दिशाभूल करणारे ठरले, असा आरोप करण्यात आला. ६ जानेवारी २०२१ रोजी वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिलवर निदर्शने करणाऱ्या समर्थकांपुढे ट्रम्प यांनी एक भाषण दिलं होतं. हे भाषण संपादित करताना संपूर्ण भाषणाचा संदर्भ बदलेल अशा प्रकारे त्याचा काही भाग कापण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून टीका सुरु झाली आणि नव्या वादाला तोंड फुटले.

या घटनेचा विचार करताना ‌‘बीबीसी‌’च्या दोषांसहित, अमेरिकेच्या अन्य देशांवर वाढत्या दबावाकडेही पाहावे लागेल. या घटनेवर उमटलेल्या प्रतिक्रियांमागे ट्रम्प यांच्या ‌‘टॅरिफ‌’ची दहशत असण्याचीही बाजू पुढे येत आहे. राजकारण्यांचा माध्यमांवरील प्रभाव, हा कायमच चर्चेचा विषय आहे. मात्र, जवळपास पाच वर्षांपूर्वी संपादित आणि प्रसारित झालेल्या बातमीतील चुकांसाठी शिक्षा होण्यास ट्रम्प यांना पुन्हा सत्तेवर का यावे लागले, हा प्रश्नही रास्तच ठरतो. केवळ आज ट्रम्प सत्तेत आहेत म्हणून त्यांना शांत करण्यासाठी हे बळी देण्यात आले आहेत काय? त्यामुळे या घटनेकडे बघताना सर्वांगाने विचार महत्त्वाचा ठरतो.

भारतावर सुमारे १५० वर्षं ब्रिटिशांचे राज्य होते. आपली शिक्षण पद्धती, लोकशाही व्यवस्था तसेच सामाजिक सुधारणांवर ब्रिटनचा मोठा पगडा असल्यामुळे आपल्याकडील एक वर्ग ब्रिटिशांच्या मताला मोठ्या गांभीर्याने घेतो. आपल्या लोकशाही संस्थांपेक्षा त्यांना ब्रिटिश उच्चायोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल अधिक महत्त्वाचा वाटतो. अशा वर्गाने दुसर्‍या महायुद्धापूर्वी, शीतयुद्धाच्या काळात आणि इंटरनेट क्रांतीच्या काळात ‘बीबीसी’सारख्या माध्यमांच्या बदललेल्या रुपाचा आपण अभ्यास करायला हवा.

घटनेची चिकित्सा करणे हे माध्यमांचे कार्य असते. जबाबदारी हा पत्रकारितेचा आत्मा असतो. समाज, सरकार आणि नागरिक यांच्या दरम्यानचा विश्वासाचा सेतू माध्यमे बांधतात. तोच सेतू जर एका चुकीच्या संपादनाने हादरला, तर त्याचे परिणाम फक्त एका संस्थेपुरते मर्यादित राहात नाहीत. त्यामुळे निष्पक्षता ही केवळ धोरण म्हणून मिरवण्याची किंवा जगाला शिकवण्याची बाब नसून, ती रोजच्या वृत्तांकनात सातत्याने पाळावी लागते. ‌‘बीबीसी‌’ने आता केवळ राजीनाम्यांवर थांबून चालणार नाही. आत्मपरीक्षण करून संपादकीय स्वातंत्र्याचे आणि पारदर्शकतेचे नवे मानक त्यांना निश्चित करावे लागेल. आज ‌‘बीबीसी‌’समोरचे खरे संकट विश्वासाच्या पुनर्स्थापनेचे आहे. सत्याला संपादन करून लपवता येत नाही, हेच या घटनेने पुन्हा ठळकपणे अधोरेखित झाले आहे.

-हिमांशु शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख