अशांत मणिपूर, उत्तर-दक्षिण विभाजनाचे प्रयत्न यासह सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवता येतील, यावर आमचा विश्वास आहे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बेंगळुरू येथे सुरू असून त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे सहसरकार्यवाह सी. आर. मुकुंदजी यांनी ही भूमिका मांडली.
प्रतिनिधि सभेचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी भारतमातेला पुष्पहार अर्पण करून केले. या सभेत १४८२ कार्यकर्ते उपस्थित आहेत.
मणिपूरसह देशातील विविध प्रश्न, समस्यांबद्दल मुकुंदजी यांनी संघाची भूमिका विषद केली. गेल्या वीस महिन्यांपासून मणिपूर राज्य एका अशांत परिस्थितीतून जात आहे. तेथील दोन्ही समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे परस्पर अविश्वास, वैर निर्माण झाले आहे. लोकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला आहे. तथापि, राष्ट्रपती राजवट लागू करण्यासह केंद्र सरकारने राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर घेतलेल्या कृतीशील निर्णयांमुळे परिस्थिती सुधारण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. परंतु सौहार्द आणि विश्वासाचे नैसर्गिक वातावरण निर्माण होण्यास बराच वेळ लागेल, असे मुकुंदजी म्हणाले.
स्वयंसेवकांकडून सुसंवादाचे प्रयत्न
या संपूर्ण काळात, संघ आणि संघ-प्रेरित सामाजिक संघटनांनी हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी एकसंध होऊन काम केले. स्वयंसेवकांनी विविध समुदायांशी सतत संपर्क साधून संयम राखण्याचा संदेश देऊन परिस्थिती नियंत्रित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. सुसंवाद साधण्यासाठी हे सर्व प्रयत्न अजूनही सुरू आहेत. संघाची कळकळीची विनंती आहे की मणिपूरमधील सर्व समुदायांनी त्यांचे दुःख आणि अविश्वास बाजूला ठेवून परस्पर बंधुत्वासह सामाजिक एकतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी संघाच्या प्रयत्नांबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुकुंदजी म्हणाले की संघाचे प्रयत्न जनजातीय गट, मैतेयी आणि कुकी यांना एकत्र आणणे आणि त्यांना चर्चा करण्यासाठी, समान समजुतीसाठी प्रोत्साहित करणे याबद्दलचे आहेत. संघ समुदायांना एकत्र आणून मणिपूरच्या लोकांना मदत करत आहे. दोन्ही समुदायांचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत आणि सुसंवाद निर्माण करण्यासाठी इंफाळ, गुवाहाटी आणि दिल्ली येथे बैठका घेण्यात आल्या आहेत. गुंतागुंतीच्या समस्येचे अनेक पैलू आहेत, परंतु संघ लोकांना जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नरत आहे. शिवाय, संघ स्वयंसेवकांनी घरातून बाहेर पडलेल्या निर्वासितांसाठी शंभर मदत शिबिरे आयोजित केली आहेत, जिथे अन्न, निवारा आणि आवश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता शांतता प्रस्थापित होण्याची आशा आहे परंतु त्यासाठी वेळ लागेल.
भाषा, सीमांकन, प्रदेश, उत्तर-दक्षिण विभाजन इत्यादींच्या नावाखाली विभाजनकारी अजेंडा वापरून अनेक शक्ती राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला आव्हान देत आहेत. तथापि, आमचे कार्यकर्ते आणि आमच्या विचार परिवारातील अनेक जण अशा विभाजनकारी समस्या सोडवण्यासाठी विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमध्ये अथक परिश्रम करत आहेत, असेही मुकुंदजी यांनी सांगितले.
संघ न्यायासाठी दक्ष
उत्तर-दक्षिण विभाजनाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की बहुतेक मुद्दे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. सीमांकनाबाबत, गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटले आहे की ते प्रमाणानुसार केले जाईल. म्हणजेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या असलेल्या लोकसभा जागांचे प्रमाण किती आहे यावर संघाला फारसे काही म्हणायचे नाही. तथापि, रुपयाचे चिन्ह काढून टाकणे, भाषेचे प्रश्न उपस्थित करणे यासारख्या राजकीयदृष्ट्या प्रेरित कृती राजकीय नेत्यांनी नव्हे तर सामाजिक, सामुदायिक नेत्यांनी सोडवल्या पाहिजेत असे संघाचे मत आहे. संघ न्यायासाठी दक्ष आहे आणि सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात असा आमचा दृढ विश्वास आहे, असेही प्रतिपादन मुकुंदजी यांनी केले.
शाखांची वाढती संख्या
संघ शाखांच्या वाढीची माहिती देताना ते म्हणाले, ५१,५७० ठिकाणी दररोज एकूण ८३,१२९ शाखा सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या ७३,६४६ पेक्षा ही संख्या १०,००० पेक्षा अधिक आहे. तसेच साप्ताहिक मिलनांची संख्या ३२,१४७ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साप्ताहिक मिलनांची संख्या ४,४३० ने वाढली आहे. एकूण संघ मंडळी (मासिक) १२,०९१ असून एकूण शाखा, साप्ताहिक मिलन आणि संघ मंडळी यांची एकूण संख्या १,२७,३६७ आहे.
तरुणांचा सहभाग वाढला
संघाच्या कार्यात सामील होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरवर्षी संघात नवीन विद्यार्थी आणि तरुण जोडले जात आहेत. आमच्याकडे संकेतस्थळाद्वारे (www.rss.org) संघामध्ये सहभागी होण्याची सुविधा देखील आहे. २०१२ पासून १२,७२,४५३ हून अधिक लोकांनी संकेतस्थळाद्वारे संघामध्ये सहभागी होण्यासाठी आपली रुची दाखवली आहे, ज्यामध्ये ४६,००० हून अधिक महिला आहेत. अशा हजारो महिला कार्यकर्त्या वेगवेगळ्या क्षेत्रात संघाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. संकेतस्थळाद्वारे संघामध्ये सहभागी होण्यात रस दाखविणारे बरेच जण अरुणाचल प्रदेश, मणिपूर इतकेच नव्हे तर भारताबाहेरील देखील आहेत. या आकडेवारीचा मुख्य मुद्दा असा आहे की संघ ही युवा संघटना आहे हे संघात सहभागी होणाऱ्यांच्या संख्येवरून दिसून येते, असे मुकुंदजी म्हणाले.