छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून अनेक किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. परंतु, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी आणि स्वराज्याच्या तेजस्वी संकल्पनेला बळ देणारी अभुतपूर्व घटना म्हणजे अफजलखानाचा वध होय. या विजयाने महाराजांचे अंगभूत नेतृत्वगुण, मुत्सद्देगिरी, धाडस आणि ईश्वरार्पणवृत्ती सिद्ध झाली. रयतेच्या मनात खात्री झाली की, शिवरायांच्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आहे आणि “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” आहे.
स्वराज्यावर अफजल खानाचे संकट
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या स्वराज्याची धास्ती घेऊन आदिलशाहीची बडी साहेबीण हिने शिवाजी महाराजांना खत्म करण्यासाठी अब्दुल्ला खान म्हणजेच अफजलखानाची निवड केली. हा क्रूर, कपटी आणि अत्यंत पराक्रमी सरदार होता, जो शहजादा औरंजेबालाही भिडला होता. या भोसलेकुळाच्या हाडवैऱ्यानेच शाहजीराजांना कैद केले होते आणि शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजांच्या मृत्यूसही तोच कारणीभूत होता.
वाईचा सुभेदार असलेला हा अफजल खान हिंदू धर्माचा द्वेष्टा होता. त्याच्या शिलालेखात “कातिले मुतमर्रिदान व काफिरान। शिकंद-ए-बुनियादे बुतान।” अर्थात ‘काफिरांची कत्तल करणारा आणि मूर्तीचा पाया उखडून टाकणारा’ असे वर्णन आहे. अत्यंत गर्विष्ठ असलेल्या खानाच्या मुद्रा त्याचा अहंकार दर्शवते त्यात तो लिहितो,
“गर अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल
अझ हर मुल्की बजाए तसबीह, आवाझ आयद अफजल अफजल”
याचा अर्थ “जर श्रेष्ठ स्वर्गाला इच्छा झाली की उत्तम माणसांची उत्तमता व अफजलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवावी तर जपमाळेतील अल्ला अल्ला या ध्वनीच्या जागी अफजल हाच सर्वात उत्तम पुरूष आहे हे ध्वनी उमटू लागतील.” असा स्वतःच स्वत:ची बढाई मारून गर्वाने फुगलेला अफजलखान शिवरायांना “जिंदा या मूर्दा” घेऊन जाण्यासाठी स्वराज्यावर चाल करून निघाला.
खानाची कपटनीती आणि महाराजांची तयारी
स्वराज्यावरील हे सर्वात मोठे संकट होते. अफजल खानाने प्रथम देशमुखांना सामील करून घेतले, पण कान्होजी जेधेंसारखे निष्ठावान मावळे स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. शिवरायांना मोकळ्या मैदानात खेचण्यासाठी खानाने धर्मांध वृत्ती दाखवली. त्याने तुळजापूरला येऊन आई तुळजाभवानीची मूर्ती फोडली, मंदिरात गाय कापली आणि पंढरपूरसह अनेक मंदिरांवर घणाघात केला. शाहीर अज्ञान दासाने पोवाड्यात म्हटले आहे की,
“फोडिली तुळजा । वरती मसुदच बांधिली॥”
इतकेच नव्हे तर त्याने शिवरायांचे मेहुणे बजाजीराजे निंबाळकरांनाही कैद करून इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजबरी करून क्रूरतेची सीमा गाठली.
खानाने महाराजांना कपटाने भेटण्यास बोलावले. पण “मी चुकलो आहे, खानसाहेब आम्हाला आबासाहेबांच्या ठायी आहेत” असे बोलून शिवरायांनी डाव खेळला. वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांनी खानाच्या गोटातील कपट हेरले आणि खानाला भेटण्यासाठी जावळीस, प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्याची जबाबदारी चोख पार पाडली.
प्रतापगडावरचा निर्णायक क्षण
रयतेवरील अत्याचार आणि पत्नी सईबाईसाहेबांचा दुःखद वियोग या दुहेरी संकटातही शिवाजी महाराज स्थितप्रज्ञ होते. आऊसाहेब जिजाऊंनी त्यांना धीर दिला आणि “राजे संभाजींचे उसने घ्या” असे सांगितले. महाराजांनी विवेकबुद्धीने मावळ्यांना बोलावून, “आई तुळजाभवानीने आम्हास दर्शन दिले आहे, ती माझ्या हस्ते अफजलखान मारविते!” असे सांगून सर्वांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला.
अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला ‘मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, १० नोव्हेंबर १६५९’ रोजी, प्रतापगडाच्या पायथ्याशी “अखंड सावधान” असलेले शिवाजी महाराज संपूर्ण तयारीनिशी खानाला भेटले आणि तिथेच त्यांनी त्या दैत्याचा कोथळा बाहेर काढला! शिवरायांनी या बत्तीस दातांच्या बोकडाचे मस्तक राजगडला आऊसाहेब जिजाऊंना पाठवले.
हा वध म्हणजे स्वराज्यावरील मोठे संकट दूर करणारा निर्णायक टप्पा होता. या पराक्रमाने पन्हाळ्यापर्यंतचा आदिलशाही मुलुख स्वराज्यात सामील झाला आणि नेतोजी पालकरांनी तर थेट विजापूरवर हल्ला केला. प्रतिघात करण्याचे सामर्थ्य शिवरायांनी हिंदु समाजात निर्माण केले. या घटनेनंतर “शिवाजी महाराज हे देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी अवतीर्ण झालेले महापुरुष आहेत” म्हणून लोक त्यांना दैवी अवतार मानू लागले.
अफजल खानाचा वध हे शिकवतो की आतंकवाद असो वा जिहाद हा असाच संपवावा लागतो. त्यासाठी पुन्हा पुन्हा शिवचरित्राचे स्मरण आणि आचरण करण्याची गरज आहे.
-प्रवीण नायसे