Sunday, May 26, 2024

गांधीमुक्त अमेठी आणि काँग्रेसमुक्त भारत

Share

अमेठीमधून पळ काढून राहुल गांधी यांनी रायबरेलीमधे आसरा घेतला आहे. वायनाडमधे विजयाची शाश्वती नसल्यामुळेच राहुल रायबरेलीमधे गेल्याचे मानले जाते. परिवारवादी राजकारणाचे अपरिहार्य परिणाम कॉंग्रेस भोगत आहे. नेतृत्व, विचार, संघटन आणि कल्पकता यांचा पूर्ण अभाव कॉँग्रेसमधे दिसून येतो. `risk taking abilities’ हा नेतृत्वाचा प्रमुख निकष मानला जातो. राहुल या निकषावर पूर्णपणे अनुत्तीर्ण झाले आहेत.

अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी यांनी अमेठीमधून पळ काढला आणि स्वत:ची खाजगी जहागिरी समजत असलेल्या शेजारच्याच रायबरेली मतदारसंघाची निवड केली. स्मृति इराणी यांच्याविरुद्ध पुन्हा लढण्याची धमक राहुल दाखवू शकले नाहीत. इराणी यांच्याएवढे धाडस, शौर्य आणि जिगर राहुल यांच्याकडे कधीच नव्हते. २०१४ च्या पराभवानंतर इराणी यांनी अमेठीमधे तळ ठोकून २०१९ ला राहुल यांना चितपट केले होते. कॉँग्रेसला अशा लढाईची सवय नाही. कॉँग्रेसला, विशेषतः गांधी परिवाराला, असे राजकारण कधीच झेपले नाही. गांधी परिवाराने कायमच ‘comfort zone’ मधील राजकारण केले. त्याला स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास आहे. त्यात राहुल गांधी हे `casual politician’ किंवा ‘seasonal politician’ म्हणून ओळखले जातात. पराभवाचा अंदाज आल्यामुळेच राहूल यांनी २०१९ मधे केरळमधील सुरक्षित वायनाडमधे पळ काढला. राहूल गांधीना वायनाड सुरक्षित वाटला कारण तिथे मुस्लिम मतदारांची संख्या साधारण ४५ टक्के आहे. कॉँग्रेससविषयी सहानुभूति वाटणारे मुस्लिम लिग सारखा पक्ष आजही तिथे अस्तित्व टिकवून आहे. २०२४ मधे राहुल यांनी वायनाड बरोबरच मातोश्री’च्या रायबरेलीचीसुद्धा निवड केली.

राहुल यांच्या या निर्णयाचे अनेक अर्थ निघतात. एके काळी संपूर्ण देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसची केविलवाणी अवस्था यामधून दिसून येते. रायबरेली नावाचा शेवटचा बुरूज सांभाळण्याची नामुष्की कॉंग्रेस आणि गांधी परिवारावर आली आहे. १९५२ साली राहुल यांचे आजोबा फिरोज गांधी या मतदारसंघातून प्रथम निवडून आले. त्यानंतर सातत्याने गांधी परिवाराशी संबंधित व्यक्तिच या मतदारसंघातून निवडून गेली आहे. अपवाद फक्त १९७७ चा. १९७७ साली राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव करून जगभरात खळबळ उडवली होती. मात्र त्या विजायामधे आणीबाणीचा मोठा वाटा होता. स्वतः सोनिया गांधी या २००४ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या. तब्येतीच्या कारणासाठी, परंतु त्याच वेळी खासदारकीचे कवच अबाधित रहावे, म्हणून सोनिया यांनी या वेळेस, राजस्थानमधून राज्यसभेवर जाणे पसंद केले आहे.

रायबरेलीमधून प्रियांका गांधी-वदरा यांनी निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह होता. मात्र बहीण-भावातील सुप्त संघर्षामुळे प्रियांका यांनी तूर्तास निवडणुकीच्या रणधुमाळीपासून निर्णय घेतल्याचे मानले जाते. बहीण-भावामधील हा संघर्ष `dynastic politics’ मधे अटळ होता, आहे आणि राहील. कौटुंबिक ऐक्याची सदोदित द्वाही फिरवणाऱ्या शरद पवार यांनासुद्धा परिवारवादी राजकारणाचा फटका बसला आहे. गांधी अपवाद असण्याचे काहीही कारण नाही. कॉंग्रेस आणि गांधी परिवाराने भाजपला अमेठीमधे जणू काही बाय दिला आहे. अमेठीमधून के एल शर्मा यांना उमेदवारी देऊन कॉंग्रेसने आपल्या पराभूत मानसिकतेचा पुरावाच दिला आहे.

वास्तविक अमेठीशीसुद्धा गांधी कुटुंबाचे दीर्घ काळाचे नाते आहे. संजय गांधी, राजीव गांधी, स्वतः सोनिया गांधी आणि राहुल यांनी या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. गांधी कुटुंबाचे अमेठीशी पाच दशकांचे नाते आहे. मात्र गांधी कुटुंबाने अमेठीसमवेत आता कायमचा `ब्रेक अप’ घेतलेला दिसतो. अमेठीमधून प्रियांकाचे नाव आघाडीवर होते. मात्र महिला विरुद्ध महिला या लढतीलासुद्धा कॉंग्रेस घाबरलेली दिसते. प्रियांका मैदानात उतरल्या तर राहुल यांचे जिजू आणि कॉँग्रेसचे जावई रॉबर्ट यांची अजून काही लफडी बाहेर येण्याची शक्यता होती. त्याचा परिणाम केवळ अमेठीवरच नाही तर साऱ्या देशभर होण्याची भीती कॉंग्रेसला वाटत असावी. त्यामुळेच रॉबर्ट यांची इच्छा असूनसुद्धा कॉंग्रेसला जावयाची मनोकामना पूर्ण करता आली नाही. प्रियांका यांचा निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीनेसुद्धा कॉँग्रेसला पछाडलेले असेल. प्रियांकाचा पराभव झाला तर त्याचा परिणाम कॉँग्रेसच्या ‘first family’ वर होणे अपरिहार्य होते. त्यामुळेच कॉँग्रेसने ‘झाकली मूठ झाकलीच ठेवणे’ पसंद केले.

स्वतंत्र पक्षाचे नेते पिलु मोदी यांनी एकदा कॉंग्रेस पक्षाचे वर्णन ‘अमिबा’ असे केले होते. कितीही विघटन झाले तरी अमिबा जिवंत राहतो, असा त्यांचा युक्तिवाद होता. तथापि, पिलु मोदी यांना सपशेल खोटे ठरविण्याची कॉंग्रेसने शपथ घेतलेली दिसते. गेल्या काही दशकात कॉंग्रेस आकुंचन पावत चाललेला पक्ष आहे. भौगोलिक विस्तार आणि मते या दोन्ही निकषांवर पक्षाची अवस्था दयनीय झाली आहे. उत्तर प्रदेश हे त्याचेच एक उदाहरण आहे. एके काळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशात कॉंग्रेस हारलेली लढाई लढत आहे. समाजवादी पक्षाबरोबर हा पक्ष लोकसभेच्या ८० पैकी केवळ १७ जागा लढवित आहे. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो, या वास्तवाशी कॉंग्रेसचा काहीही संबंध राहिलेला नाही. १९८८ नंतर, म्हणजेच सुमारे चार दशके, उत्तर प्रदेशमधे कॉंग्रेस सत्तेबाहेर आहे. सध्या या राज्यात कॉंग्रेसचे केवळ दोन आमदार आहेत. अनेक प्रयोग करूनसुद्धा कॉँग्रेसला मतदारांचा विश्वास संपादन करता आला नाही. काँग्रेसचे हिंदुविरोधी राजकारण आणि परिवारवाद याला उत्तर प्रदेशचे मतदार प्रचंड कंटाळले आहेत. उत्तर प्रदेशमधील नवीन पिढीला तर कॉंग्रेस जणू काही माहीतच नाही. उत्तर प्रदेशचा गेल्या काही वर्षात झालेली प्रगती बघून त्या राज्यातील जनता पश्चाताप करीत असेल कारण त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली असेल. सध्याची परिस्थिती बघता नजीकच्या काळात कॉँग्रेसचे पुनररूजीवन होण्याची कोणतीही संधी दिसत नाही.

