Monday, December 1, 2025

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीत ‘मुंबई पब्लिक स्कूल’चे उद्घाटन; ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४.२० लाख मोफत सॅनिटरी पॅड मिळणार

Share

मुंबई : उत्तर मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सर्वांगीण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, बीएमसी शिक्षण विभागाच्या आर-नॉर्थ विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर कॅम्पस (कांदिवली, पूर्व) याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन शाळेत आधुनिक वर्गखोल्या, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण प्रणाली, क्रीडा सुविधा आणि मूल्याधारित उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी दहिसर मतदारसंघाच्या आमदार मनीषा चौधरी (MLA Manisha Choudhary) उपस्थित होत्या.

यावेळी गोयल यांनी मुलींच्या सन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यांनी घोषणा केली की मुंबईतील सर्व बीएमसी शाळांमधील सुमारे ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४,२०,००० सॅनिटरी पॅड (Sanitary Pads) मोफत वितरित केले जातील, जेणेकरून मासिक पाळी स्वच्छतेच्या साधनांच्या कमतरतेमुळे कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू नये. कार्यक्रमात गोयल यांनी विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वाटप केले आणि शाळांमधील स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, सुरक्षित स्वच्छतागृहे आणि सॅनिटरी उत्पादने उपलब्ध करून देणे हे मुलींच्या आत्मविश्वास, स्वावलंबन आणि अखंड शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे.

पीयूष गोयल यांनी बीएमसी शिक्षण विभागाला ‘पॅडमॅन’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले, जेणेकरून स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती निर्माण होईल.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि या सोहळ्याची शान असलेले शालेय विद्यार्थी, पालक व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. तसेच मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक तावडे, तसेच माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडळ व वॉर्ड पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख