बिहारच्या निवडणूक निकालाने राष्ट्रीय राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. हा निकाल केवळ एका राज्याचा राजकीय निर्णय नाही; तर केंद्रातील मोदी सरकारला अधिक बळ देणारा जनादेश आहे. नितीश-मोदी जोडी पुन्हा एकदा प्रभावी ठरल्यामुळे केवळ बिहारमध्येच नव्हे, तर दिल्लीतील राजकारणातही विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. ‘इंडि’ आघाडीतील टोकाचा विसंवाद आता अधिक ठळकपणे समोर आला आहे. या पराभवाने विरोधकांच्या ऐक्यावर, रणनीतीवर आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तेजस्वी यादवांनी आपली सगळी ताकद पणाला लावली होती परंतु घरात झालेला कलह , मोठा भाऊ तेजप्रताप यांच्या प्रेमप्रकरणानंतर लालूंनी केलेली त्यांची हकालपट्टी, रोहिणी या मोठ्या बहिणीची ‘राजद’ चे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची महत्वाकांक्षा अश्या सगळ्या आघाड्यांवर तेजस्वी निवडणुकीआधीच गारद झाले होते. याउलट मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन नेत्यांच्या धमाकेदार विकासकामांमुळे एनडीएच्या ‘डबल इंजिनचा’ विजय निश्चित मानला जात होता. पण त्या विजयाचा आवाका इतका अभूतपूर्व असेल, अशी कल्पना कोणालाच आली नव्हती. राजद-काँग्रेस व अन्य पक्षांचे कथित महागठबंधन मतदारांनी अक्षरशः पालापाचोळ्यासारखे भिरकावले.
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या तब्येतीवरून राजदने त्यांची भरपूर कुचेष्टा केली. काँग्रेसनेही निकालानंतर भाजप त्यांना या पदावर ठेवणार नाही, असा प्रचार करीत भाजप-जदयुमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. पण, यांपैकी कुठल्याही प्रचाराला बाली न पडता मतदारांनी या दोन पक्षांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. ‘एनडीए’चे ‘डबल इंजिन’ सरकारच आपल्या राज्याचा विकास करू शकते आणि आपल्या जीवनात सुधारणा करू शकते, अशी पक्की खूणगाठ मतदारांनी बांधली होती. ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ हा मंत्र बिहारी मतदारांच्या मनात गुंजत होता.
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची १५ वर्षांची ‘जंगलराज’ राजवट आजही बिहारी लोकांच्या अंगावर काटा उभा करते. निवडणुकीपूर्वी राजद नेत्यांनी सरकारी अधिकार्यांना दिलेल्या धमक्या पाहता, हा पक्ष सत्तेवर नसताना इतकी दमनशाहीची भाषा करू शकतो, तर सत्तेवर आल्यास राज्यात पुन्हा ‘जंगलराज’च निर्माण होईल, अशी साधार भीती मतदारांना वाटली आणि गेली पाच वर्षे राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी त्यांनी ‘सुशासनबाबू’ नितीशकुमारांनाच भाजपसह निवडले.
निवडणुकीपूर्वी, विरोधक नितीशकुमारांना एक ओझे म्हणून पाहत होते.परंतु होणाऱ्या टीकांकडे दुर्लक्ष्य करून नितीशकुमारांनी गेल्या सहा महिन्यात झंझावाती प्रचार करून विरोधकांचे तोंड बंद केले आहे.
“सुशासन बाबू’ असण्याव्यतिरिक्त, नितीश हे ‘मिस्टर क्लीन’ देखील आहेत. त्यांच्या काही मंत्र्यांवर आरोप आहेत, परंतु कोणीही मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही. लालू यादव यांच्याप्रमाणे त्यांनी कधीही आपल्या मुलांना तिकिटे दिली नाही. घराणेशाही जनतेवर लादण्याचा प्रयत्नदेखील केला नाही.
लालू-राबडी यांच्या जंगलराज नंतर बिहारला पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांच्या कारभाराचे आणि धोरणात्मक प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक झाले आहे. समाजाच्या मोठ्या वर्गासाठी आता जवळजवळ मोफत असलेली विजेची नियमित उपलब्धता, महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांचे बांधकाम आणि कायदा सुव्यवस्थेच्या सुधारणेमुळे बिहार आत प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे.
बिहारच्या राजकारणातील हा बदल दूरगामी आहे. मतदार आता केवळ जात, धर्म किंवा भावनेवर वाहवत जात नाही. जातीय राजकारण त्याने बाजूला ठेवले. तो राजकारण्यांना निरखून घेतो, विश्वास पाहतो. काम पाहतो. राजकारण नेहमी बदलत असले तरी जनता परिपक्व होत असून राजकारणाची दिशा ठरवत आहे, हेच या जनादेशाचे सार आहे.
-हिमांशु शुक्ला