राहुल यांचा अमेठी ते रायबरेली हा प्रवास याच परिस्थितीचा परिपाक आहे. हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रभाव वाढत गेल्यानंतर उत्तर प्रदेशमधे कॉँग्रेसला उतरती कळा लागली. कॉँग्रेसने हिंदूंच्या भावनेचा नेहमीच अपमान केल्यामुळे गांधी परिवाराला उत्तर प्रदेशने चांगलाच धडा शिकवला आहे. कॉँग्रेसचे मुस्लिम प्रेम हे इतिहासकाळापासून ज्ञात आहे. कॉँग्रेसच्या मुस्लिम प्रेमामुळेच राहुल गांधी मुस्लिम बहुल असलेल्या वायनाड मतदारसंघात पळून गेले. वास्तविक, हिंदूंच्या जखमेवर राहुल आणि त्यांच्या पक्षाने चोळलेले हे मीठ होते. मुस्लिम समाजापुढे कॉँग्रेसने घातलेले लोटांगण होते. राजकीय अस्तित्वासाठी गांधी परिवार मुस्लिमांच्याच आसऱ्याला जाणार, हा संशय यामुळे खरा ठरला. अशा पक्षाची आणि परिवाराची भूमिका लांगूलचालनाचीच असणे, अत्यंत साहजिक आहे. मुस्लिम लांगूलचालन आणि हिंदुद्वेषाचा मुख्य स्त्रोत गांधी परिवार आहे. परंतु हिंदू समाज नैसर्गिकरीत्या भोळसट आणि साधा आहे. हा भोळसटपणा इतका टोकाचा आहे की, त्याचे रुपांतर सद्गुण विकृतीमधे होतो. देशभरात, विशेषतः उत्तर प्रदेशात, कॉंग्रेसची पीछेहाट होत असताना, रायबरेलीने गांधी परिवाराला २०१४ आणि २०१९ मधे साथ दिली. हा एक सद्गुण विकृतीचाच प्रकार होता. रायबरेली आणि अमेठीच्या उमेदवार निवडीच्या गोंधळावरून कॉंग्रेसने परिवारवादाचा आणखी एक दाखला दिला आहे. खरगे वगैरे नेते असहाय्य आणि हतबल होऊन गांधींकडे बघत होते. गांधी परिवार म्हणजे मध्ययुगीन काळातील सामंतशाहीचा अस्सल नमूना आहे. सोनिया, राहुल आणि प्रियांका ही सामंतशाही आपल्या वर्तनावरून सदोदित सिद्ध करीत असतात.

रायबरेलीमधून अर्ज भरल्यामुळे राहुल यांना वायनाडमधून विजयाची हमी वाटत नसल्याचे दिसून येत आहे. कमुनिस्ट पक्षाने राहुल यांच्यापुढे या वेळी गंभीर आव्हान उभे केल्याचे मानले जाते. कम्युनिस्ट पक्षाने राहुल यांच्या उमेदवारीवर अत्यंत गंभीर आक्षेप घेतला होता. भाजपनेसुद्धा वायनाडला चांगलाच जोर लावला आहे. स्वतः राहुल यांनी वायनाडची निवडणूक काही प्रमाणात low profile पद्धतीने लढवली होती. वायनाडच्या पराभवाच्या भीतीने ग्रासलेल्या राहुल यांना रायबरेली म्हणजे last resort, आहे का हाच खरा प्रश्न आहे.

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेसच्या विचारांपासून मुक्त असलेला भारत. परंतु, राजकारण म्हणजे टाइमपास अशी कल्पना असलेल्या राहुल गांधी यांना या घोषणेमागील अर्थ अद्याप समजलेला नाही. तूर्तास गांधी परिवाराचा बालेकिल्ला अमेठी ‘कॉंग्रेस मुक्त’ झाला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख